Sunday, 8 March 2009

सर्जनाच्या दर्शनाने सर्जनाची वाट व्हावे

कलावंताला लिंग नसतं असं म्हणतात. पण आज जिवाजवळच्या, सोबत करणार्‍या लेखकांची नावं आठवत गेले, त्यात आश्चर्यकारक प्रमाणात बाया निघाल्या. अपवाद होतेच. चांगले सणसणीत अपवाद होते. पण ते अपवादच. नियम अधोरेखित करणारे.

बाई असणं इतकं निराळं करतं माणसाला? लेखकाला? कलावंतालाही? की आस्वाद घेण्यातली ही आपली मर्यादा? की सवयीचं-सरावाचं तेच आपलं मानण्यातला बथ्थड आळस? की खरंच जैविक-सांस्कृतिक बंध? कुणास ठाऊक.

आजच्या महिलादिनाच्या निमित्तानं या काही कविता. सोबत करणार्‍या.

रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून
दूर निघालेल्या एका उत्कट मुलीची गोष्ट
सांगते आहे मी तुम्हांला.
मुलगी, जिला ऐकू येतो प्रेमाचा ओला आवाज
कृष्णमेघात ओथंबलेल्या पावसासारखा
आणि जिचं आख्खं हृदयच सळसळून हिरवं होतं.
जी सहज विश्वास ठेवते मग अनोळखी तरुणावर
अदृष्टातून येणार्‌या त्याच्या पौरुषाच्या गंधावर
आणि दूर सारून स्वत:चं माहेरघर,
झोकून देते स्वत:ला सरळ त्याच्यावर.
ना वाजंत्री, ना तोरणं, ना विरोध, ना रडणं
अडवू शकत नाही तिला काहीच,
एकदा मन मंतरल्यावर.
स्वप्नांचं सार्थक त्याच्या डोळ्यांत
आणि युगांचे संभव त्याच्या स्पर्शांत.

त्याच्या स्मरणानंही करता येतं तिला साहस
प्रियजनांपासून प्रेमाला लपवण्याचं.
परिचिताचा हात सोडण्याचं,
अज्ञाताला मिठी घालण्याचं.
तिला माहीत नसतात दुखरे तपशील
तिच्या पुरुषाच्या भूतकाळातून सरसरत येणारे -
कालियासारखे हिरव्या हृदयाला विळखे घालत दंश करणारे
जगणं मरणापेक्षाही अवघड करणारे.
त्याच्या फूत्कारांनी भरून जाणारं आयुष्य ठाऊक नाही तिला.
आता तुम्ही थांबवू शकाल?
परतवू शकाल?
दुखवू शकाल?
त्या रंगीबेरंगी इच्छांच्या रथातून जाणार्‌या कुंवार मुलीला?

अरुणा ढेरे (बहुधा मौजेच्या दिवाळी अंकातून)
---

नव्या वाताहतीला सामोरं जाताना
मी पुन्हा धरलं कवितेचं बोट
की, बाई... माझ्या धांदोट्या ठेवायला
असून दे थोडी जागा तुझ्या ओळींमधून
तर ती हसली खळखळून मैत्रिणीसारखी.
तिच्या हसण्यानं फडफडली वहीची पानं
आणि जुन्या वाताहती पुन्हा
सहज उघड्या पडल्या.

वाताहतीला वाताहत म्हणतात हे ठाऊक नव्हतं
तेव्हापासूनचा सगळा इतिहास,
नजीकच्या भूतकाळापर्यंतचा...
काही शिकता येत नाही या इतिहासातून,
टाळता येत नाही कुठलीही वाताहत
किंवा रोखताही येत नाही;
नष्ट करणं ही तर खूप दूरची आणि
दुरापास्त गोष्ट.
आता अनुभवामुळे फार तर
तिच्या रूपाबद्दल अंदाज बांधता येतात
आणि निमूट स्वीकारता येते
होत जाणारी पडझड;
मिसळून जा म्हणता येतं तिला
जुन्या वाताहतींच्या घोळक्यात.

