इदं न मम

आवडलेले थोडे काही

23:06:00

संवेदचा खो घेऊन या कविता पोस्ट करतेय -
हरिलाल
खूप उशिरा ओळख पटत जावी एखाद्याची
तसे जाता जाता
एकमेकांना आवडू लागलेले आपण
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
एखादा पाहुणा नको-नको म्हणत असताना
कोडग्यासारखा राहायला यावा आपल्या घरात
तसा तू माझ्या वस्तीला आलास
आणि खूप मनस्ताप दिलास
तुझ्या आईबाबांसारखाच मलाही.
माझ्यातल्या सगळ्या सवयी,
सगळ्या व्याधी, सगळ्या वेदना पाहून
तुला ओळखीचं वाटलं असेल
कदाचित माझं शरीर,
कदाचित...
तुला श्रीमंत करायचं असेल मला
मला आणखी दु:ख देऊन.
पण तू येण्याच्या खूप आधीपासून
तुझ्यासारखाच खूप वणवणलोय मी
दु:खाच्या शोधात,
इतका...
की तू जेव्हा शिरलास माझ्यात
तेव्हा तुझं दु:ख आणि माझं दु:ख
मला फरकच करता येईना त्यांच्यात.
म्हणूनच लोक
मला तू समजू लागले
आणि तुझा लौकिक इतका
की हळूहळू लोक मलाही ओळखू लागले.
आणि आता
माझ्या भोवताली ही माणसांची गर्दी
'तू' जमवलेली
उद्या ही मला विचारील
'कसा आहेस तू?'
तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ?
मला माणसामाणसांनी समृद्ध करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
मी तुला माझ्यातून जायला सांगत नाही
आणि अजून थोडा थांब म्हणून
राह्यलाही सांगत नाही
इतकी मला आता तुझी सवय झालीय...
आता तुझं असणं-नसणं
माझ्यासाठी एकाच प्रकारचा मनस्ताप!
पण तरी
तू का आवरू लागलायस
माझ्यातलं तुझं एकेक सामान?
का गुंडाळू लागलायस
प्रवेशच्या प्रवेश पानांसकट?
का करू लागलायस बांधाबांध
तासागणिक वर्षांची?

उद्या-परवा
तू अखेरचा पडदा पाडशील आपल्या दोघांत
आणि चालू लागशील दूरची पायवाट
तेव्हा
बाहेर जाताना लहान मूल जसं मागे लागतं...
तसा मी तुझ्या मागे लागू?
मी तुझ्याकडे काही मागू?
प्रयोगागणिक मला लहानाचा मोठा करत जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

उन्हात वणवण फिरताना
मला तुझी आठवण येईलच
आईच्या डोळ्यांत बघताना
माझ्या काळजात धस्स होईलच
तुझा चेहरा विरला तरी
तुझी चाहूल राहीलच...
पण मित्रा, एक सांग...
कुठे जाशील?
काय करशील?
कसा राहशील?
तसा आहेच भणंग मीही
पण जाता-जाता
मला आणखी भणंग करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

('गांधी विरुद्ध गांधी'चे शेवटचे तीन प्रयोग चाल्ले असताना)
सौमित्र
***
कुठून करावी सुरुवात
रोज एक चुटपूट ठेवून देते मी
जिभेखाली विरघळवत तास न् तास.

दिवसभर उन्हातान्हात फिरून शिणलेले शब्द,
थंडीवार्‍यात काकडलेल्या ओळी, पाऊसपाण्यात
चिंब परिच्छेद... एकवटून येतात रात्री
एका पत्रासाठी, जे तुला पाठवण्याची
शक्यता आजमावतेय मी दररोज.

कळत नाही, कुठून करावी सुरुवात
पुन्हा स्वतःला रचायला.
की, काही तरी सलग अर्थाचा शब्द
तुझ्या हातावर ठेवायला हवा...!
कविता महाजन
माझा खो नंदन आणि ए सेन मॅनला.

काहीबाही

हू दी हेल केअर्स?

