काहीबाही

गरज

13:33:00

१. 'साले माजलेत...' या उक्तीखेरीज ज्यांचं वर्णन अपुरं ठरतं असे रिक्षावाले.
२. जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं मेहेरबानी केल्याच्या थाटात पुरवणारं सरकारी वाचनालय आणि तिथले कर्मचारी.
३. सदैव कशासाठी तरी उकरून ठेवलेले आणि ट्रॅफिकनं बुजबुजलेले रस्ते, झाकणं चोरीला गेलेली गटारांची असहाय्य तोंडं, उखडलेल्या लाद्या, भाजीवाल्यांनी आणि पायरेटेड सीडीवाल्यांनी हक्कानं व्यापलेले फुटपाथ.
४. रात्री अडीच वाजताही आश्चर्यकारक गर्दीनं ओसंडणारं रेल्वे स्टेशन.
५. एखादी सीडी सापडेनाशी झाल्यावरच ज्याची नाईलाजानं साफसफाई होते आणि ती करताना त्या सीडीखेरीज आवळ्याच्या बिया, अमृतांजनची बाटली, दोन महिन्यापूर्वीच्या 'लोकरंग'चं मागचं पान, खंडीभर जळमटं-धूळ-गुंतवळ एवढा सगळा ऐवज बक्षिसासारखा मिळतो, तो आपला थकेला दमेकरी पीसी.
६. दर आठ दिवसांनी थपडा मारल्यावर एकदम मख्खनके माफिक चालणारा, भांडताना निमित्त आणि मारामारी करताना हत्यार अशी दुहेरी सर्व्हिस देणारा, खिळखिळा झालेला टीव्हीचा रिमोट.
७. खूप वापरल्यामुळे बांधणी सैल झालेली पुस्तकं, त्यांची कोपरे दुमडलेली मुखपृष्ठं आणि कसल्याही संदर्भाखेरीज लख्ख आठवून येणार्‍या अधल्यामधल्या ओळी.

माणसांपेक्षाही जास्त तीव्रतेनं या गोष्टी नुसत्याच आठवतात आणि त्यांचा नेहमीइतका राग न येता नुसतीच लख्ख आठवण येतच राहते तेव्हा -

मनसे आणि राज ठाकरेबद्दल शरम, राग आणि संभ्रम हे सगळं एकदम वाटतं, तरीही त्याच्यात आणि आपल्यात असलेला मराठी असल्याचा धागा नाकारता येत नाही आणि इतके दिवस घट्ट असलेली आपली भूमिका भौगोलिक जागा बदलल्यामुळे एकाएकी डळमळीत होऊन अस्थिर झाल्यासारखं वाटतं तेव्हा -

'आयपीलमें किसे सपोर्ट कर रही है? मुंबई या बेंगलोर?' या मुंबईस्थित बिहारी मित्राच्या प्रश्नावर 'अर्थात मुंबई, काय आचरट प्रश्न आहे हा!' हे तोंडावर आलेलं उत्तर मागे परतवून 'हॅट, आय डोण्ट फॉलो आयपील. वोह क्या क्रिकेट है?' हे पायाभूत डिप्लोमॅटिक उत्तर आपसूक दिलं जातं तेव्हा -

घाम न येण्यातली प्रचंड सोय जाणवण्याचे दिवस मागे पडून 'छे, अशानं वजन कमी कसं होणार', 'उष्णतेचा त्रास होतो ब्वॉ फार', 'कायच्या काईच हवा ही.. सतत बदलणारी...' अशी कुरबुर आपोआप तोंडून बाहेर पडायला लागते तेव्हा -

'आयटी हब' असलेल्या शहरातल्या कौतुकाच्या बागा म्हणजे 'फुकट पोसलेले पांढरे हत्ती आहेत..' असं सिरियसली वाटायला लागतं,

अनिश्चित-अवाजवी ट्रॅफिक जॅम्सचा वैताग येऊन आपण रविवार घरीच लोळून काढायला लागतो,

'हे कसली मॉल्सची कौतुकं सांगतात आम्हांला? आमच्याकडे येऊन पाहा एकदा...' हे वाक्य लोकांच्या सनातनी मेण्टॅलिटीपासून ते विमानतळाच्या स्वच्छतेपर्यंत कुठल्याही गोष्टीला चपखल बसायला लागतं,

'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...' या कुणाच्याश्या दाव्यावर तोंड उघडण्याचीही तसदी न घेता मनात फक्त कुत्सित हसणं उमटतं,

मीटरप्रमाणे बत्तीस रुपये होणार्‍या ठिकाणी रिक्षावाल्याच्या हातावर ठरल्याप्रमाणे पन्नास रुपये टिकवल्यावर, तो 'और दस रुपया मॅडम. अभी साडेदस बज गया' असं अत्यंत निरागस-निर्विकारपणे म्हणतो. मामाला वचकून असणार्‍या मुंबईतल्या रिक्षावाल्याच्या आठवणीनं गहिवरावं की जिभेवर आलेली पाच अक्षरी कचकचीत शिवी आधी मागे सारावी, हे न कळून आपण हतबुद्ध होतो तेव्हा -

तेव्हा समजावं -

घरी एक पखालफेरी मारून येण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याखेरीज पुरोगामी आधुनिक ग्लोबल नागरिक म्हणून आपलं निभणार नाही...