कविता

समोर हिरवंगार जंगल

00:52:00


कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब -
दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा नि सपाट उजाड माळरानांचा नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा आपल्यासाठी - एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा, माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता,
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न, मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.