Thursday 30 September 2010

सांजावून आलेले..

सांजावून आलेले.
भीती काजळी धरून येते.
करकरीत तिन्हीसांजा.
ठोका चुकतो काळजाचा.
पाऊल पुढे टाकवत नाही.

अंधुकलेल्या उजेडात-
धुसर वाट लांबवर.
चालल्याशिवाय इलाज नाही हे ठाम माहीत असलेले.
थांबून जिवाला गोड लागण्याइतके नशीब नाही आपले.
चहूबाजूंनी अंधारून येते आहे-
कुणी अंगावर चाल करून यावे तसे.
आतड्याची माणसेही लांबवर
निवार्‍याला.
आपापल्या उद्योगात.
गाढ बुडून.
ती त्यांची वाट असेल...
आपली आपल्यापाशी.
सोडता येत नाही.
पाऊल पुढे टाकवत नाही.

या पावलापुढे पसरून आहे
जन्मजन्मांतरीचे भय.
अशुभाच्या एकवटून आलेल्या चाहुली.
निर्धाराला कळंजून टाकणारी दु:स्वप्ने.
कसे टाकावे पाऊल?
टाकवत नाही.

या पावलाला जिंकले पाहिजे.
असलेनसलेले बळ एकवटून एकदाच.
मग कभिन्न रात्र येईल.
उत्तररात्रही.
आणि मग हळूहळू उजाडेल.

Wednesday 22 September 2010

भय इथले संपत नाही...

चौकटीचा मोह कुणाला कधी सुटलाय? आणि चौकट मोडण्याचं अनिवार आकर्षणही?

कुणीसं म्हटलंय, तसा हा न संपणारा खेळ. हिवाळ्यातल्या साळिंदरांच्या खेळासारखा.

एकमेकांच्या उबेसाठी अधिकाधिक प्रेमानं एकमेकांच्या जवळ सरकत राहायचं आणि मग काटे टोचायला लागले की पुन्हा एकदा फणकारून लांब.

लांब-जवळ-लांब-जवळ-लांब....

अंतहीन.

***

कुटुंब। [कुटुऽम्ब] (बा-, बे, बां-) नपुं. सा. ना. - १. विवाहित (पाहा: विवाह) जोडपे, त्या जोडप्याची मुले व जोडप्याशी बहुतकरून रक्ताचे नाते असलेली कमीअधिक वयाची माणसे यांनी बनलेले, एका किंवा अनेक घरांत (पाहा: घर) पसरलेले, परस्परावलंबी आणि परस्परपूरक सदस्य असलेले, दुर्भेद्य सामाजिक एकक. २. पत्नी (लाक्ष.) - आपट्यांचे कुटुंब माहेरी गेलेले दिसते. कौटुंबिक वि. - कुटुंबाशी संबंधित (बाब); सर्व कुटुंबाला एकत्रितपणे उपभोग घेता येण्याजोगा (चित्रपट, नाटक); कुटुंबवत्सल (गृहस्थ) समा.परिवार;


।-कबिला - कुटुंब, बहुतकरून दूरचे नातेवाईक आणि इतर आनुषंगिक गोष्टी (कुटुंबसदस्य मानले जाणारे पाळीव प्राणी, कौटुंबिक जबाबदार्यात इ.) यांचा एकत्रित समुच्चय.


।संस्था - कुटुंब या एककाच्या माध्यमातून सर्वस्पर्शी सामाजिक व्यवस्था निर्माण करणारी संस्था.

***

आपल्याला लग्न नावाचा प्रकार हवाय की नकोय?

हवा असेल तर कशासाठी कुठल्या-कुठल्या किंमती भरून? चूक-बरोबरचे तर्क निर्धारानं बाजूला ठेवले काही काळ, तरी कुणालातरी दाखवण्यासाठी म्हणून आपला फोटो काढणं आपल्याला जमेल का?

