Thursday, 28 May 2009

मॉर्निंग, वॉक आणि मी

शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ:

उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाजताचा अघोरी गजर लावते. मग एकदम पापमुक्त झाल्यासारखं वाटून लोळत टीव्ही. मग काही वेळ कादंबरी. झोप येण्यापुरती हातात धरलेलं अभ्यासाचं पुस्तक. व्हिक्स. पाणी. गाणी. झोप.

शनिवार सकाळी नऊसाडेनऊ:

डोळ्यांवर आलेलं ऊन. पंख्याचा घर्र घर्र आवाज. अंगभर आळस. ’माझा गजर कुणी बंद केला?’ माझी जोर नसलेली कुरकुर. उत्तरादाखल काही तुच्छतादर्शक कटाक्ष. मग शनिवार सकाळचा स्वस्तातला मल्टिप्लेक्स सिनेमा गाठायसाठी जोरदार धावाधाव. लायब्ररी. शॉपिंग मॉल. भाजी मार्केट. दुपारची स्वर्गीय झोप. सगळं स्वर्गीय वाटत असतानाच शनिवारची रंगीन रात्र कधी कूस बदलते समजत नाही. शिवाय कितीही अपराधभाव असला, तरी रविवार सकाळसाठी गजर लावायचं महापाप काही कुणी करत नाही.

रविवार संध्याकाळ सात-साडेसात:

काहीही कल्पना नसताना पायाखालची जमीन हिसकावून घ्यावी कुणी आणि आपण एकदम अनाथ एकटे कातरवेळी समुद्रकिनारी - अशा पद्धतीत वीकान्त संपून गेलेला, सोमवार पुढ्यात उभा ठाकलेला. ’उद्यापासून मात्र कुठल्याही परिस्थितीत उठायचंच. काही लाज वाटते का तुला?’ वगैरे सेल्फटॉक. पुन्हा एकदा गजर.

सोमवार सकाळी पावणेसहा:

गजर. स्नूझ. गजर. च्यायला. वाजतोय साला. उठावं का? मरू दे. ऊठ. ऊठ. ऊठ. बाहेर पाखरं किलबिलताहेत, हवा कशी गार आहे. मरू देत ती पाखरं, पांघरुणात छान वाटतेय गार हवा. ऊठ. ऊठ ****. अखेरशेवट मी उठते.
आरोग्यदायी आल्याचा चहा, व्यायामी जामानिमा, लाजेकाजेस्तव वॉर्म-अप करून बाहेर पडेपर्यंत साडेसहा.
बागेत आणि बागेभोवती हीऽऽऽऽ गर्दी. गर्दी बघून मी दचकते. आत्ता काय झालंय काय? इतके सगळे लोक? मग यथावकाश डोळ्यांवरची झोप उडून दोनेक फेर्‍या होईस्तोवर ते सगळे उत्साही आरोग्यवंत लोक असल्याचं मला कळतं.
च्यायला, संध्याकाळी सातसाडेसातनंतर खिडक्यादारं बंद करून खुडूक बसणार्‍या या शहरातले हे मंद लोक, आणि पहाटे आरोग्य सांभाळायची ही अहमहमिका, अं? येडपट साले... माझी उगाच चिडचिड.
सहावी फेरी मारताना शेजारून स्टायलिशपणे पळणारा एक मुलगा हळूच बागेच्या आतल्या बाजूनं पळणार्‍या एकीच्या वेगाचा अंदाज घेत मंदावतो. पण मग माझी नजर जाणवून, गडबडून परत एकदा जोरात पळत सुटतो. मला नकळत हसू फुटतं.