19:39:00

फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं.
इतकंच फक्त.
***

हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस.
एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात.
हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर होणारी तगमग.
ऑफीसमधलं प्र-चं-ड काम. जवळ येणारी डेडलाईन. डोक्यातला कासावीस गदारोळ.
गोष्टीचा शेवट कळला पाहिजे, शेवट कळलाच पाहिजे -
वाचायला सगळी पहाट आणि सकाळ मिळते. गाडीतही वाचता येतंच. पण ऑफीसमधे? तिथे कसं वाचणार? गोष्टीचा शेवट तर लवकरात लवकर कळला पाहिजे.
हॅरीला पूर्ण तयारीनिशी लढायला उतरायचं आहे. लढणं अपरिहार्य आहे, या हतबलतेतून नव्हे. पूर्ण निर्धारानं. सगळे सगळे संदेह - संशय - गंड बाजूला सारून. आपल्या ताकदीवर पुरा विश्वास ठेवून.
मग मरणं की मारणं यांतले हिशेब आपोआप बाजूला राहतील. फक्त निर्णय घेता आला पाहिजे.
हॉलोज की हॉरक्रक्सेस? अमरत्वाचा शाप की मरणाचं वरदान?
अहं, कुठेतरी काहीतरी चुकतं आहे...
काय चुकतं आहे?
हॅरीची ऍन्क्झायटी आणि माझं ऍड्रेनॅलिन एकत्रच वाढत असलेलं. दोन टास्क्सच्या मधे मी स्क्रीनवर चक्क हॅरीची सॉफ्टकॉपी उघडते.
निर्लज्ज? मेबी. हू दी हेल केअर्स?
त्याच्या-माझ्या विश्वांनी परस्परांचा परीघ छेदला आहे.
भासमय विश्व? मेबी. अगेन, हू दी हेल...
जिवानिशी सुटायचं असेल, तर आता आम्हांला आपापली वर्तुळं चालून पुरी करण्यावाचून गत्यंतर नाही.
आता शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बस्स. बस्स झालं आहे त्याला आता.
ही नाटकी माणसं. त्यांच्या आचरट अपेक्षा. मूर्ख-विकृत साले.
एक त्याची लहानगी बहीण भेटायला हवी आहे आत्ता त्याला...
तिचा मनासारखा निरोप घेतला, की तो पश्चिमेकडे निघून जायला मोकळा.
मग बसा झक मारत. त्याला देणंघेणं नाही. खरंच.
हॉल्डन वेदरफिल्ड त्याचं नाव.
वय? उणंपुरं सोळा वर्षांचं. शरीरातलं गरजांचं उधाण. डोक्यातलं आडव्यातिडव्या विचारांचं. आजूबाजूला पसरलेली तडजोड.
अनाकलनीय आहे हे सगळं त्याला. खोल खोल बुडत चालला आहे तो...
हॉल्डन वेदरफिल्ड मला भेटला, तेव्हा माझं वय त्याच्यापेक्षा बरंच जास्त असलेलं. पण 'तळ्यातली बदकं हिवाळ्यात कुठे जातात?' या त्याच्या प्रश्नानं मला तितक्या सहजासहजी पुढे जाऊन दिलं नाही.
एखाद्या गोडगुलाबी-देवदूती परीकथेतल्या नायकानं झोपण्यापूर्वी निरागसपणे विचारलेला प्रश्न नाही हा. डोण्ट लेट युअरसेल्फ एस्केप फ्रॉम इट.
आत न मावणारा संताप आणि आर्तता त्याच्या प्रश्नात. एक इमर्जन्सी. तिनं मी खिळल्यासारखी झाले.
मी सोईस्कररीत्या विसरून गेले होते, त्या प्रश्नांना त्यानं बिनदिक्कत हात घातलेला.
मला त्याचा इतका भयानक राग का येतो आहे? तो शिवराळ, तो खोटारडा, तो माजोरडा म्हणून?
की थोडा तो माझ्यात आहे, आणि थोडी मी त्याच्यात म्हणून?
आय स्वेअर, असलं काहीतरी बांधलं जातं, तेव्हा सोबत वाट काटण्यावाचून गत्यंतर नसतंच.
होय, मिसरूडही न फुटलेलं कोवळं पोर.
कदाचित खरं - कदाचित खोटं. पण हू दी हेल केअर्स?
शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बदामच्या राणीला वेड्यात काढणारी ऍलिस.
आपल्या गुलाबकळीला जिवापलीकडे जपणारा लिटिल प्रिन्स.
'थोडासा रुमानी हो जाए'मधला बारिशकर.
वादळात बिनदिक्कत जहाज घालणारा कॅप्टन रॉस.
आवेगानं चक्रधरला बिलगत जगून घेणारी हॅर्टा.
'मी लहान मुलासारखा तुझ्या मागे लागू?' असं काकुळून हरिलालला विचारणारा सौमित्र.
काय खरं? काय खोटं?
प्रेयसीला कान कापून देणारा व्हिन्सेण्ट.
त्याच्या फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं.

इतकंच खरं फक्त.