हू दी हेल केअर्स?

19:39:00

फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं.
इतकंच फक्त.
***

हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस.
एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात.
हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर होणारी तगमग.
ऑफीसमधलं प्र-चं-ड काम. जवळ येणारी डेडलाईन. डोक्यातला कासावीस गदारोळ.
गोष्टीचा शेवट कळला पाहिजे, शेवट कळलाच पाहिजे -
वाचायला सगळी पहाट आणि सकाळ मिळते. गाडीतही वाचता येतंच. पण ऑफीसमधे? तिथे कसं वाचणार? गोष्टीचा शेवट तर लवकरात लवकर कळला पाहिजे.
हॅरीला पूर्ण तयारीनिशी लढायला उतरायचं आहे. लढणं अपरिहार्य आहे, या हतबलतेतून नव्हे. पूर्ण निर्धारानं. सगळे सगळे संदेह - संशय - गंड बाजूला सारून. आपल्या ताकदीवर पुरा विश्वास ठेवून.
मग मरणं की मारणं यांतले हिशेब आपोआप बाजूला राहतील. फक्त निर्णय घेता आला पाहिजे.
हॉलोज की हॉरक्रक्सेस? अमरत्वाचा शाप की मरणाचं वरदान?
अहं, कुठेतरी काहीतरी चुकतं आहे...
काय चुकतं आहे?
हॅरीची ऍन्क्झायटी आणि माझं ऍड्रेनॅलिन एकत्रच वाढत असलेलं. दोन टास्क्सच्या मधे मी स्क्रीनवर चक्क हॅरीची सॉफ्टकॉपी उघडते.
निर्लज्ज? मेबी. हू दी हेल केअर्स?
त्याच्या-माझ्या विश्वांनी परस्परांचा परीघ छेदला आहे.
भासमय विश्व? मेबी. अगेन, हू दी हेल...
जिवानिशी सुटायचं असेल, तर आता आम्हांला आपापली वर्तुळं चालून पुरी करण्यावाचून गत्यंतर नाही.
आता शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बस्स. बस्स झालं आहे त्याला आता.
ही नाटकी माणसं. त्यांच्या आचरट अपेक्षा. मूर्ख-विकृत साले.
एक त्याची लहानगी बहीण भेटायला हवी आहे आत्ता त्याला...
तिचा मनासारखा निरोप घेतला, की तो पश्चिमेकडे निघून जायला मोकळा.
मग बसा झक मारत. त्याला देणंघेणं नाही. खरंच.
हॉल्डन वेदरफिल्ड त्याचं नाव.
वय? उणंपुरं सोळा वर्षांचं. शरीरातलं गरजांचं उधाण. डोक्यातलं आडव्यातिडव्या विचारांचं. आजूबाजूला पसरलेली तडजोड.
अनाकलनीय आहे हे सगळं त्याला. खोल खोल बुडत चालला आहे तो...
हॉल्डन वेदरफिल्ड मला भेटला, तेव्हा माझं वय त्याच्यापेक्षा बरंच जास्त असलेलं. पण 'तळ्यातली बदकं हिवाळ्यात कुठे जातात?' या त्याच्या प्रश्नानं मला तितक्या सहजासहजी पुढे जाऊन दिलं नाही.
एखाद्या गोडगुलाबी-देवदूती परीकथेतल्या नायकानं झोपण्यापूर्वी निरागसपणे विचारलेला प्रश्न नाही हा. डोण्ट लेट युअरसेल्फ एस्केप फ्रॉम इट.
आत न मावणारा संताप आणि आर्तता त्याच्या प्रश्नात. एक इमर्जन्सी. तिनं मी खिळल्यासारखी झाले.
मी सोईस्कररीत्या विसरून गेले होते, त्या प्रश्नांना त्यानं बिनदिक्कत हात घातलेला.
मला त्याचा इतका भयानक राग का येतो आहे? तो शिवराळ, तो खोटारडा, तो माजोरडा म्हणून?
की थोडा तो माझ्यात आहे, आणि थोडी मी त्याच्यात म्हणून?
आय स्वेअर, असलं काहीतरी बांधलं जातं, तेव्हा सोबत वाट काटण्यावाचून गत्यंतर नसतंच.
होय, मिसरूडही न फुटलेलं कोवळं पोर.
कदाचित खरं - कदाचित खोटं. पण हू दी हेल केअर्स?
शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बदामच्या राणीला वेड्यात काढणारी ऍलिस.
आपल्या गुलाबकळीला जिवापलीकडे जपणारा लिटिल प्रिन्स.
'थोडासा रुमानी हो जाए'मधला बारिशकर.
वादळात बिनदिक्कत जहाज घालणारा कॅप्टन रॉस.
आवेगानं चक्रधरला बिलगत जगून घेणारी हॅर्टा.
'मी लहान मुलासारखा तुझ्या मागे लागू?' असं काकुळून हरिलालला विचारणारा सौमित्र.
काय खरं? काय खोटं?
प्रेयसीला कान कापून देणारा व्हिन्सेण्ट.
त्याच्या फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं.