मंगळवार सकाळ सहा:

थोडासा पाऊस शिंतडून गेल्यामुळे नेहमीचे भुरे रस्ते ताजे तुकतुकीत काळेभोर दिसतायत. त्यावर ही जांभळी किनखापी फुलं? च्यायला, एकेका शहराचं नशीब असतं खरंच. माझ्या मुंबईकर मनातला मत्सर पृष्ठभागापाशीच. वर डोकवायला सदैव उत्सुक. त्याला तस्संच दाबून मी बागेकडे वळते.
कालचा तो मुलगा दिसतोच. मला बघून चक्क नजर चोरून पुढे? हा हा हा!
तिसर्‍या फेरीत बागेतल्या कोपर्‍यात एक हसर्‍या आजी-आजोबांचं वर्तुळ. एक टाळी. हा:! दोन टाळ्या. हु:! तीन टाळ्या. हा:हा:हु:हु:! त्यांना तसंच टाकून पुढे जाणं मला चक्क जड जातं. मी ऑलमोस्ट पळत पळत माझी फेरी पुरी करून त्यांच्यापाशी परत येतेय, तोवर त्यांचं शवासन चालू झालेलं. फुस्स.
मग माझं लक्ष बागेसमोरच्या घरांकडे जातं. पांढराशुभ्र रंग आणि बाल्कनीतून लडिवाळपणे खाली येऊ बघणारी गुलबाक्षी रंगाची कागदीची फुलं.
दुसरं घर. व्यक्तिमत्त्वहीन पिस्ता कलर. हे अगदीच काकूबाई घर. नीटनेटकं-स्वच्छ वगैरे आहे, पण स्वभाव एकदम ’सातच्या आत घरात’. हॅ, काय गंमत नाही.
तिसरं घर. वॉव, समोर चक्क दगडी फरसबंदी वगैरे? आणि व्हरांड्यात टांगलेला खानदानी पितळी कंदील? पण या घराच्या समोरचा गुलमोहोर गायब केला, तर हे रुबाबदार घर एकदम बापुडवाणं दिसायला लागेल, माझी खात्रीच पटते. असला परावलंबी रुबाब काय कामाचा? हॅट, नापास.
चौथं घर. रंग पिस्ताच. पण बाळबोध बटबटीत पिस्ता नव्हे. इंग्लिश कलरचा तोरा. शिवाय सगळीकडून घराला पडदानशीन करून टाकणारा अस्ताव्यस्त पसारेदार विलायती गुलमोहोर. मुंबईसारखा पाऊस कोसळला इथे, तर या खिडकीत बसायला काय बहार येईल, माझा फुकाचा कल्पनाविस्तार. तितक्यात मागच्या बाल्कनीत वाळत टाकलेले टॉवेल्स आणि चड्ड्या-बड्ड्या दिसतात आणि मी रागारागानं पुढे जाते.
पाचवं घर. हे नवंच दिसतंय. अजून समोर वाळूचा लहानसा ढीग, थोड्या विटा वगैरे आहेत. पण रंग मात्र सुरेख चकचकीत पांढरा. आणि ’हम दिल दे चुके सनम’च्या सेटची आठवण करून देणार्‍या तीन तीन गच्च्या. त्यावर लालचुटूक कौलं. अरे, पुढचं दार उघडं? हॉलमधून वर जाणारा वळसेदार जिना आणि मागच्या खिडकीतून दिसणारं हिरवंगार परस. काका पेपर वाचतायत की काय? घड्याळपण एकदम जुन्या पद्धतीचं ’टोले’जंगी दिसतंय. बाप रे, साडेसात? पळा...

बुधवार सकाळ सव्वासहा:

हा:हा:हु:हु: गाठायला धावत येऊनही फार काही हाताला लागत नाही. एक सात्विक चेहर्‍याच्या पण तितक्याश्या प्रेमळ न वाटणार्‍या आजी संशयानं तेवढ्या बघतात. मी घाईघाईत पुढे जाते.
’तो’ मुलगा दिसतोच. चक्क एक निसटतं स्माइल. सलग तिसर्‍या दिवशी मला बघून माझ्याबद्दलचा तुच्छत्वाचा भाव त्याला सोडून द्यावा लागला असेल का, असा विचार करून माझ्या नियमितपणाबद्दल मी स्वत:वरच निहायत खूश होते.
एक फेरी. दुसरी. तिसरी. चौथी. पाचवी.
’मग मी म्हटलं वन्संना, इतकं काय मनावर - ’ मी असभ्य वाटेलश्या वेगात खटकन मागे वळून बघते. मराठी? नकळत पाय रेंगाळतात, माझ्या संकुचित प्रादेशिक अस्मितेला माझा नाईलाजच असतो. सलवार-कमीझ, स्पोर्ट्स शूज, घाईघाईत वळलेला अंबाडा, ’अहों’ना गाठायला कशीबशीच मॅनेज केलेली धावरी चाल आणि ’हं हं’ करत आपली आघाडी राखून असलेले अहो. काका-काकू पुढे निघून जातात.
मी मात्र रेंगाळते.
हवेला विलक्षण ताजा वास. पाचव्या घरातल्या काकू न्हाऊन फाटकासमोर रांगोळी काढत असलेल्या. शोएब अख्तर विकेट मिळवल्यावर ज्या विमान-पोझमधे धावतो, त्याच पोझमधे धावणार्‍या एका काकांचं विमान. कशीबशी झोप आवरून, आंघोळ-पावडर-कुंकू-डिओडरण्ट उरकून, हापिसाला निघालेल्या दोन चश्मिष्ट पोरी. त्यांच्या हातातली ताजी टाईम्सची गुंडाळी. नजरेतला ’आरोग्यवंत लोकां’बद्दलचा आदर अधिक मत्सर अधिक चिडचिड माझ्यापर्यंत थेट पोचते.
आपणपण आरोग्यवंत लोकांच्यात जमा? मला एकदम मजाच वाटते.

गुरुवार सकाळ सात:

चहा - वॉर्म-अप - व्यायाम. इमानदारीत ठरलेल्या फेर्‍या मारून मला फारच घाण्याला जुंपलेल्या अळणी बैलासारखं वाटायला लागतं. मग मी सरळ पलीकडच्या इडलीवाल्याकडे मोर्चा वळवते. वाफाळती इडली आणि लाल मिरच्यांचा तवंग मिरवणारं सांबार.
आयुष्य सुंदर आहे...

शुक्रवार सकाळ साडेसहा:

कंटाळा आलाय, पण घरात बसून राहायचाही कंटाळाच आलाय. तीच ती सकाळची टीव्हीवर गळणारी गाणी, शेजार्‍यानं भक्तिभावानं लावलेली ’ओम्‌ श्री नमो नम: - तत्सवितुर्वरेण्यम्‌’ची एकसुरी उंच भुणभुण आणि तासभर नुसतंच लोळत पडल्यावर अंगात साचणारा जड आळस. मी शहारतेच.
बागेपाशी येऊन आरोग्यवंतांच्यात सामील झाल्यावर बरं वाटतं. बरं वाटल्याचा थोडा धक्काही बसतो, पण बरं वाटतंच. विमान काका आज शिक्षा झालेल्या सैनिकासारखे हात वर ठेवून फेर्‍या मारत असतात. मला हसू येतंही आणि नाहीही. मीही मुकाट माझी दौड चालू करते.

शनिवार सकाळी पावणेसहा:

’हे काय? आजपण जाणार फिरायला? बरी आहे ना तब्ब्येत? वीकेण्डलापण?’ असल्या सरबत्तीकडे दुर्लक्ष करून मी बाहेर पडते. हसणारा मुलगा, विमानकाका आणि पाचव्या घराला एक हसरी नजर-सलामी टाकते. पाय वेग घेतात...

14 comments:

 1. Nostalgic वाटतयं यार...
  मला आठवले ते तळ्यावरचे दिवस...मी हॅष ज्यो आणि तू... तुझे फ़ेर्या मारायचे सिन्सियर एफ़र्ट्स आणि अमची उगाच तळ्यावर बसुन पोरं टापायची टवाळकी...

  i miss those days yaar...

