Sunday 18 January 2009

नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते?
एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक.
तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या तशा म्हणजे? हव्या तशा गोष्टी म्हणजे स्पेस. म्हणजे काय? आपल्याला एकट्याला निवांत जागा?
नाही, फक्त तितकंच नव्हे. आपल्याला हवं ते, हवं त्याला, हव्या त्या पद्धतीत, हवं तेव्हा बोलण्याचं - जास्त नेमकेपणानं सांगायचं तर, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे स्पेस. तर ही स्पेस आपल्याला कुणालाच मिळत नाही आहे. आणि हा फक्त जागा - कमी किंवा अधिक जागा - हा प्रश्न नाही. त्याच्यापलीकडचं काहीतरी आहे.
वर्तुळाच्या परीघामधेच दुसर्‍या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ते दुसरं वर्तुळ पुरं केलं तर काय होतं? परीघ एकमेकांमधे शिरतात. असं एकदा केलं तर ओव्हरलॅपिंग प्लेन तयार होतं.
पण असंच वारंवार अनेकवार परत परत परत केलं तर? तर केऑस तयार होतो.
सध्या आपण केऑसमधे राहतो आहोत. गोंधळ होणं साहजिक आहे.
कुठलं वर्तुळ आधी काढलेलं, कुठलं नंतर काढलेलं, कुठलं ठळक, कुठलं पुसट, कुठलं मोठं, कुठलं लहान - हे सगळे प्रश्न इथे गैरलागू आहेत. जिवंत गरगरती वर्तुळं आहेत. ओव्हरलॅपिंग आहेत. केऑस आहे. चिडचिड आहे.
या सगळ्याला पर्याय नाही.
तर आपण हे मुकाट स्वीकारू या.
आता हे स्वीकारूया बीकारूया प्रकरण कागदावर ठीक आहे.पण ते जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात नाकापाशी होत असतं, चार-दोन धक्के लागत असतात, पाणी अंगावर उडत असतं - तेव्हा काही झक मारायला स्वीकारूया वगैरे आठवत नाही. देधडक बेधडक पद्धतीनं आपण - म्हणजे मी - तोंड सोडून मोकळे होत असतो. मी तरी असंच डील करत आलेली आहे. कधी मी कुणाच्या अंगावर वसकन ओरडते, कधी समोरचा घुम्म बसून राहतो. चालायचंच. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. एकदा माणूस आपला म्हटला, की असल्या दोन दिल्या-घेतल्याची चिंता करून भागत नाही. त्याच्या - आणि माझ्याही - इमोशनल आउटबर्स्ट्समधे आमची दोघांचीही एनर्जी भरपूर खर्च होत असते. त्यातून डोक्यावर डोकी आपटतात. त्यातून कधीकधी नाही त्या गुंतागुंती होतात, नाही असं नाही. पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.
ही संधी असते. धोकाही. माणूस कायमचा आपला/परका होत जाण्याची/चा. व्हाइस व्हर्सा.
तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच.
नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या.
स्वीकारलं की नीट मनापासून खेळता येईल. एकदा खेळच म्हटला, की शांतता कोर्ट चालू आहे स्टाईलमधे आपलं आयुष्य वेगळं आणि खेळ वेगळा या पद्धतीत नीट एन्जॉय करता येईल. स्पेस मिळेल - न मिळेल - पण तिचा आभास तरी निर्माण होईल. कुठलं तरी वर्तुळ पुसता येईल. कुठलं तरी विस्तारता येईल. आपापल्या सिस्टीममधला केऑस नीट मनासारखा एकमेकांच्या अंगावर सोडता येईल. परिणाम काय व्हायचे ते होवोत. काही बंध घट्ट होतील. काही कापले जातील.
आतून दाटलेले आपण रिते - मुक्त होऊ. कदाचित थोडे थोडे एकमेकांना भरूनही देऊ.
तर निकाल काय असायचा तो असो. खेळणं आवश्यक आहे. हे तरी आपण स्वीकारू या. स्वीकारू या?

