इन्सेक्युअर्ड

21:14:00

खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही भाग आपल्यातून सोडवून हे असे तळहातावर निरखायला घेतले, म्हणजे मग त्यांच्या निराळ्याच बाजू दिसायला लागतात. आपल्याही.

---

तर पुस्तकं.

मला काय वाटतं पुस्तकांबद्दल? अगदी प्रामाणिक आणि तत्काळ उत्तर - प्रचंड इन्सेक्युअर्ड वाटतं.

स्वतःची पुस्तकं नीट कव्हरं-बिव्हरं घालून जपून, कडेकोट बंदोबस्तात वगैरे ठेवणं तर ठीकच आहे. सगळेच जण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ते करतातच. पण पुस्तकांच्या दुकानात किंवा लायब्ररीच्या काउंटरवर आपल्या हातातली पुस्तकं सोडून शेजारच्या माणसानं कुठली पुस्तकं घेतलीयेत ते बघून जीव कासावीस व्हावा? रद्दीवाल्याच्या समोरचा जुन्यापान्या पुस्तकांचा ढीग कुणी उलथापालथा करत असेल, तर आपल्या डोक्यातलं घाईचं काम सोडून आपणही तिथे धाव घ्यावीशी वाटावी? ताज्या दिवाळी अंकांची थप्पी घरी घेऊन जात असताना वाटेत कुणी ओळखीची काकू-मावशी भेटून त्यांनी अंक मागू नये म्हणून आपण आडगल्ली पकडावी? वाढदिवसाला घरी आलेल्या लोकांनी दिलेली पुस्तकं ताबडतोब एकट्यानं उघडता यावीत, म्हणून कधी एकदा पाहुणे जाताहेत असं होऊन जावं?

मला कुणी हे सांगितलं असतं तर मी सांगणार्‍याच्या तोंडावरच फिदिफिदी हसले असते, इतकं वेडसर आहे हे. पण आहे.

---

एखादा खूप वापरून झालेला पत्त्यांचा कॅट असतो. त्यातल्या किलवर गोटूचा एक कोपरा थोडा झिजलेला असतो. चौकट एक्का पोटातून वाकलेला असतो. आणि इस्पिक मेंढीच्या एका कोपर्‍याचा टवका उडालेला असतो. पूर्ण सुट्टी जर इमाने-इतबारे पत्ते खेळण्यात घालवली असेल, तर सुट्टी सरता सरता सफाईदारपणे ही तिन्ही पानं ओळखता येतात. त्याच जातीचा संबंध माझा माझ्या पुस्तकांशी असतो.

उदाहरणार्थ 'नेगल'च्या पान नंबर अडतीसवर नेगलच्या फोटोपाशी एक लिंबाच्या सरबताचा थेंब पडलेला मला नीट आठवतो. वाचता वाचता तो आला नाही, तर एकदम चुकल्या चुकल्यासारखं होतं. किंवा 'दुस्तर हा घाट'मधे 'मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे, असं ऑस्कर वाईल्ड म्हणतो'पाशी ही पेन्सिलीची अलगद खूण कुणी करून ठेवली असेल? मी तर असल्या अभ्यासू खुणा करत नाही. मग? दर वेळेला तिथे यायच्या आधीच, दिमित्रीच्या वाक्यासोबत मी त्या खुणेचीही वाट बघत असते नकळत. तिथे पोचून 'कुणी केली असेल खूण'चा निरर्थक निष्फळ खेळ खेळूनच पुढे सरकायचं. किंवा रद्दीवाल्याकडून नकद रुपये पाच मोजून आणलेलं 'कोसला' वाचताना त्याच्या मुखपृष्ठाचं पान दुसर्‍या हातात सांभाळावं लागतं, किंवा बाजूला काढून ठेवावं लागतं. तरी ते तस्सं सांभाळायचं.

आपल्या पुस्तकांशिवाय परक्या शहरात राहताना, पुस्तकं उसनी आणून वाचताना 'आपल्या' पुस्तकातलं एखादं पान - त्यांतली एखादी ओळ संदर्भहीन वा ससंदर्भ डोळ्यांसमोर येते, तेव्हा काय करायचं? पुस्तकांना फोन थोडाच करता येतो?

---

पुस्तकातली पात्रं पुस्तकातली नसतातच. उदाहरणार्थ 'बाधा'मधली रमा. किंवा 'रेणुकेचे उपाख्यान'मधली रेणू. किंवा 'मुखवटा'मधली नानी.

पण लोक चक्क अमकं अमकं पात्र असं का वागलं, अशा छापाच्या चर्चा करतात. त्यांच्या वागण्याची आणि त्यांना तसं वागायला लावणार्‍या लेखकाच्या अकलेची चर्चा. असं कसं करू शकतं कुणी?

