Friday, 22 June 2012

गोष्ट


एखादी गोष्ट आपल्याआत रुजवत जाताना कसं वाटतं ठाऊक आहे तुला?

मोठ्या काव्यमय कल्पना असतात लोकांच्या गोष्टीच्या जन्माबद्दल.
राजकन्या-गुलबकावली-परी-राक्षस-हिमगौरी-बुटके-उडते गालिचे... आणि तत्सम.
पण गोष्ट दिसते तशी असत नाही.

अरब आणि उंटाची गोष्ट माहीत आहे तुला?
त्या गोष्टीतल्या उंटासारखीच असते गोष्ट.
निर्दयपणे हात-पाय पसरत आपल्याला धीम्या-ठाम वेगानं बेघर करत जाणारी.
किंवा निर्लज्जपणे सूर्यासोबत पाठ फिरवत बेगुमानपणे जगत जाणार्‍या सूर्यफुलासारखी.

आजूबाजूला असणारा जिवंतपणाचा कण न् कण शोषून घेत रसरसून वाढत राहते ती आपल्या आत.
आपल्या शांततेवर पोसत आपलाच प्रकाश झाकोळून टाकत राहते,
जोवर आपल्या खिडकीत हिरव्यागर्द-काळोख्या-कातर फांद्यांच्या गच्च पसार्‍याखेरीज दुसरं काहीच उरत नाही.

तिला सोबत घेऊन फिरताना क्षणाक्षणाला कसोटी लागत राहते आपली.
आपल्या समजुती, दिलासे आणि हुंकार नक्की कुणाकरता आहेत?
बाहेरच्या या अफाट भीषण सुंदर जगात शूरपणानं वावरणार्‍या आपल्यासाठी,
की अंतरंग व्यापत जाणार्‍या या तितक्याच सुंदर भीषण निर्दय अस्तित्वासाठी?

या युद्धाच्या जखमा वरकरणी सहजपणे वागवत, दर क्षणाला अधिकाधिक मोडत
जगत राहतो आपण गोष्टीनं बाहेर येण्याचं ठरवेपर्यंत.
एखाद्या भुकेल्या अनुभवी श्वापदासारखे, वाट पाहत.

ती बाहेर येते.
आणि आपण अंतर्बाह्य रिकामे.
त्या क्षणी नेमकं काय वाटतं ते कळून घेण्याचंही भान उरत नाही.
नुसता रिकामा आर्त शिणवटा.

ठाऊक आहे तुला, गोष्ट आपल्या आत रुजवत जाताना कसं वाटतं ते?

7 comments:

 1. सत्य सांगणे आणि कल्पना रंगवणे यांत निवड ठरवतांना सोयीस्करपणे आपण दुसर्‍याला निवडतो आणि तीच गोष्ट होते.. गोष्ट सत्य वर्णनाहून कधीच अधिक पुढे निघून गेली असते.. मी सध्या झेन कोआन वाचतोय, त्यात मला असे वाटते कि झेन साधकांचा गोष्टींवर पूर्णपणे विश्वास नसतोच.. ते कृती करतील पण काही बोलून दाखवणार नाही, कारण काही बोलले कि लगेच ती गोष्ट बनण्यास सुरुवात होते.. एक झेन कोआन आहे, काळे नाक म्हणून, ते असे कि स्वतःचा सोन्याने मढवलेला बुद्धाला घेऊन एक वृद्ध महिला फिरत असते, एकदा ती बुद्धांच्या मुर्त्यांनी वेढलेल्या मंदिरात जाते आणि आपली पूजा सुरु करते. उदबत्ती पेटवत असतांना बघते कि या उदबत्तीचा लाभ फक्त आपल्या सोनेरी बुद्धालाच मिळाला पाहिजे, म्हणून ती एक कोंडाळे करून उदबत्तीचा धूप फक्त त्या मूर्तीला अर्पण करते.. त्यामुळे त्या मूर्तीचा नाकाचा शेंडा काळा होतो. असंच कथा-कथनाने होत असावे असे मला वाटते, एवढ्या मोठ्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व.

  ReplyDelete
 2. @दुरित
  झेन तत्त्वज्ञानाबद्दल मला काहीच ठाऊक नाही. पण गोष्ट सांगताना सत्य आणि कल्पना यांपैकी काहीतरी एकच अशी काळी-पांढरी निवड करता येत नाही, एवढं मात्र मी खातरीनं सांगू शकते.
  बाकी प्रतिक्रियेबद्दल क्षमा कसली? एवढं पांढर्‍यावर काळं करावंसं वाटलं, त्याबद्दल आभार उलट!

  ReplyDelete
 3. गोष्ट कधी कधी इतकी भिनते की आपणच गोष्ट होऊन जातो. छानच झालाय ललित निबंध

  ReplyDelete
 4. तुला खो दिलाय. लिही

  ReplyDelete
 5. wow. ekdum 2 posts. thanx. :)

  ReplyDelete
 6. gosht baher yete khari ani art shinhi detech pan ti yetana ji jhunj magte tinech apan adhikch aat valun pahu shakto. hi jhunjach jeevanachya marmakade gheun jate ase mala vatate. pan mandani khupach uttam

  ReplyDelete
 7. Majhya aat pan rujtey ek gosht aani baher yayla ajun shabd jamle nahiyet sarv. Pan jenvha jenvha vichar yetat manat tujhya ya kavite-chi athavan yete aata. pratyek shabd khara aahe tyatyla. :) Very nice one !

  ReplyDelete