न आवडलेल्या ’स्थळा’ला नकार देताना पत्रिका ढालीसारखी वापरतात, हे कितीही तार्किक पद्धतीनं पटवून घेतलं, तरी कुणी जोडीदार सापडण्याच्या आशाळ-चिकट मोहापायी आपली पत्रिका+फोटो+अमुक इतका पगार+जात+आवडता लेखक/दिग्दर्शक+ आवडता रंग या छापाची माहिती कुणाला पाठवणं आपल्याला जमेल का?

ज्या भावंडांसोबत वाढून आपण इतके विचारी-बिचारी होऊन बसलो, तीच भावंडं आपापली लग्नं जमवताना ’अरे, नवीन पंच्याऐशीची मॉडेल्स आलीयेत म्हणे बाजारात’ अशी मस्करी स्वत:शीही करू शकतात आणि त्यांच्या-त्यांच्या घरातली वडीलधारी माणसं या विनोदांवर माफक का होईना हसू शकतात; तर त्यांनाच समकालीन असलेल्या आपल्याला -

संस्कृतीच्या माजघरी-सुखद काळोखातून, स्त्रीमुक्ती आणि मग स्त्रीवादाचे वळसे बळंच पचवत, समलिंगी संबंध हाही नॉर्मल आयुष्याचा एक भाग असू शकतो या जाणीवेच्या कड्यावर बळंच आणून लोटलेल्या आणि तरीही डोळ्यांवरची पट्टी सोडायला हट्टीपणानं नकार देणार्याय एका समाजात जन्मलेल्या-वाढलेल्या आपल्याला-

कॉलेज आणि तत्सम पौगंडाळू वयातून पुढे आलेल्या, प्रगल्भ आणि नकारात्मक- डोळस आणि कडवट-शहाण्या आणि निबर असलेल्या आपल्याला-

जवळच्या मित्रमैत्रिणींना लग्नाच्या चौकटीत जाऊन निराळंच कुणी होताना पाहणार्‍या आणि आपल्याच निनावी पझेसिव्ह नात्यांचे काच न बोलता चुपचाप साहणार्‍या पिढीतल्या आपल्याला-

जोडीदार या गोष्टीबद्दल कितपत स्वप्नाळू राहणं परवडू शकतं?

तटबंदीबाहेरचे रोकडे प्रश्न. म्हटलं, तर आपण त्या गावचेच नाही असं दाखवत - तिर्‍हाईत खुनशी नजरेनं परतवून लावता येणारे.

तटबंदीच्या आत?

गळ्याला मिठी घालणारं कोवळं भाचरू. नातेवाइकांनी घरात हक्कानं घेतलेला पाहुणचार. निभावलेली परस्परांची दुखणी-बाणी. खिदळत जागवलेल्या मंगळागौरी. पहिल्यावहिल्या पगाराचे पैसे घरी आणल्यावर घरातल्या वडीलधार्‍या माणसानं काढलेली दृष्ट. दबक्या पण उत्साही-खवचट आवाजात केलेली गॉसिप्स...

जी कधीच कसलेच प्रश्न विचारत नाही, जिच्यात सहेतुक निवडीतल्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदार्‍यांचा लवलेशही नसतो, जी एकत्र राहिल्यावर कुत्र्या-मांजरांबद्दल आणि कुत्र्या-मांजरांनाही चुकत नाही, जिच्यात वाहत्या आयुष्याचा अटळ-हताश-प्रवाही स्वीकार असतो-

अशी ओढाळ-चिकट-निर्बुद्ध माया...