ती पात्रं नसतात. माणसंच असतात. जिवंत. हाडामांसाची. आपले आपले निर्णय घ्यायला मजबूर असणारी. लेखकाला मुकाट बसवून ठेवणारी. आपण पुस्तकाबाहेर. वादळाबाहेर. वार्‍यापावसाआड. किनार्‍यावर सुरक्षित. अशा परिस्थितीत त्यांचे न्यायनिवाडे करणारे, त्यांच्या बर्‍या-वाईट निर्णयांना तोलत चिकित्सा करणारे आपण कोण?

पण अशा चर्चा होतात. आणि आपल्याच घरातल्या कुणाबद्दल चव्हाट्यावर चवीनं बोललं जावं आणि आपण नेभळटपणानं ते ऐकून घ्यावं, हेही मुकाट मान्य करावं लागतं.

---

मालकीचं पुस्तक. बक्षिसाचं पुस्तक. आपल्या पैशांनी विकत घेतलेलं पुस्तक. कुणी भेट दिलेलं पुस्तक. कुणाचं ढापलेलं पुस्तक. कुणाचं परत करायचं राहून गेलेलं पुस्तक. अनेक निरनिराळे टप्पे.
दर टप्प्यावर मालकी हक्काच्या भावना, त्यांची तीव्रता आणि टोक, त्यामागची कारणं बदलत जातात.
दर टप्प्यावर तीच पुस्तकं निरनिराळे अर्थ, निरनिराळ्या जातीच्या सोबती देऊ करतात.
आता आपली बस भरली, असं कितींदा मनाशी आलं; तरी आयुष्यात हक्कानं-नव्यानं पाय ठेवायला येणार्‍या माणसांसारखी पुस्तकं जमा होत जातात.

तरी अजून मला पुस्तकांबद्दल वाटणारी मूलभूत भावना बदललेली नाहीच आहे. इन्सेक्युअर्ड वाटणं. ते आहेच!

हे बरं लक्षण म्हणायचं की वाईट?

You Might Also Like

23 comments

 1. मेघना!! वाक्यावाक्याला देजावु!!

  ReplyDelete
 2. बाकी लेख चांगला आणि तसा युनिव्हर्सल आहे, पण ’इनसिक्युअर वाटणे’ हा फंडा कळला नाही!

  ReplyDelete
 3. इन्सेक्युअर्ड वाटणे = समोरचं पुस्तक कायम माझ्या हातात (च) / कपाटात (च) / **खाली (च) सुरक्षित राहील अशी एक वेडसर भावना सतत असणे. त्याकरता पुस्तके हावरटपणे जमवणे. कंजूषपणा करून ती लोकांना न देणे. लोकांना नाईलाजानने पुस्तके द्यावी लागलीच, तर ती सुखरूप परत येईपर्यंत जीव वरखाली होणे. लायब्ररीत आपलं पुस्तक सोडून इतरांनी घेतलेलं पुस्तकच अजून छान असेल की काय, अशी शंका सतत येत राहणे. आपण फेरी न मारलेल्या काळातच एखादं दुर्मीळ पुस्तक रद्दीवाल्याकडे येईल आणि कुणीतरी ते घेऊन जाईल अशी भीती वाटणे...

  ReplyDelete
 4. hmm asa malahi vatate.. dusaryani vegli pustake ghetli tar nahi vatat kahi, pan mazi pustaka mi jivapaaD japate.. tithe insecurity peksha possessiveness jast!

  ReplyDelete
 5. मेघना, अग आपण एकाच बोटीतले ग. मला पण असेच पुस्तकांचे ऒबसेशन आहे. इथे, अमेरिकेतही मी प्रत्येकवेळी मायदेशातून आणून आणून सव्वाशे-दिडशे पुस्तके जमविलीत. शिवाय भारतात ही आहेतच घरात. अगदी जीवापाड जपून ठेवलीत. स्वातीला अनुमोदन. देजावु!!!
  लेख छान आहे.

  ReplyDelete
 6. लेख आवडला. जिव्हाळ्याच्या विषयावरचा असल्याने , "प्रचितीचे बोलणें" झाले आहे.

  खरे म्हणजे नको तिकडे खडूसपणा करू नये. परंतु, शीर्षक आणि एकंदर मध्यवर्ती संकल्पनाच असल्याने हा प्रपंच करतो. insecured हा शब्द चुकीचा असावा अशी मला फार मूलभूत शंका आहे. insecure हे विशेषण secure या विशेषणाच्या च्या विरुद्धार्थी आहे. "to secure " या धातूपासून secured हे विशेषण बनलेले आहे. (जसे "to insure " पासून insured बनले. ) यान्यायाने , insecured हा शब्द कितपत लेजिट् आहे याबद्दल मला शंका वाटली. तज्ञांनी याबाबत बोलावे हेच उत्तम ; पण मला अतिशय उथळ विचार करताना जे जाणवले ते लिहिले आहे.

