बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे...

22:25:00


मला बीबीसीच्या शेरलॉकबद्दल लिहायची भीती वाटतेय. त्यातलं सगळंच मला इतकं जास्त आवडलंय, की माझे शब्द त्याच्यावर उडवून त्या सगळ्याची मी वाट लावीन अशी भीती.

राधिकाचा हा लेख वाचूनसुद्धा या मालिकेकडून माझी फार काही अपेक्षा नव्हती. रहस्यकथेकडून, गुप्तहेरकथेकडून आपण काय अपेक्षा करतो? काय घडलं त्याबद्दल आमच्या डोक्यात पुरेशी उत्सुकता निर्माण करा. मग आम्हांला बिनडोक न समजता आम्हांला पडलेल्या प्रश्नांचं चलाखपणे निरसन करा. घरी जाऊन शांतपणे झोपा. संपलं.

बीबीसीचा शेरलॉक हे सगळं करतो, अगदी झोकात आणि जगावेगळ्या हुशारीनं करतो, पण त्यात त्याचं काही कौतुक नाही. त्याच्या बापानं - आर्थर कॉनन डॉयलनं - ते त्याच्या घटनेत बांधून ठेवलंच आहे. पण त्यातली नाती? इतकी खोल आणि इतकी सूक्ष्म? ती कुठे होती डॉयलच्या पुस्तकात? ती कुठून शोधली या बीबीसीवाल्यांनी? त्यांचं म्हणणं म्हणे असं की ही बेहद्द जवळची मैत्री डॉयलच्या पुस्तकातपण होतीच. आहेच.

बरं, असेल.

पण शेरलॉकच्या अथांग काटेकोर बुद्धीमागे दडलेलं त्याच्यातलं निरागस मूल? आपल्याच भावाच्या छायेत गुदमरलेलं लहानपण सोडवून घेताना त्याच्यातल्या बंडखोरानं काढलेला फणा आणि त्यातून आलेली त्या दोघांमधली ती शाळकरी खुन्नस? तो मुखवटा कधी कधी, टोकाच्या काळजीच्या क्षणी गळून पडतो तेव्हा एकमेकांबद्दल वाटणारी कोरडी-खिन्न तरी अपरिहार्य काळजी? शेरलॉकला कधीच न उमजलेले - न भेटलेले लैंगिक आकर्षणांचे अज्ञात प्रदेश? त्यातून स्त्री या प्राण्याशी वागताना त्याच्यात येणारं ते आक्रमक - अलिप्त चिलखत? आणि तरीही मिसेस हडसनवर भाडोत्री गुंडांनी हल्ला केल्यावर पेटलेली त्याची नजर? एकाच वेळी माणसांना आरपार वाचायची क्षमता असणं आणि तरीही भावनांच्या ओशट लिप्ताळ्यापासून फारकत घेण्याचा त्याचा, कोण जाणे कशातून आलेला, पण पुन्हा पुन्हा कसाला लागणारा निर्णय?

भावनांपासून घटस्फोट घेण्याची भाषा करणारा हा चक्रम माणूस. पण त्याच्यातल्या सगळ्या विरोधाभासांवर प्रेम करणारी माणसं त्याच्याभोवती कशी अचूक जमतात. त्याच्यातल्या उद्धट टीनेजरला प्रसंगी झापतात, त्याच्या विक्षिप्तपणावर वैतागतात, प्रसंगी त्याला हक्कानं पेचात पकडून त्याची मजा पाहतात, त्याच्या नित्य नव्या साहसांमागे नाईलाजानं-आनंदानं-आवडीनं फरफटली जातात, त्याच्या तर्कशक्तीच्या ताकदीनं रोज नव्यानं चकित होतात. पण त्यानं केलेले अपमान, त्याचे टोमणे, त्याचं गृहित धरणं, समजुतीनं स्वीकारत त्याच्याभोवती जणू कडं करून असतात.

घरमालकीणबाई मिसेस हडसन, लॅब असिस्टंट मॉली, डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर लेस्ट्राड, शेरलॉकचा भाऊ मायक्रॉफ्ट...

आणि अर्थात जॉन. जॉन हॅमिश वॉटसन.

ही सगळी मंडळी त्याच्यातलं मूल प्रेमानं, लटक्या रागानं, प्रसंगी अचंब्यानं, न्याहाळत - जपत असतात.