खरं तर सगळी कृती मला पाठ झाली आहे:
सगळ्याच संकटांना संधी मानायचं;
पहाटे तुळशीला पाणी घालायचं:
फळ्यावर रोज नवा सुविचार लिहायचा;
हिंसेचे फुटवे खुडून टाकायचे;
आलेला ऋतू आल्हाददायक म्हणायचा;
तू सोबतच आहेस असं समजायचं;
न्हाऊन वाळवायचे ओले केस;
आरश्यात चेहरा पाहायचा ओळख राहावी म्हणून;
अंगभर बचाव गुंडाळायचा
आणि उतरायचं पुन्हा रस्त्यावर
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

दर वेळेसारखंच असणार मग सगळं...
कोसळायचं, पुन्हा उभं राहायचं, धडपडायचं;
जे शाबूत राहिलंय ते सारं गोळा करायचं;
मातीत तूस मिसळलं की घट्टपणा येतो घड्याला
तसं सार्‌या वाताहती स्वत:त कालवत
मिसळत मळत घडवत न्यायचा नवा आकार
आणि ओलेपणीच नक्षी कोरावी
तशी लिहून ठेवायची पुन्हा एखादी कविता
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

कविता महाजन (महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकातून)
---

माझ्या पणजीच्या आजीचे नावसुद्धा मला माहीत नाही.
परकराचे ओचे बांधून गाणी गात
ज्याच्या पारंबीला लोंबकाळून ती झुलली
तो वडसुद्धा मला ठाउक नाही.
ज्या दगडांवर धुतले तिने ऋतुस्नात बोळे,
ज्या नदीचे पाणी झाले लाल, जांभळे, काळे
तो दगड, ती नदीसुद्धा मला माहीत नाही.
जेव्हा पहिल्यांदा कण्हली ती संभोगाच्या कभिन्न रात्री
तो स्वर सुखाचा, की सूर दु:खाचा होता
तेसुद्धा मला ज्ञात नाही.
जन्म देतांना तिनं फ़ोडलेला हंबरडा मी ऐकलेला नाही.
तिला वारंवार फ़ुटलेला पान्हासुध्हा मी चाखलेला नाही.
तिनं शेंदलेल्या घागरीही मी वाहिलेल्या नाहीत.
तिला दिसलेल्या खुणादेखील मी पाहिलेल्या नाहीत.
कसा गेला तिचा जीव जाताना, कशात अडकला ठाउक नाही.
कोण रडले तिच्यासाठी, कोण कुढले उरलेल्यांतले माहीत नाही.
कोणी वेचली तिची विरासत, कोणी उष्टावून फ़ेकून दिली याद नाही.
कोणी कुठले वसे घेतले, कोण उतले, कोण मातले, ज्ञात नाही.

मात्र तिच्या तपशीलांची राख उधळणारा वारा अजूनही वाहातो.
भला मोठा श्वास होऊन माझ्या छातीत अडकतो.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश....
त्याच असतात पारंब्या कालातीत अश्वत्थांना
अजूनही लोंबकळून झुलतात मुली ज्यांना...
पणजीची आजी नाही म्हणावी तर तसे नाही.
पण तिचे नाव मात्र आता कुणाला ठाउक नाही!

मेघना पेठे [ऑर्कुटवरून (http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=12387259&tid=5305406129799140274&start=1) साभार]

9 comments:

 1. मला समहाऊ जेन्डर बेसड वर्गीकरण आणि ते ही कलाकाराचं नक्कीच मान्य नाही. कोवळेपण, संवेदनांची टोक जपण्याची मुभा आपणच आपल्याला देतो. कदाचित व्यक्त करण्याचे धाडस किंवा माध्यम वेगवेगळे असू शकते.

  अजून एक. का माहीत नाही पण कित्येक स्त्रीयांच्या लेखणाचे मध्यबिंदु पुरुषच असतात

  ReplyDelete
 2. एक कविता

  म्हणे, तुझं बाईपण असं
  तुझं बाईपण तसं,
  कुठं असतं ते?
  गो-यागोमट्या/ काळ्यासावळ्या
  चेह-यात?
  की छातीवरच्या उंचवट्यात?
  कमरेच्या रेषेत
  नाहीतर देऊ करणा-या हातात?
  ओटीपोटात निश्चित?
  की मांड्यांमधल्या खळगीत?
  म्हणे शेवटी तुझं बाईपण
  ग बाई तुझ्या डोक्यात !
  मेंदूत, मनात, हृदयात, आत्म्यात
  जे काही आहे आहेसं वाटतं
  अश्या कुठल्यातरी निराकारी
  अगम्य अवघड
  अस्तित्वात.....
  शोध शोध शोधलं ते बाईपण
  तुम्ही आम्ही
  आपण सर्वांनी
  त्यासाठी किती काय केलं,
  शरीरानं
  विचारानं
  त्या मना-आत्म्यानं वगैरेसुद्धा
  तरी ते आपलं लबाड
  दूरदूरच जात राहिलं
  शब्दात येतायेता निसटून गेलेलं,
  हातात असून नसल्यासारखं,
  इतिहासात काय,
  वर्तमानात काय
  अर्थानथाची नुसती एक गुंतागुंतच
  बाईपणाच्या धडपडीमागे लागता लागता
  झालेली दमछाक,
  शेवटच्या श्वासापर्यंत
  सोबतीला आलेले पराभव,
  आयुष्य जातं
  तुम्हा आम्हा सर्व बायांचं
  आणि उमजत नाही
  केवळ आपलं बाईपण?
  नसताच घातला हा सोस
  तर ही चाळीस-पन्नास-साठ वर्ष
  निदान आयुष्य जसं
  असावसं वाटतं असतं
  जन्माला येतानाच एक
  जीव म्हणून केवळ
  तसं असतं घालवलं
  खुशाल जगत
  आनंदानं, कधीमधी दु:खानं
  पुन्हा उभारुन आशेनं,
  मग तू काय, मी काय
  तुम्ही आम्ही सर्वच काय
  मी बाई अशी, तू बाई तशी
  ...... बाईपण?
  पुन्हा आलंच मागे?
  शब्दातच
  सावलीसारखं?

