माझ्या प्रियकराची प्रेयसी...

02:04:00

ती होय, ती माझ्या प्रियकराची प्रेयसी.
होय होय, प्रेयसीच.
तिच्याच नसण्याचा गंध आमच्या रोमॅण्टिक रात्रीला.
तिच्याच हसण्याचे बंध आमच्यातल्या मॅच्युअर्ड मैत्रीला.
छे! जेलसी? काहीही काय!
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
ती माझ्या प्रियकराची प्रेयसी!
बस.

---

तो कविता लिहून वहीचं पान उलटून टाकतो. पण कविता अजून संपलेली नाही, हे त्याला पक्कं ठाऊक आहे. तसा तो शब्दाचा पक्का. म्हणजे वचन पाळणारा वगैरे भंपक अर्थानं नव्हे. शब्दाचा पक्का, म्हणजे पक्का लेखक. कविता लिहिणं थांबलं, म्हणजे कविता संपत नाही. ती आपल्यापासून पुरती तुटावी लागते, हे त्याला पक्कं ठाऊक. तर अजून कविता संपलेली नाही. संपेपर्यंत चिंता नाही. संपेपर्यंत सुटका नाही. ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू आयुष्य.

तर तशा त्याला बघून काकू नेहमी खुशालतात. ’तुझी मैत्रीण गेलीय बाहेर, पण माझ्याशी मार की गप्पा,’ असं म्हणून नव्या पुस्तकांवर वगैरे त्याला यथास्थित पकवतात. पण परवा ’काकू, पोरीचं शिक्षण झालं आणि ती ऑलरेडी वयात आलीय म्हटल्यावर लग्न करून द्यायलाच हवं का लगेच,’ असं त्यानं काहीश्या बेसावधपणे विचारलं, तेव्हा ’हो. हवंच’ हे त्यांचं उत्तर आणि ’हवंच’नंतरचा ठळक टायपातला पण अदृश्य पूर्णविराम त्यानं ऐकला आणि त्याच्या डोक्यात सर्रकन काहीतरी हललं. तसं कळेल त्याला उपरोधिक आणि नाही त्याला निर्मळ वाटेलसं आपलं हातखंडा हसू हसत त्यानं तो क्षण सहज खिशात घातला खरा. पण ’घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय’ची नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.

मैत्रीण त्याची प्रेयसी नव्हे. तोही मैत्रिणीचा प्रियकर वगैरे नव्हे. ते तसले ’प्यार - मोहोब्बत - दोस्ती’वाले करण जोहरी फण्डे त्यानं आणि मैत्रिणीनं कटाक्षानं लांब ठेवलेले. त्याचं लेखक असणं; ती तिच्या बॉयफ्रेंडशी भांडून, वैतागून पार रडकुंडीला आली की तिला बाईकवरून सुसाट घुमवणं; तिला अजून नीट पेटवता येत नाही, पण मनापासून आवडते म्हणून खास प्रसंगी हातात बापानं चॉकलेट ठेवावं तशी तिच्या हातात सिगरेट पेटवून देणं; व्यासापासून तुकारामपर्यंतचा तिचा इतिहास वेळोवेळी घोटवून घोटवून, दर भांडणात कोट्स, कथा आणि किस्से तोंडावर फेकून पक्का करून घेणं; स्वत:चा काही कारणानं भडका उडाला की तिला फोन करून सुमारे तीन मिनिटं अवाक्षरही न बोलता फक्त आपला श्वास काबूत आणत राहणं... हे सगळं आणि असलं बरंच त्यांच्यामधलं शेअरिंग. बरंच बोलून, बरंच न बोलता. पण त्यांच्या इतर माणसांशी असलेल्या नात्यांवर छाया पडत राहावी इतकं आणि असं अथांग. हे सगळं वजा करून ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडशी काय आणि कसं बोलत असेल, हा चिवट प्रश्न या आठवड्यात त्याला कितव्यांदातरी पडतो. या वेळच्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल त्यांच्यात तसं विशेष बोलणं झालेलं नाही. म्हणजे नेहमीसारखी चर्चा इत्यादी घडलेली नाही. पण चर्चा न घडताही, नेहमीचंच बोलत असल्याच्या आविर्भावात कळत नकळत मैत्रीण त्याच्याबद्दल पुरेसं बोललेली आहे. आपली भिवई नकळत उंचावते आहे हे त्याला जाणवून, किंचित आश्चर्यानं पण सफाईदारपणे, त्यानं विषय बदलूनही. हे निराळं आहे याचीही नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.

