Saturday 29 December 2012

टू मिसेस वाल्या कोळी


सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती. 
नातेवाईक धरून ठेवणं. 
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं. 
लोकांना रुचेल तसं(च) वागणं. 
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं, 
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना 
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही. 
जोरदार आणि समजूतदार समर्थन. 
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण. 
सगळंच सगळ्यांना रुचतं.
स्वत:सकट सार्‍यांना 
जेवणबिवण छान पचतं.

हे असं आहे खरं.
'असं का आहे?' विरून जातं. 
'असंच असतं'ची आळवणी,
मागून 'असंच चालणार' येतं.
विरोध संपला. 
ठिणगी संपली. 
संघर्ष संपला. 
चेतना संपली. 
सारं कसं शांत शांत.
टोटल बोअरिंग. 
एकदम निवांत.
कुणी कुणावर हल्लाबिल्ला केला
तर थोडी सनसनाटी.
स्वसंरक्षणासाठी
एखादी काठी.
सगळ्यांच्याच हाती.
एकटं पडायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
एकान्ताचा वसा मनी धरावा.
खुशाल उतावे, खुशाल मातावे
तत्त्वाबित्त्वासाठी खुश्शाल भांडावे.
काही तोडून-मोडून घ्यावे,
काही सोबत जोडून घ्यावे.
काही वेचून फेकून द्यावे.
बरेच काही पोटी धरावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें एकटे उरावे.
मिळतील थोडे सखे-सोयरे.
भांडा-तंटायला 
एकटे असायला,
न भिणारे.

7 comments:

  1. नितांत सुंदर एकटा, हेच रुंजत होतं केव्हापासून. वेगळं होत जात स्वत:पासूनही तुटायची भीती सुद्धा सरलीय आता. अवस्थांतरे घडली तरी आपण ह्या सुंदर एकांतापासून पारखं होणार नाही याची हमी देणारा उबदार पाठीराखा स्पर्श मिळाल्यासारखं वाटलं.

    ReplyDelete
  2. गेली ५ वर्षं आधी हेच केलं. आधी वाटायचं आपलच काहीतरी चुकतंय. कळायचं नाही की बाकी सर्व तर मजेत वाटत आहेत मग मलाच का जमत नाहीये. मग चिडचिड झाली आधी लोकांवर, नंतर स्वत:वरही. शेवटी बोलून, तोडून टाकल्यावर बरं वाटलं. साधी गोष्ट घे, ३१ डिसेंबरला रात्री एकटच रहायची भीती वाटायची, सर्व जग पार्टी करतंय आणि आपण एकटेच म्हणून काय वाटेल याची. :) आता वाटत नाही.

    'माणसे येतील, माणसे जातील,
    आपण सुखें एकटे उरावे.
    मिळतील थोडे सखे-सोयरे.
    भांडा-तंटायला
    एकटे असायला,
    न भिणारे.'

    पटलं आणि आवडलं. :) छान कविता.

    -विद्या.

    ReplyDelete
  3. आभार लोकहो. :)
    माणसांत का माणसांना सोडून हा प्रश्नच नाही येत खरं तर. आपण नसत्या भित्या नाही बाळगल्या तर. राहायची ती राहतात, जायची ती जातात. पण हे कळेस्तोवर वेळ जातो, नि कळल्यावरही वळेस्तोवर. नि वळल्यावर... :)

    ReplyDelete
  4. पण कधी कधी असही होतं. की आधी विचारलेल्या अस का ला पकडून ठेवलं जातं.नव्याने असं का,असं परत विचारायचं धाडस होत नाही.एक सिनेमा आहे,chasing amy म्हणून.त्यात ती Amy gay असते. मग तिला एक मित्र भेटतो आणि मग ते प्रेमात बिमात पडतात. तेव्हा तिचा एक dialougue आहे की जेव्हा मी declare केल मी gay आहे तेव्हा मी विचार केला होता की एक खह 50% population मी का नाकाराव प्रेमात पडायला आणि आता exactly तेच उलट करतेय बाकी 50% population बद्दल. ते मला आठवलं.

    ReplyDelete
    Replies
    1. असं का, हा भौतिक बाबतीत कळीचा आणि अभौतिक बाबतीत निरुपयोगी प्रश्न असतो असा अनुभव.
      अ‍ॅमीबद्दल - लैंगिकता ही फ्लुइड - अर्थात तरल - गोष्ट आहे, हे बिचारीला कुणी शिकवलेलं दिसत नाही!

      Delete