***

विवाह। [विवाऽह] (हा-, ह, हां-) पुं. सा. ना. - स्त्री व पुरुष (पाहा: वधू-वर) यांनी परस्परांशी केलेला; कुटुंबसंस्थेला (पाहा: कुटुंब) जन्म, अधिष्ठान आणि संरक्षण पुरवणारा; आजीव सहजीवनाचा आणि एकनिष्ठेचा सामाजिक करार. (या करारानंतर वधू-वर / स्त्री-पुरुष हे पती-पत्नी होतात आणि एकत्रित सहजीवनाला (पाहा: संसार) सुरुवात करतात. घटस्फोट या आधुनिक विधीने हा करार रद्द करता येतो (पाहा: घटस्फोट)). अनुलोम-, प्रतिलोम-, गांधर्व- इ. (जातींच्या उतरंडी व धार्मिक मान्यता यांच्या प्रतवार्यांलवर आधारित विवाहाचे निरनिराळे प्रकार) समा.लग्न, शरीरसंबंध (कालबाह्य), पाट(लावणे) (धार्मिकदृष्ट्या विवाहाइतकी राजमान्यता नसलेला, पण लोकमान्यता देणारा, उच्चवर्णीयांमध्ये प्रतिष्ठा नसलेला प्रकार, निकाह (मुस्लिम* धर्मातील विवाह);


।बाह्य (संबंध) - लग्नाच्या जोडीदाराखेरीज तिसर्यात व्यक्तीशी ठेवलेले (शारीरिक / मानसिक / आत्मिक संबंध) (पाहा: व्यभिचार);


।विधी - वधू-वरांच्या कराराला पूर्णत्व देणारा धार्मिक संस्कार. (आधुनिक समाजात धार्मिक विधीचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र या विधीशिवाय कराराला वैधता देणारा कायदेशीर विवाहविधीदेखील अलीकडे लोकसंमत होऊ लागला आहे. धार्मिक विधीमध्ये ’देव, ब्राह्मण आणि वयोवृद्ध’ या साक्षीदारांना परंपरा महत्त्व देते, तर कायदेशीर विवाहविधीमध्ये सज्ञान वधूवर आणि दोन सज्ञान साक्षीदार विधीची पूर्तता करू शकतात.);


।संस्था - विवाह या धार्मिक-सामाजिक विधीच्या माध्यमातून साधनसंपत्ती, सत्ताकारण आणि समाजकारण यांवर नियंत्रण ठेवू पाहणारी; सामाजिक दबावाचा प्रभावी वापर करणारी; काही विशिष्ट अटींच्या पूर्ततेच्या बदल्यात व्यक्तीला समाजगटाचा भक्कम आधार पुरवणारी लोकप्रिय आणि यशस्वी संस्था;


।सोहळा - आप्त-मित्रांचा गोतावळा आमंत्रित करून त्यांच्या मान्यतेसह जाहीरपणे केला जाणारा विवाहविधी व त्यासह सामाजिक दबाव व रूढीपोटी अपरिहार्य होणारे बहुतांशी खर्चीक स्नेहभोजन.

***

घर [घऽर] (रा-, रे, रां-)* नपुं. सा. ना. - १. सुरक्षित निवार्‍याला उपयुक्त असे, मालकीचे किंवा भाड्याचे, लहान किंवा मोठे, ठिकाण २. कुटुंबातील (पाहा: कुटुंब, विवाह) सदस्यांमधील चिवट नातेसंबंधांतून जन्म घेणारे जिव्हाळ्याचे वातावरण जेथे आहे, असे वास्तव्याचे ठिकाण; (एखाद्याशी) घरोबा करणे - (एखाद्याशी) विवाह करणे; घर थाटणे - अ] विवाह करून संसाराला सुरुवात करणे आ] नवीन घरात राहायला सुरुवात करणे; (एखाद्याच्या) मनात घर करणे (लाक्ष.) - एखाद्याच्या मनात जिव्हाळ्याची जागा मिळवणे गुलाबी ओढणी घेणार्‍या मुलीने चंदूच्या मनात घर केले, एखादी कल्पना मनात पक्की रुजणे चित्रपटात काम मिळवण्याच्या कल्पनेने तिच्या मनात घर केले समा.आलय, गृह, घरकुल, निवास, सदन;


-काम - घरातील स्वयंपाक, साफसफाई, बाजारहाट इ. काम;


-जावई - विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायचे या रूढीसंमत प्रकाराने न वागता पत्नीच्या मातुलगृही वास्तव्याला येणारा पुरुष;


।-दार - कुटुंबसंस्थेचा आधार, तसेच त्यातून व्यक्तीला जन्माने प्राप्त होणारी किंवा घर थाटून (आ]) थाटून मिळवता येणारी मालमत्ता.