तो अस्वस्थ होऊन खांदे उडवतो आणि मनात उगवलेले शब्द कागदावर रुजवत जातो. त्याला इतकंच करणं शक्य आहे. बस.

---

ती चांगले मुलींसारखे ठसठशीत झुमके घालणारी,
थोडी लाडीक, थोडी निर्बुद्ध, बरीच भित्री.
पण विलक्षण उत्कट. विलक्षण नशीबवान. विलक्षण ’बाई’.
तिच्या ’बाई’पणातच माझ्या प्रियकराच्या पौरुषाच्या पहिल्यावहिल्या पाऊलखुणा.
त्याच्या काहीश्या परिपक्व शहाण्या आणि पुष्कळदा सेक्सी टकलावर तिच्यासोबतच्या प्रेमभंगाच्या खुणा.
तिला कशी स्वीकारू?
आणि तिला कशी नाकारू?
ती माझ्या प्रियकराची पहिली प्रेयसी.

---

कविता संपत नाही. एरवी यावरून फ्रस्टेट होऊन त्यानं मैत्रिणीशी हमखास वादळी भांडण उकरून काढलं असतं. पण या वेळी नाही. स्वत:तून जणू निराळा होऊन, एखाद्या अनुभवी सुईणीसारखा एकाच वेळी सराईतपणे नाजूक आणि कुशलपणे निर्दय होत तो कविता वेगळी होताना निरखतो आहे.

आज मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला भेटायचं आहे. वर वर बिनधास्त असल्याचं दर्शवत खिदळणारी मैत्रीण त्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे घारीच्या नजरेनं पाहत असणार हे त्याला ठाऊक आहे. सगळे प्रश्नं, सगळी गुपितं, सगळे पराकोटीचे वैताग, सगळ्या नव्हाळीच्या कविता निरागसपणे त्याच्या पुढ्यात आणून टाकणारी मैत्रीण. त्याच्या निष्प्राण सराईत शब्दांना एका नापसंतीच्या कटाक्षासरशी मोडीत काढून त्याला चकित करणारी त्याची धिटुकली जाणकार मैत्रीण. तिच्या सगळ्या प्रतिक्रिया आता म्हटलं तर त्याच्या नजरेतल्या पसंतीदर्शक छटेवर अवलंबून आहेत.

इथे त्याला जबाबदारीच्या जाणिवेनं पोटात एकदम खड्डा पडल्यासारखं होतं.

पण म्हटलं तर बॉयफ्रेंडला त्याला भेटण्यासाठी आणते आहे म्हणतानाच तिनं पसंती-नापसंतीचे सगळे पूल एकटीनंच पार केले असल्याचंही उघड आहे.

इथे त्याला एकदम आउट होऊन मैदानाच्या बाहेर बसल्यासारखं हेल्पलेस वाटतं.

असले जीवघेणे झोके घेत तो त्या दोघांना भेटतो. सराईतपणे बेअरिंग सांभाळून असला, तरी त्याला तारेवरून चालणारी डोंबारीण असल्याचा फील येतो आहे, हे मैत्रिणीपासून लपत नाहीच. पण त्याला चकित करण्याची आपली नेहमीची लकब वापरून ती नेत्रपल्लवीतून सहजपणे उलटा त्यालाच धीर देते. बघता बघता बॉयफ्रेंडशी हॉवर्ड रोआर्कबद्दल जिव्हाळ्यानं बोलण्याइतकी कम्फर्ट लेव्हल त्यांच्यात येते, ती नक्की कुणामुळे -त्याच्यामुळे, तिच्यामुळे की बॉयफ्रेंडमुळे - ते त्याला कळेनासं होतं.