मग बीबीसीचा नि मॉफ्टिसचा शेरलॉक त्याच्या बापाच्या रहस्यकथांच्या मूळ सपाट चौकटीतून बाहेर येतो जणू. जिवंत होतो. तुमच्या-आमच्यासारख्या एकविसाव्या शतकात वावरतो. ड्रग्स आणि सिगारेट्स या दोहोंवरही बंदी आणणार्‍या आजच्या लंडनमधे प्रसंगी एका वेळी तीन-तीन निकोटीन पॅचेस वापरतो आणि होम्सच्या लौकिकाला साजेसं अद्ययावत तंत्रज्ञान वापरत आजच्या पोलिसांहूनही मैलभर पुढेच असतो. त्याला अपरिचित असणारे भावनिक गुंते अंगावर घेताना त्याची तिरपीट उडते, तेव्हा त्याच्या कासाविशीच्या कल्पनेनं गुदमरायला होतं, आणि तरी हा तालेवार बुद्धीचा माणूस या गुंत्याला कसा सामोरा जाईल, ते पाहायला सरसावून बसावं लागतंच!

पण तो इथेच थांबत नाही. वाढतो. स्त्री-पुरुषांमधले अगम्य आकर्षणांचे पेच, त्यानं कधीही स्वतःबद्दल न अनुभवलेली साशंकता - बिचकता आत्मविश्वास - चक्क भीतीही... या सार्‍याला सामोरा जातो. आणि सरतेशेवटी आपलं माणूसघाणेपणाचा मुखवटा निदान स्वतःपाशी तरी उतरवून ठेवण्यापर्यंत पोचतो...

हे सगळं कुठे होतं डॉयलच्या पुस्तकात?

अस्सल ब्रिटीश माणसाचं त्याच्या भाषेवरचं प्रेम, ब्रिटीश परंपरांना हट्टानं जपणं, राणीवर आणि लंडन शहरावर घरातल्या एखाद्या वडीलधार्‍या माणसासारखं प्रेम करणं, सतत कुरकुर कुरकुर करणं, त्याच परंपरेला फाटा देत, काळाचं पाऊल ओळखत, समलैंगिकतेला बिचकत का होईना, पण रोजच्या आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारणं - अगदी त्यांच्या लाडक्या होम्स आणि वॉटसनबद्दल वात्रटपणे भिवया उंचावल्या गेल्या, तरीही तो विनोद सहज एन्जॉय करण्याइतपत... हे सगळं तरी कुठे होतं?

हे सगळं शब्दांच्या निसरड्या आधाराशिवाय म्हणतं कुणी, तेव्हा त्या नि:शब्द सौंदर्याच्या ओझ्याखाली दबून जायला होतं. वाटतं, खरंच का हे सगळं आपल्याला दिसलं, की आपण फक्त कल्पना रचल्या, आरसा पाहण्याच्या तीव्र इच्छेपोटी? त्या आरशातल्या प्रतिबिंबाला बोट लावताना भीती वाटते. डहुळून - निसटून गेलं म्हणजे?

तो इर्शाद कामिल म्हणून गेला आहे ना - जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे.... त्यातली गत.

***

एखाद्या खुळचट टीनएजर पोरीसारखं मला शेरलॉकचं आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक लहान-सहान गोष्टीचं वेड लागलं होतं. रेषेवरची अक्षरेवरच्या या खोमुळे त्याला वाट मिळाली. त्या खोवरचे ए सेन मॅनचेच शब्द इथे देतेय -

तुम्हांलाही कधी भेटले असतीलच की कुठलेतरी साहित्यिक, कलाकार, साहित्यकृती, कलाकृती... त्याबद्दल लिहा ना. त्यांच्याबद्दल, त्यांच्या भेटण्याबद्दल. कसं नि काय लिहायचं ते तुम्हीच ठरवा. वानगीदाखल गायत्रीचं हे ‘कॅराव्हॅजिओ’ या शीर्षकाचं जुनं पोस्ट पाहा. चित्रभाषा या विषयावरची शर्मिलाची ही सुंदर मालिका पाहा, केवळ चित्रभाषा समजून घेण्यासाठी नव्हे, तर अशा कलाभाषांविषयीच्या एका डोळस दृष्टिकोणासाठीही. ही केवळ उदाहारणं. कलाकार / साहित्यिक / कलाकृती / साहित्यकृती जगप्रसिद्धच हवी; अनुभव चाकोरीबाहेरचाच असावा, असे काही आग्रह नाहीत. चटका बसल्यावर बहिणाबाई आठवल्या असतील तरी, आणि जाता जाता कुठल्या मासिकात / ब्लॉगवर वाचलेलं असं भेटलं असलं तरी चालेलच की. लिहिलंत की दुवा प्रतिक्रियेत द्या, म्हणजे ते एकत्रित राहील.

***

माझा खो प्रथमेश, गौरी आणि आतिवास यांना.

You Might Also Like

2 comments

  1. Uttam! kho ghetla te ani Sherlock baddal lihila te hi...
    He is my all time favorite detective!

    ReplyDelete
  2. घेतला तुझा खो. :)(http://prathameshnamjoshi.blogspot.in/2012/04/blog-post.html)

    ReplyDelete