10 comments:

  1. आतून दाटलेले आपण रिते - मुक्त होऊ. कदाचित थोडे थोडे एकमेकांना भरूनही देऊ.

    खासच एकदम.

    ReplyDelete
  2. तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच. नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या. स्वीकारलं की नीट मनापासून खेळता येईल.

    हे पटलं कारण स्वीकार ही बदलाची पहिली पायरी आहे

    एकदा खेळच म्हटला, की शांतता कोर्ट चालू आहे स्टाईलमधे आपलं आयुष्य वेगळं आणि खेळ वेगळा या पद्धतीत नीट एन्जॉय करता येईल.

    हे मात्र जरा अवघड वाटतंय. इतकं वेगळं ठेवता येईल का? असा प्रश्न पडला.

    ReplyDelete
  3. "पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते."

    छान! हे कधी मला लक्षात नाही आलं, नेमकं असं.

    बाकी चांगला पकडायचा प्रयत्न केला आहेस...पण हे सगळं चिमटीत पारा पकडण्यासारखं आहे ना? दुर्दैवाने...

    ReplyDelete
  4. गेल्या दोन पोस्टवर ही एक कॉमेन्ट. पण प्रॉब्लेम असा होतो की वैयक्तिक संदर्भ माहीत असले की उगाच ते चष्मे चढतात डोळ्यांवर वाचताना. असो. तो प्रयत्न टाळून लिहू पाहातोय.

    स्पेस/स्वातंत्र्य इ इ ..कुणापासून? स्वतःपासून पळण्याचे पर्याय नसतातच. आणि सर्वांपासून तोडून राहायचं तर लिखाणाच्या प्रेरणा काय? स्वतःतच डोकावून त्याचेच पडसाद लिहीत राहायचे तर दुर्बोध, स्वकेंन्द्रीत लिखाणाचे धोके शिवाय रिपिटेशन तर आहेच. नचिकेताचे उपाख्यान म्हणतं तसं हातातला ससा न मोडू देता खेळ खेळण्यात कौशल्य आहे!!

    ReplyDelete
  5. रितं होण्याची प्रोसेस कधी पूर्णपणे न संपणारी....पण रितं होता होता कुणाची तरी ओंजळ भरणं!!
    पटलं :)

    ReplyDelete
  6. अगं कुठे आहेस?

    लिही ना.

    ReplyDelete
  7. समहाऊ - मी हे पोस्ट वाचलं नव्हतं!
    सही झालंय!
    काही काही कविता नसतात का - साध्या सुध्या वाक्याने सुरुवात होऊन साध्या सुध्या वाक्याने संपतात आणि आणि सगळ्या (ट ला ट) टुकारांची आईमाई काढतात - तसा प्रकार वाटला हा.
    संदर्भ माहित असण्या नसण्याने (म्हणजे माझ्या बाबतीत नसण्याने) काय फरक पडतो? स्पेस चे फंडे युनिव्हर्सल आहेत - पोस्टला फ्लो मस्त आला होता - साध्या सुध्या कविते सारखं कधी सुरु झालं आणि कधी संपलं कळलं नाही.

    संवेद - शीक रे बाबा.

    ReplyDelete
  8. झालं नां सगळं मनासारखं? आता लिवा

    ReplyDelete
  9. brilliant, I read this before having an experience of such a "process" ki confrontation kaahi hi mhan and I read it again today after the "process". Exact agdi. As if you were there watching it happen. My feelings post the experience are also same. You reminded me of a line from "you've got mail"
    "So much of what I see reminds me of something I read in a book, when shouldn’t it be the other way around?"
    chaan aahe baye khup chaan .. lihit raha ashich.
    "पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.
    ही संधी असते. धोकाही. माणूस कायमचा आपला/परका होत जाण्याची/चा. व्हाइस व्हर्सा. "
    hyabaddal tula award dile paahije
    Thanks Faar chaan

    ReplyDelete