---

काही भांडणं. हे मैत्रिणीचं नेहमीचंच. काही वादळी जीवघेणी भांडणं. हेही नेहमीचंच. पण त्याच्यापासून अलगद वेगळ्या, निर्लेप होत गेलेल्या काही भेटी. कधी तिचं कासावीस होऊन त्याच्याकडे येणं, पण अवाक्षराचेही तपशील न देणं. काही असंबद्ध प्रश्न विचारणं. कधी चक्क मुलींसारखं लाजणं. हे मात्र नेहमीसारखं नाही. नाहीच. ’ये की एकदा. बर्‍याच दिवसांत आला नाहीस,’ काकूंचा आग्रहाचा फोन. घरदार लग्नाच्या आणि बोलणी करण्याच्या आणि तारखा-मेन्यू ठरवण्याच्या कल्लोळात दंग. स्वत:च्याच इच्छेविरुद्ध त्याला वाटलेलं परकेपण आणि ते नीटच समजून सगळ्या भाऊगर्दीतही त्याला अजिबात एकटं न सोडणारे मैत्रीण आणि बॉयफ्रेंड.

ती परकी इत्यादी होत गेलेली नाही हे स्वत:लाच पटवून देताना त्याला भयानकच कष्ट पडतात. त्या परवा आलेल्या बॉयफ्रेंडला आपण इतक्या चटकन आपल्यात स्वीकारलं की काय, या प्रश्नाला उत्तर देतानाही तितकेच कष्ट पडतात. पण त्याला आरपार वाचणारी तिची धारदार नजर पाहिल्यावर, ती तितकी लांब गेलेली नाही, हे त्याला मान्य करावंच लागतं. चिडचिडीचा / आत्मपीडनाचा / आत्मकरुणेचा एक रस्ता बंद. रस्ते बंद होऊन कोंडीत सापडलं की त्याला नेहमी येतं, तसं अनावर हसू येऊ लागलेलं. कविता संपत आली आहे की काय? कुणास ठाऊक. तो खुशालतो आणि धुमसतोही.

ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू कविता.

---

कधीकधी हिरवाचार संताप उभा राहतोही माझ्या डोळ्यांत, नाही असं नाही.
सगळीभर असलेले तिच्या बोटांचे ठसे पाहून मला असुरक्षित वाटतं, अजूनही वाटतं काहीबाही.
कन्फेस करण्यासारखं काही, काही मी स्वत:पाशीही कबूल करणार नाही...
पण
ती काही त्याच्यापासून निराळी नाही.
त्याच्या आजच्या असण्यात तिच्या ’काल’ची माती मिसळलेली आहे, हे मला विसरून चालणार नाही.
जेलसी?
छे हो, अजिबात नाही.
ती माझ्या प्रियकराची माजी प्रेयसी, बाकी काही नाही!

You Might Also Like

20 comments

 1. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 2. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 3. सही आहे एकदम... कथेतली कविता तर मस्तच...

  ReplyDelete
 4. त्याच्या आजच्या असण्यात तिच्या ’काल’ची माती मिसळलेली आहे, हे मला विसरून चालणार नाही. Thought provoking.

  ReplyDelete
 5. >>> आत्मकरुणेचा एक रस्ता बंद.
  -- हे उमजणं म्हटलं तर वाईट, पण बरंचसं मजेशीर. (मजेशीर वगळता बरं विशेषण सुचलं नाही :()

  >>> हे सगळं वजा करून ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडशी काय आणि कसं बोलत असेल, हा चिवट प्रश्न या आठवड्यात त्याला कितव्यांदातरी पडतो.
  -- 'मालकी हक्काची भावना' इतकं ढोबळ नसलं तरी सूक्ष्म पातळीवर तसंच नाही का?