  तर या लेखाबद्दल. लेखातल्या "पुस्तक " या विषयावरच्या प्रेमाच्या धाग्यामुळे हे लिखाण रोचक झाले आहेच. परंतु त्यात लेखिकेच्या शैलीचा प्रभावही जाणवतो. "स्टाईल इज द म्यान" असे जुने वचन आहे. त्यानुसार , शैलीवाटे लेखिका आपल्या व्यक्तित्त्वाचा आरसा समोर धरते.

  तर , पुस्तकांबद्दलचे प्रेम आणि ज्याला काहीशी टोकाची म्हणता येईल अशी संवेदनशीलता यातून हे "इन्सेक्युअर" प्रकर्ण जन्माला आलेले आहे. कुठल्याही बाबतीत "अतिपरिचयादवज्ञा" होणे , काहीसा निबरपणा येणे हे पुस्तकांच्या , त्याआतील लिखाणाच्या संदर्भात घडलेले नाही. हे मला विशेष वाटले.

  लेखिकेचे पुस्तकांबद्दलचे हे प्रेम थोडेसे सगुणोपासनेसारखे वाटते. रंगरूपगंधादि सेंद्रिय घटकांनी नटलेली ही भक्ती दिसते.आणिक एक म्हणजे , पुस्तके ज्या संकल्पनादि शाश्वत, गंभीर गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात त्याच्या अगदी उलट अशी ही , काहीशी बालसदृष वृत्ती पाहून अंमळ करमणूकही होते.

  ReplyDelete
 7. 'पुस्तकांना फोन थोडाच करता येतो?'
  खरंच एखाद्याची झालीच खूप आठवण तर काय करायचं?
  वेगवेगळ्य़ा मालकी हक्कांमधे अजून एक भर, वारसाहक्काने आपली झालेली पुस्तकं. माझ्या आजोबांनी इंग्रजी आणि संस्कॄत शिकवताना अनेक डिक्शनरीज, शब्दकोष जमा केले, जुनी पुस्तकं बायंडींग करूनही आणली. त्यात काही निबंधलेखनाची,काही सुभाषितमालांची आणि अजून असंख्य पुस्तकं आहेत.ती सगळी पुस्तकं शाळेत असताना बघायचे तेव्हा फार अभिमान वाटायचा, अजूनही वाटतो. मुलगी म्हणून माझा त्या घरावरचा हक्क राहिलाही नसेल,पण तरीही भारतात गेल्यावर त्यातलं एकूण एक पुस्तक माझ्या ताब्यात घ्यायचं आहे, त्यांना कवर घालून जपून ठेवायचंय. ’काका, आत्या आणि कुठल्याही नातेवाईकाला घेऊन देणार नाही मी ती’, असं स्वत:ला आणि आईला हजारों वेळा बजावलंय.
  तुझा लेख वाचताना त्या सगळ्य़ाची आठवण झाली. आणि त्या पुस्तकांना कधी परत बघते असं झालं. असो.
  लेख मस्तच आहे.तुझी ’इन्सेक्युअर्ड वाटणे ’ ची भावना कळली आणि पटलीही. :-)
  -विद्या.

  ReplyDelete
 8. छान लिहीले आहे.

  ReplyDelete
 9. अरे बापरे....एकदम दहावीतला मराठीचा धडा वाचल्या सारखे वाटले.

  ReplyDelete
 10. ती पात्रं नसतात. माणसंच असतात. जिवंत. हाडामांसाची. आपले आपले निर्णय घ्यायला मजबूर असणारी. लेखकाला मुकाट बसवून ठेवणारी.
  - ya babat 100% sahmat. Insecure nahi vaaTat khara tar mala, paN bha. po. nakkich zala.

  ReplyDelete
 11. मेघना,
  लेख आवडला.
  लिंबाच्या सरबताचा डाग.. अगदीच भा.पो.
  अगदी जिवाभावाच्या माणसालाही पुस्तक देताना आत काही तरी तुटल्या सारखं वाटतं तेव्हा वाटायचं आपण कित्ती स्वार्थी आहोत. आणि पुस्तक दिल्यावर नंतर ते कोणाला दिलं हे विसरून गेल्यावर आपल्या निष्काळजी पणावरचा संताप हे ही बरेचदा घडलय. पण मग कधीतरी जेव्हा अमृता प्रीतममुळे चेतनागुणोक्तीच्या प्रेमात पडलो तेव्हा माझ्याच पुस्तकांना मी व्यक्तीस्वरूप देऊन टाकलं आणि हेही ठरवलं की ती जरा माणूसघाणी आहेत त्यांना फारसे कोणाकडे जायला आवडत नाही. काही आहेत उनाड जी डोळा चुकवून इकडे तिकडे जात असतात पण जरा शोधाशोध केली तर मिळातात. वयस्कर आहेते त्यांना मात्र जरा विशेष जपायला लागते. जरा जास्तच हळवी झालेली असतात.
  आता कोणी पुस्तक मागितल्यावर काय करायचं हा प्रश्न त्यांचा तीच सोडवतात.