***

मला ते घर अनेकदा दिसतं स्वप्नात.

तसं ते देखणं.

काहीसं काळोखलेलं. पण देखणंच.

पुढ्यातली बाग, मग अंगणातला मांडव, पडवी, ओटी, माजघर. ओटीवरून माजघरात जाताना लागणारं, एकात एक गेलेल्या अनेक काळ्या-कुळकुळीत नक्षीदार चौकटींचं, भलं-मोठ्ठं दार आणि त्यातून आत गेलं की लगेच उजव्या हाताला माडीचं दार. लाकडी जिन्यावरून वर माडीत गेलं, की मागे विहिरीकडे डोकावून पाहणारी घरगुती स्वभावाची, काहीशी जुनाट भासणारी माडी, मागचं तुळशीवृंदावन आणि पलीकडचं हिरवं परस. पुढे बागेकडे पाहणारी परीटघडीची, शिष्ट पण टुमदार माडी.

माजघरातून आत जाताना प्रशस्त देवघर आणि तिथला तो रोखून पाहणारा गणपती. आत गेलं की चूल-वैलासकटचं, सारवलेलं, कौलाच्या जागी घातलेल्या काचेतून येणारा कवडसा मिरवणारं, अंधारा-उजेडाच्या कोलाजानं न्हालेलं स्वैपाकघर. मागे न्हाणी आणि विहिरीकडे उतरणारी पडवी.

देवघराच्या मागे स्वैपाकघर आणि माजघराला जोडणारी अंधारी बोळकांड. ती थेट बाळंतिणीच्या खोलीच्या दाराच्या पुढ्यात बाहेर पडते...

लालचुटूक कौलं. पाणपट्ट्या. तेलपाणी केलेले पडवीचे एकसारखे लाकडी गज. खिर्र-कट्ट वाजणारा पितळी कड्यांचा झोपाळा.

ओटी आणि पडवीला वेगळं करणार्‍या तीनच दगडी पायर्‍या. मग काळाकभिन्न खांब. खांबापासून ओटीच्या भिंतीपर्यंत एखाद्या सदरेवर असावा तसा डौलदार लाकडी कठडा. त्याला काटकोनात असलेल्या भिंतीवर उघडणारी नक्षीदार जाळीची खिडकी. तिच्यातून डोकावून पाहिलं, तर बाळंतिणीच्या खोलीतल्या खोल अंधाराखेरीज काहीच दिसत नाही...

झोपेतून जाग येते, तेव्हा त्यातल्या देखणेपणापेक्षाही तिथे गोठून राहिलेल्या काळाचं एक चमत्कारिक दडपण जाणवतं. दिवसभर जाणवत राहतं.

एखाद्या करड्या नजरेच्या गूढ पुराणपुरुषासारखं त्या घराचं असणं. आपली जिवंत मुळं जमिनीच्या पोटात खोलखोल विस्तारत गेलेलं, वठल्याश्या भासणार्‍या विस्तीर्ण-करड्या खोडासारखं आणि तरीही ओलसर पालवल्यागत नव्हाळ-पोपटी भासणारं. त्याचं अतीव आकर्षण आणि पराकोटीचा तिरस्कार - एकाच वेळी. त्याच्या काळोख्या थंडगार पोटात खोल दडून काळाचं भान गमावून बसावं असा पावलांना खेचणारा जीवघेणा-रसरशीत-काळाशार मोह, आणि त्याच वेळी आपल्या पाखंडी-बंडखोर-बेताल वागण्यानं त्याची मुळं निर्दयपणे उचकटत जावं-आतल्या बुरसटलेल्या काळोख्या कोनाड्यांना दिवसाच्या निर्लज्ज उन्हात उघडंवाघडं करत जावं असा आतून उसळणारा धगधगता विखार...

या परस्परविरोधी ताकदींचं का हे दडपण? कुणास ठाऊक.

स्वप्न पडायचं थांबत मात्र नाही...