  बाकी लेखाला मस्त वगैरे म्हणणं अन्यायाचं होईल. आवडला.

  ReplyDelete
 6. मस्तचंय की!
  आवडलं... खर्‍याच्या खूप जवळ आहे!  alhadmahabal@wordpress.com
  alhadmahabal@gmail.com

  ReplyDelete
 7. Katha/kavita mast effect sadhla ahe ekdum. Pan mala katha jast awadli kavite peksha.

  BTW, adhi kavita suchali ki katha? :)

  ReplyDelete
 8. अल्टीमेट झालय पोस्ट! कथा-कविता असं काहीही वेगळं न काढता एकसंध इफेक्ट आहे.
  खूप मोठं पोस्ट न लिहिता थोडक्याच शब्दांत किती मोठा नात्याचा प्रवास समोर आणला आहेस.

  ReplyDelete
 9. धन्यवाद मंडळी.
  काय माहीत आधी काय सुचलं. कालानुक्रम वगैरे ठरवायचा झाला, तर आधी गोष्ट डोक्यात होती. पण लिहिताना आधी कविताच. कदाचित असले क्रम फार उपयोगाचे नसतीलही. कुणास ठाऊक.

  ReplyDelete
 10. शेवटच्या वाक्यात ’काही’ मधल्या ’का’ आणि ’ही’ मध्ये २-३ ’S' पाहिजे होते. बाकी लई भारी! लई म्हणजे लईच भारी. तू मधल्या मधल्या हजाम पोस्ट्स ऐवजी सारखी सारखी असली भारी पोस्ट्स का नाही लिहीत?

  ReplyDelete
 11. hmm sahi aahe hya lekhkaachee eka lekhikene mandlelee gosht :D

  ReplyDelete
 12. या पोस्टाच्या शेवटी छोटी मिर्ची टांग. काहीच्याकाही ल्हीलं आहेस...अधे मधे का नाही लिहीलस असं विचारायची सोय नाही आता. अश्या लिखाणात कंठाळपणा येण्याची दाट शक्यता असते आणि मग ते प्रचारकी वाटायला लागत. पण हे एकदम पक्कं चौकोनी झालय. कुठे सुरु आणि कुठे शेवट याचा नक्की हिशॊब असणारं! भले

  ReplyDelete
 13. hushh...Samved, thank you re baba.!

  mala kahi mhaNtach yet navata...aata Samved la second karato fakt...he pracharaki hoNa TaLaNa mhanje divya aahe ek!

  ReplyDelete
 14. नातं उलगडताना पाहणं हा ही एक ’अनुभव’ असू शकतो याचाही प्रत्ययकारी अनुभव आला हे वाचून.
  You are blessed with something which is so uncommon!
  Thanks!!

  ReplyDelete
 15. कविता छानच झालीये .. अशी नाती जिवंत ठेवणारी लोकं विरळाच. बाकी लिखाणाबाबत इतर प्रतिसादकांशी सहमत !

  ReplyDelete
 16. hi meghana

  chaan zalay post. I am trying to get back to life. Starting with reading your post.

  Pretty nice. Keep it up

  ReplyDelete
 17. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

  ReplyDelete
 18. असंच कुणाकुणाच्या करत करत ह्या blog वर आलो.
  "माझ्या प्रियकराची प्रेयसी" फार सही आहे! खूप आवडलं, विशेषत: मुक्तकवितेच्या ओळी :)

  ReplyDelete
 19. आज बऱ्याच दिवसांनी वाचल्यावर आणखी आवडलं! ’रेषेवरची अक्षरे’ मध्ये वाचलं. बाकी त्या परिसंवादाच्या विनोदाची आयडिया कुणाची? तो जबरी प्रकार झालाय. म्हणजे सकाळी वाचला थोडा, पण आठवुन आठवुन अजुन हसु येतंय. म्हणजे अजुन गद्रे, डॉग आणि भोवड एवढंच वाचलंय पण कधी एकदा बाकीचं वाचतोय असं झालंय.

  ReplyDelete