Wednesday 25 April 2012

नाटक - २


नाटकाला जाताना माझं जे काही होतं, त्याच्याकडे न पाहिल्याचा आव आणून, पण अनिमिष नजरेनं तू पाहत राहतेस माझ्याकडे, तेव्हा तुझ्यासारखंच चेहर्‍याआड दडून तुझ्याकडे बघायला बेहद्द आवडतं मला.

तयारीपासूनच सुरुवात होते आपल्या खेळाला. नाटकाला जाणं हा कार्यक्रम असतो माझ्याकरता. मग ते ’साठेचं काय करायचं?’ असो, वा ’सही रे सही’. त्या कार्यक्रमाचं ’नाटक’पण हाच मुळी एक साजरा करण्याचा सोहळा असतो, या माझ्या ठाशीव मताला किती वेळा छेडलं आहेस तू, गमतीगमतीत. मला ठाऊक नसतं असं थोडंच आहे? पण संध्याकाळी नाटकाला जायचंय म्हणताना आपण आपापल्या भूमिकांचं बेअरिंग घेऊन तय्यार असतो.

चापून-चोपून नेसलेली कलकत्ता साडी, अत्तर, नि अर्थात मोगर्‍याचा गजरा.
वा मऊ सुताचा विटकासा भासेलसा - पण अतीव सुखद स्मार्ट कुर्ता नि किमान चार लोकांची तरी नजर वळेलशी वारली पेंटिंग केलेली दिमाखदार शबनम.
वा माझा आवडता हिरवाशार कुर्ता नि त्यावर लाल-केशरी उधळण करणारी कलमकारी वर्कची ओढणी.

आपण कशात सुरेख दिसतो नि मजेत असतो, हे ठाऊक असतं नाही आपल्याला?

मला कुठल्याही परिस्थितीत वेळेआधी पोचायचं असतं नाटकासाठी. मग तू दुपारची झोप अंगावर आलीशी दाखवत मारे आल्याबिल्याचा चहा-बिहा करत काढलेला वेळ, उग्गाच ’अंघोळ करू का, फ्रेश वाटतं ब्वॉ’ची केलेली सराईत बतावणी, आरशासमोर फेर्‍या घालण्याचा आव आणत तीनतीनदा कपडे बदलणं - जसा काही तुला कपड्यांच्यात इंटरेस्टच असतो, नि मग अगदी निघता निघता दाराशी जाऊन ’अर्रे, अत्तर राहिलं बघ’ म्हणत कुलूप हातात घेऊन चपलांसकट घरभर फिरत अत्तर फवारून येणं... सगळं काही आपल्याला ठाऊक असलेलं. पण आपण दर वेळी नव्यानं रंग भरत, नव्या नव्या जागा नि बारकावे शोधत राहतोच.

तुला माहितीय, माझी भिवई पुरेशी वर चढली की डोळ्याच्या कोपर्‍यातून माझ्याकडे पाहत गुणगुणत तू जिना उतरायला घेतेस, तेव्हा तुझे डोळे चक्क लकाकत असतात.

एकदा खाली उतरलं, की मात्र तुझी स्ट्रॅटेजी बदलते. मग लगबगीनं रिक्षा वगैरे शोधून रंगायतनात पोचेपर्यंत आपण आपला आपल्यापाशी थोडा श्वास टाकतो.

तिथल्या आवारातल्या लफ्फेदार रंगीत गर्दीत मिसळत जाताना मात्र तिकिटं काढल्यापासून आपल्यात नि नाटकात जुळलेलं ’खास काहीतरी’ निमूटपणे जपानी पंख्यासारखं मिटून पर्समधे टाकावं लागतं नि आपण तथाकथित रसिकांच्या गर्दीचा केवळ एक अंश होऊन जातो, तेव्हा दर वेळी मी नव्यानं खट्टू होतेच. ते दडवायसाठी कित्ती सराईतपणाचा आव आणून आटोकाट प्रफुल्लित दिसत राहिले, तरी ते तुझ्या नजरेतून सुटत नाही नि गालातल्या गालात हसत चेव आल्यासारखी गर्दीतल्या ओळखीच्या मंडळींना शोधत हाय-हेल्लोचे संतापजनक सोपस्कार करतच राहतेस, तेव्हा मला आपल्यातल्या खेळाचा विसर पडल्यासारखा होतो नि माझं सामाजिक हसणं अधिकाधिक कृत्रिम-नाटकी होत जातं.

हा जणू क्यू असावा, तशी पहिली घंटा होते नि आत शिरायसाठी लोक मारे शिस्तीनं रांग-बिंग लावतात.