  ReplyDelete
 2. huh.. mazyasathi ek sukhad-swapna! :D avghade bua, regularly jana.. koni company asel tar thike!
  amchyat ghari basun thandi cha anand lutaychi probability ch jast! :P

  ReplyDelete
 3. haha.. sahi lihilay. pan amhi baba pahilyapasunach atirogyavant. ratree 3 la jhopalo tari sadepach la jaag yenyacha rog jadalele tyamule dusara kay karayacha asata itakya pahate uthalyavar he n suchun palat rahanare.:p. daudate raho!

  ReplyDelete
 4. tujhi navi template ani font mast distoy. ekdam fresh!

  ReplyDelete
 5. Kasa kay jamta buwa lokanna sakaLee lavkar uThoon dhaav-paL karaNa? Pahile 1-2 parichchhed vachatana Mukund TanksaLe (ha hant hant!) vaLaNacha post hotay kee kay ashi agadi pusaTashi shanka aaleli (usual ma. ma. va. - nishchay karaNe, paaLala na jaaNe aaNi tya sandarbhaatale shiLe zalele praasangik vinod etyadi), paN mag niyamit nireexaNa aaNi nondi pahoon jeev bhaanDyaat paDla :)

  ReplyDelete
 6. मज्जा आहे ब्वा! रीतसर स्फुरण घेतलं पाहिजे...ज्यादिवशी असं होईल, वह सोमवार कब आयेगा? :(

  @ट्युलिप,

  कसं काय जमतं बुवा? इथे रात्री ९ ला झोपलो तरी दुसर्‍यादिवशी आरामात ९ पर्यंत झोप लागू शकते! नशिबवान आहेस.

  @स्नेहल,

  मेघनाबरोबर तूही चार फेर्‍या मारल्या असत्यास तर कुणी नाही म्हटलं होतं का?

  ReplyDelete
 7. masta..

  normally ase lekh vachatana vyayam karanaryacha utsah shevati sampto asach swaroop asata.

  kunala vyayam karana avadala ha change refreshing vaTala

  ReplyDelete
 8. Haha..amazing.
  You have picked the really minute details of a "arogyadayi" sakal.
  Amchyakade (mhanje Punyat) sakal $:30 la hote. Aai-baba adhi Ramdev maharajancha haha-hoohoo kartat. Mug atishay nigrahani wegwegle wanaspati arka pitat. And then they go for a walk/run. (walk:aai,run:baba). So I cannot bring myself to sleep in even when I am so far away from them. :(

  ReplyDelete
 9. Its like a happy ending story. Unpredictable but refreshing. :-P I know its not possible for me to do it like u, but it remimnded me of Sanjay Gandhi National Park and the two mornings I have walked there. :-)
  Baki, sahi vatatay ki tujha ha utsaah tasach rahilay. Keep it up.
  -Vidya.

  ReplyDelete
 10. अशक्य! मी मधे पैसे वगैरे भरुन मारे जीम लावला पण नाय...मराठी बाणा...मोडेन पण वाकणार नाही. मला सकाळी उठायचा प्रॉब्लेम नाही. अगदी ३ ला पण उठू शकतो पण उठून पळायला जायच? क्रुर विचार हो...
  तू चालु दे. २ महीन्यांनी याचा पार्ट २ मस्ट. तो आला तर आम्ही समजणार की तो धावरा आणि हस्का मुलगा खरंच छान आहे

  ReplyDelete
 11. @ सेन,

  अरे पळणार बिळणार कोण?
  उगाच कष्ट... ते काम आम्ही तिला सोपवलं होतं

  ReplyDelete
 12. एक नंबर. छान आहे. फार छोट्या छोट्या ईमोशन्स अगदी अचूक पकडता. आळस असाच झटकून मग आणखी फ़्रिक्वंटली लिहित जा.

  ReplyDelete
 13. मेघना: एकदम मस्त आहे तुझी स्टाईल! पुन्हा वाचायला आवडेल तुझं लिहिणं.

  - आकाश

  ReplyDelete