  ReplyDelete
 12. Hi,
  Tuzi sarrrva pustak vyavasthit aahet, kalaji nako.
  konakonala dilyet tyachi nond keleli aahe.

  ReplyDelete
 13. "एखादा खूप वापरून झालेला पत्त्यांचा कॅट असतो. त्यातल्या किलवर गोटूचा ... त्याच जातीचा संबंध माझा माझ्या पुस्तकांशी असतो."

  हे मला प्रचंड आवडले

  ReplyDelete
 14. काय बोलावं? मला तर अभ्यासाच्या पुस्तकांचं पण अस्संच होतं. भा.पो.

  ReplyDelete
 15. attach Mukkam vachla parat.. ani tyat mala dimitrichya tondi he vakya disla.. dustar ha ghaT madhe pan ahe ka? athvat nahi..

  ReplyDelete
 16. चांगल की वाईट हे मला माहीत नाही, पण काळाच्या ओघात हे तुला वाटणारं फ़ीलिंग तसंच राहिलंय... हे नक्कीच सॉलिड आहे... नाही का??

  ReplyDelete
 17. pustak ha kharach anekanpramane mazahi weak point aahe.mala kavitanchi pustake jast ssvadatat.tyamule kuni ti chornyacha dhokahi tasa kami asato
  meghana khup chan manatal lihila aahes

  ReplyDelete
 18. आपल्या पुस्तकांशिवाय परक्या शहरात राहताना, पुस्तकं उसनी आणून वाचताना 'आपल्या' पुस्तकातलं एखादं पान - त्यांतली एखादी ओळ संदर्भहीन वा ससंदर्भ डोळ्यांसमोर येते, तेव्हा काय करायचं? पुस्तकांना फोन थोडाच करता येतो?

  ...कुठल्याही शहरात असंच वाटत राहीलं तर? मला इन्सेक्युर्ड पेक्षा वाईट्ट पसेसिव्ह वाटतं

  ReplyDelete
 19. aga lihi na, kahitari, kiti diwas zale !!!

  ReplyDelete
 20. प्रिय मेघनाजी ,
  खर तर एक सारख्या आवडी निवडी असना-या ना एक सारखाच वाटत असते ..पण एखाद्यालाच सार शब्दात मांडता येत.
  पुस्तकाविषयी मला ही असेच वाटत आले आहे.
  ब्लॉग खूपच छान झाला आहे.
  अणि आपले बरेच लिखाण नावाप्रमाने मेघना पेठेन्शी साधर्म्य असणार वाटत .त्यांचा सारख लिहिता येन हेही आभिमानास्पद च वाटत असणार
  ...खूप छान लिहिता तुम्ही ...असेच लिहित रहा.
  शुभेच्छा ....
  योजना , गोवा ...

  ReplyDelete
 21. इन्सेक्युअर्ड>> हो खरं असं वाटतं का ते मलाही कळत नाही.

  आवर्तन/ रारंगढांगच्या पानांवर पडलेले तेलाचे डाग... अगदी अगदी सेम फीलींग देतात

  ReplyDelete
 22. प्रिय मेघना,मला पण तुझ्यासारखंच’इनसिक्युअर’ वाटायचं गं(तू मात्र खूपच छान मांडलयस सारं शब्दात!)त्यावर उपाय म्हणून मी माझ्या पुस्तकांसाठी अशा बुककेसेस खरेदी केल्या ज्या फक्त मला किंवा माझ्या लेकीला(जिच्यामुळेच मला हे पुस्तकं जमवायचं नादखुळं वेड लागलं)पुस्तक हवं असेल तेव्हाच उघडतात.ह्यामुळे ८०% भीती गेली गं परंतु ती दुर्मीळ पुस्तकवाली भीती कायमचीच.खरं ना?

  ReplyDelete
 23. मेघना
  मी तुझा ब्लॉग सर्वांत पहिल्यांदा कधी वाचला ते आठवत नाही, पण जेव्हा वाचला तेव्हा तुझी instant fan झाले!
  तुझा प्रत्येक लेख अगदी खोल, आतून आलेला जाणवतो, आणि मनापासून केलेलं लिखाण वाचणा‍र्‍याच्या मनाची पकड घेतं.
  पुस्तकांबद्दल बोलायचं झालं तर तू जे लिहिलंयस ते मलाही अगदी तंतोतंत लागू होतं. जणू काही मझ्याच मनातले विचार तू मांडले आहेस.
  सुंदर! मी तुझा ब्लॉग follow करतेय.
  - मेघना

  ReplyDelete