आता इतक्या सार्‍या प्रयोगांनंतर तरी या प्रसंगातली रंगत ओसरावी ना? पण नाही, आपल्यातलं नाटक अजून चांगलंच जिवंत आहे याचा पुरावा दिल्यासारखा तुझा रांग-बिंग लावायला ठाम, मूक आणि सातत्यपूर्ण नकार. मला कित्ती वाटलं तरी मी एकटीच काही मी रांगेत उभी राहायला जाणार नाही, हे तुला नीटच माहीत असतं. आजूबाजूची बेशिस्त गर्दी ओसरत, रांग हळूहळू मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाते, नि माझे तुझ्याकडे टाकलेले कटाक्ष अधिकाधिक तीव्र होत जातात. नाटक चालू होण्याआधी तिथल्या लालसर-सोनसळी प्रकाशात, जिवंत भासणार्‍या शांततेत, रंगायतनातल्या अद्वितीय पडद्याला ’य’व्यांदा प्रेमभरानं न्याहाळत स्वतःपाशी पोचायला तुलाही आवडतंच की. पण माझ्या चेहर्‍यावरची घायकुती पाहायसाठी तू तेही हसत हसत अव्हरतेस, तेव्हा आपल्यातलं हे नाटक तुझ्यासाठी किती नि कसं कसं जिवाजवळचं आहे ते जाणवण्याचा नि त्यामुळे माझ्या चेहर्‍यावरचा रागाचा मुखवटा सरकण्याचा धोका असतो, तो हाच क्षण.

तेवढा निसरडा क्षण पार करून आपण अखेर आत शिरतो, तेव्हा आजूबाजूचं नेपथ्य एकदम फिरत्या रंगमंचासारखं जादुईपणे बदलतं नि आपण अंधाराच्या प्रदेशात प्रवेश करतो. इथून पुढे आपल्यातल्या या खेळाची तंत्रं आणि तीव्रताही बदलणार - उंचावणार आहेत, अनिश्चित - धोकादायक असू शकणार आहेत याचा जणू गर्भित इशारा मिळतो नि आपण एक दीर्घ श्वास घेतो, तो काही फक्त एसीचा नि अत्तरांचा चिरपरिचित संमिश्र वास आल्यामुळे नव्हे.

इथून पुढे आपण आपापले असतो आणि नसतोही.
हळुवार मावळत जाणारा प्रकाश, जिवंत अंधार नि निवेदकाचे मंतरलेले शब्द. पडदा उघडताना आपण कुणाचे कुणी नसलेले.
आपल्यातल्या नाटकाची सूत्रं समोरच्या अदृश्य सूत्रधाराकडे देऊन जणू विंगेतून नाटकातलं नाटक पाहायला लागलेले...

मी तुझ्याआधीच पाहिलेलं नि मला आवडलेलं इत्यादी नाटक असेल, तर या सगळ्याला एक भीषण कडा असते. समोरच्या खेळाचा मालकीहक्क नि जबाबदारीही जणू माझ्याकडे असल्यासारखी असते. नटानं फम्बल केलं, आवाज लागावा तसा लागला नाही, प्रयोग म्हणावा तसा रंगला नाही... माझीच चारचौघांत फजिती होणार असल्यासारखा माझा जीव गोळा होतो नि तुझ्या चेहर्‍यावरच्या प्रशस्तिपत्रकाकडे न राहवून माझं वारंवार लक्ष जात असतं. हे तुला कळल्यापासून होता होईतो तुझी पसंती वा नापसंती तू बेशरमपणे स्वतःपाशीच राखून ठेवतेस, हे माझ्या अलीकडेच लक्षात आलं आहे...

पण प्रयोग देखणा, श्रीमंत आणि तालेवार निघाला की आपण नकळत सैलावतोच.

त्याच नशेत बाहेर पडताना कुणी गाठून एकदम नाटकाशी संबंध नसलेल्या हवापाण्याच्या अश्लील गप्पा मारायला लागू नयेत, म्हणून मी हट्टानं मागे रेंगाळते, तोवर आपल्यातल्या नाटकाच्या शेवटाचे वेध तुला लागलेले असतात नि सगळ्या मिश्किलीचे रंग नकळत उतरून तुझा खरा - विनामुखवट्याचा ओलसर चेहरा डोकावायला लागलेला असतो. पण मग पडदा पडेस्तोवर नाटक चालू ठेवायचंच अशा ईर्ष्येनं, अंधारातून उजेडात येताना मी तुझ्या खांद्याला हलकेच स्पर्श करते नि ’आवडलं?’ असा प्रश्न अल्लाद तुझ्या पुढ्यात टाकते.

आता निर्णय तुझा असतो...

आपल्या भूमिका पाहता पाहता बदललेल्या असतात.

3 comments:

  1. waa. kay masta lihilaye. matrini sobat naatak baghane ha maza hi awadata karyakram ekdum.

    ReplyDelete
  2. क्लास! हॅट्स ऑफ!!

    ReplyDelete