  - सानिया

  ReplyDelete
 3. लेखकाचे सामर्थ्य वाचक स्वत:ला त्याच्या लिखाणाशी किती relate करू शकतो यावर असतो असे मला वाटते...
  लेखक आणि इन जनरल कलावंत या दोन वेगळ्या कॅटेगिरीज असतील तर माझ्याही आवडीच्या लेखकांमध्ये स्त्री लेखिकाच जास्त आहेत..नि:संशय!
  पण कलाकार इन जनरल???I doubt!
  पण लेखकांच्या बाबतीत असेल तर आपणही स्त्रियाच असल्यामुळे मे बी जास्त relate करू शकलो असू..
  आपणच आपल्याला रिफ़्लेक्ट होताना पाहणं आपल्याला आवडेलच...नाही??

  ReplyDelete
 4. तिन्ही कविता मी पहिल्यांदाच वाचल्या (ह्यात नवीन ते काय!). तिन्ही कविता वाचताना ही कोणाची असेल बरं ?असा एक गेस हू खेळ खेळलो, नि तिन्ही गेस चक्क बरोबर निघाले. सांगण्याचा मुद्दा हा की ह्या तिघींचं मी अत्यंत मर्यादित असं काहीसं वाचूनसुद्धा जर मला असं शैलीवरून अंदाज बांधता येत असेल, तर कवी म्हणून (कलावंतांना लिंग नसतं म्हणून स्त्री कवीही कवीच असतात, कवयित्री नसतात, असं मानणार्‍या लोकांचं मत सध्या पटलंय मला) जे कमावलंय ते फक्त शैलीत नाही तर अनुभवांत नि ते मांडायच्या कौशल्यातही असं वाटलं.

  एरवी त्या अनुभव, लिंगभाव ह्या बद्दल म्हणशील तर संवेदशी बर्‍यापैकी सहमत.

  मला वाटतं,कलावंतांना लिंग नसतं ह्यात गोंधळ आहे. कलावंतांना लिंग नसतं, पण लिंगभावसुद्धा नसतो? I am trying to differentiate between sex and gender.

  ReplyDelete
 5. काही प्रमाणात पटलं पण आवडते कॅटगरीतल्या स्त्री लेखिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललीय यादीतून आणि पुरुषांची अपवाद म्हणण्याइतकीही कमी नव्हती आधीपासून तेव्हा संवेदचं म्हणणं जास्त पटतय.
  संवेद स्त्रीयांच्या लेखनाचे मध्यबिंदु पुरुषच असतात हे तुझे विधान अस्वस्थ करुन सोडणारं आहे पण मला वाटतय नातेसंबंध हा विषय स्त्रिया जास्त वेळा हाताळतात (कारण तो त्यांना जास्त समर्थपणे जमतो) म्हणूनही तसं वाटत असेल कदाचित. नात्याचं एक टोक आधी पुरुषाच्या हातात सोपवून पुढे त्या नात्यांचा गुंता करत आणि मग तो उलगडत बसायचा रिकामटेकडा छंद स्त्रि चा सनातनच आहे.
  आणि ते कोवळेपण, संवेदनांची टोकं सोडूनच दे. त्यांच्याच अतिरेकाने स्त्रिलेखिका गळायला लागल्यात माझ्या यादीतून. भावनांकडे वस्तुनिष्ठपणे बघायची पुरुषलेखकांची पद्धत निदान लेखनात तरी स्त्रिया कधी आणायला शिकणार काय जाणे (दोन सणसणीत अपवाद प्रिया तेंडुलकर आणि गौरी)
  क्षिप्रा तु दिलेली सानियाची कविताही अफ़ाट आहे. सानियाची कविता पहिल्यांदाच वाचली.

  ReplyDelete
 6. "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होईल. अधिक माहिती http://marathi-e-sabha.blogspot.com/ या ब्लॉगवर आहे.
  तुमचा सहभाग प्रार्थनीय आहे.

  ReplyDelete