इतकंच खरं फक्त.

You Might Also Like

11 comments

 1. एखाद्या ललितकृतीचा आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ललितकृतीशी एकरूप होण्याची देणगी थोड्याना मिळते. ती तुम्हाला लाभली आहे याची साक्ष हे प्रस्तुत टिपण देते. एखाद्या अतितप्त रसायन असणार्‍या भांड्याचा चटका ते भांडे धरणार्‍याला लागावा तसे येथे ब्लॉगकर्तीचे झाले आहे. मात्र त्याकरता ते रसायन तसे तप्त असायला हवे हेदेखील खरे. कोमट पदार्थ असून चालायचा नाही. व्हॅन्गॉ च्या तृष्णेमधे , सॅलिंगरच्या होल्डनच्या अस्वस्थतेमधे, हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेतल्या जन्म-मरणाच्या कोड्यामधे (आणि लेखाच्या शेवटी असणारी इतर अजरामर पात्रांमधे) प्रस्तुत वाचिका आरपार बुडाल्याचा प्रत्यय या लिखाणाद्वारे येतो. कुठल्याही ललितकृतीला (की आयुष्यातल्या कशालाही) भिडण्याचे (सामान्यतः बोलायचे तर) दोन मार्ग असू शकतात ... एका मार्गावर आपली सम्यक्-व्यापक दृष्टी आपल्याला आधारभूत वाटते. one tends to think ; reason rules. आणि अर्थातच दुसरा मार्ग आहे, तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे , "प्युअर अड्रानिलिन"चा. we "feel" . Intution dominates. पहिल्या मार्गावर कदाचित चित्राचे सांगोपांग दर्शन घडेल , आपल्या मनावर झालेल्या परिणामांबद्दल आपण अनालिसिस करू. दुसर्‍या मार्गावर मात्र व्हॅन गॉच्या रंगांमधला(आणि त्याच्या आयुष्याचाही) आगीचा लोळ तुम्हाला दग्ध करून टाकणार. सॅलिजरच्या पौगंडावस्थेतल्या चित्रणाने तुमचा श्वास कोंडणार.

  एनीवे , अशा बाबतीत कुणाच्या मार्गाची निवड त्याची/तिची स्वतःची थोडीच असते ?

  तुमचे पोस्ट फार फार आवडले. लेखक लिहीतो त्याच्याइतकेच इन्टेन्सली वाचणार्‍यांची उदाहरणे विरळा. तुमच्यासारख्यांकरताच "ग्रेट" कलाकृती बनतात, तुमच्यासारखे रसिक मिळावेत याकरता कलावंत तळमळतात.

  ReplyDelete
 2. nahi jhepla [:(]
  maybe coz i hv never read harry potter.. maybe, coz i cudnt relate to the other references also [:(]..

  ReplyDelete
 3. मला एकवेळ पोस्ट झेपलं, पण मुक्तासुनीत ची कॉमेंट नाही झेपली. :)

  ReplyDelete
 4. आपलं वाचन किती तोकडं आहे ह्याची प्रचंड लाज व चीड वाचताक्षणी आली नि तुझ्या व्यासंगाचा थोडासा हेवाही वाटला...खोटं कशाला सांगा. परिणामी बहुतांश संदर्भ झेपले नाहीत हेही लज्जास्पद सत्यच. तरीही काही संदर्भ तपशील बदलून दुसरीकडे सापडले नि तेवढ्याच उत्कटतेने भिडले. लेख आवडला असंही नाही म्हणणार नि नावडला असंही नाही, कारण मुळात आपली लायकीच नाही ह्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची. पण एक दिवस तुझं म्हणणं नेमकं कळेल एवढी परिपक्वता यावी एवढीच इच्छा आहे. ह्या लेखाची खूणगाठ कायमसाठी!

  ReplyDelete
 5. Asach Philip suddha tula oLakheecha vaaTel. Pareegh chhedateel he nakki, common area arthatach anubhav-pinD-vay-etyadi goShTeenvar variable.

  ReplyDelete
 6. त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं.इतकंच खरं फक्त....you wrote a poetry

  You need to be bit mad, bit extremist to live this, realize this..

  ReplyDelete
 7. >> त्याच्या-माझ्या विश्वांनी परस्परांचा परीघ छेदला आहे.
  >> जिवानिशी सुटायचं असेल, तर आता आम्हांला आपापली वर्तुळं चालून पुरी करण्यावाचून गत्यंतर नाही.

  Class!!!
  Khupach surekh jhala ahe he post!

  ReplyDelete
 8. Who the hell cares!!!
  Right!!
  U have to walk along with them... mag ti pustakatli mansa asot kinwa aayushyatali...
  U just cannot escape!!

  I really love U for this post dear!!
  its a feeling like u r meeting urself again!! ani tevhdha asel ki who the hell cares!!

  ReplyDelete
 9. १८ दिवस झाले या पोस्टाला...किती हा कंटाळा

  ReplyDelete
 10. तुला खो दिलाय...

  ReplyDelete