Wednesday 23 April 2008

वार्‍याने हलते रान...

सहसा काम करण्यासाठी ही अशी जागा मिळणं दुरापास्त.

दोन्ही टोकांना धडधडणार्‍या शहरांच्या मधे वसलेला हा निवांत पट्टा. कसलेच गज नसलेली मोठ्ठीच्या मोठ्ठी सरकखिडकी. समोर खाडी. खाडीला समांतर जाणारे निर्लेप संन्यस्त रूळ. अद्याप माणूसपणा शाबूत असलेला शांत फलाट. खाडीचं वेळीअवेळी चमचमणारं-ओसरणारं पा़णी.

त्या पाण्यावर जगलेलं हे मोकाट रान. जिवंत, श्वास असणारं.

त्या रानाला चक्क रानाचा असा हिरवा-ओला वासही येई. त्याचा रानगट हिरवेपणा, पावसाळ्यात ओसरून जाणारं त्याचं शहरीपणाचं भान, त्याला अगदी क्वचितच होणारा चुकार माणसाचा स्पर्श आणि तिथले ते काव्यात्म गूढ बगळे. या सार्‍यावर पाऊस कोसळे, तेव्हा तिथल्या जडावलेल्या रानवट शांततेत आपणच उपरे असल्याचं निर्दय-तीक्ष्ण भान देत जात असे ते रान.

रान नजरेच्या पातळीला असतं, तरी त्याचा स्पर्श असा हाताच्या अंतरावर भासला असता. आणि मग त्याची कळे न कळेशी दहशतही वाटली असती कदाचित. पण माझ्या खिडकीनं मला निराळीच जागा बहाल केलेली. एरवी आपल्या भासमय अस्तित्वानंही धडकी भरवू शकले असते असे अनेक सळसळते स्पर्श, खसफसणारे आवाज आणि तो ओलाकंच गंध - सगळंच मला माझ्या खिडकीतून एक निराळीच मिती दिल्यासारखं दिसे.

जिवंत. पण दूरस्थ.

मी पावसाळ्यात गेले तिथे. म्हणूनच बहुधा - त्या खिडकीचं, त्या रुळांचं, त्या रानाचं आणि पावसाचं एक अनाम नातं रुजून राहिलेलं माझ्याआत. आतल्या एसीची पर्वा न करता बिनदिक्कत खिडकी उघडून पाऊस अंगावर घेतला, तेव्हाच जुळत गेली तार कुठेतरी. मग पाऊस ओसरून गवताचा रंग मालवत गेला, तरीही आमची ओळख राहिलीच. मागच्या बाजूच्या अव्याहत धडधडणार्‍या आकर्षक महारस्त्याकडे पाठ फिरवून माझं इमान रानाशीच राहिलं.

पण हे जाणवलं मात्र खूप उशिरा.

***

तेव्हा कुणाशी नीटशी ओळखही नसलेली. समोर तेवणारा कॉम्प्युटर आणि शेजारची खिडकी. इतकंच असत असे जग आठ तासांपुरतं. कितींदा तरी नकळत नजर खिडकीतून बाहेर लागून राही. कोसळत्या पावसाचा जाड धुकट पडदा, आतली बर्फगार यांत्रिक थंडी आणि बर्‍याचदा भिजून ओलेगच्च झालेले निथळणारे कपडे. तरी पावसाआडून गप्प-गंभीर रान खुणावत राही. सगळे अपमान-उपेक्षा-एकटेपणा त्याच्याकडे पाहत असताना मृदावून जात. त्या तिथून पाहताना लोकल ट्रेनही कसली तत्त्वचिंतक स्वभावाची वाटे... मला दिसे ती शहराकडे पाठ फिरवून निघालेली ट्रेन. गर्दीच्या वेळाही नसत. कुणी एखादा वारा पिऊ पाहणारा दारात लटकणारा कलंदर आणि रिकामी धडधडणारी ट्रेन. तिच्याकडे पाहताना अलिप्त शांतसे वाटत जाई. ते गप्प रान आणि तिथून जाणारी ती ट्रेन. त्या रानापाशी आसरा घेण्याची आणि ट्रेनची वाट पाहण्याची सवय कधी लागली कळलंच नाही.

आजूबाजूच्या माणसांना तर पुठ्ठ्याचे कट-आउट्सच मानत असे मी त्या काळात.

रान तेवढं मनात नकळत मूळ धरून राहिलेलं.

***

आमच्यात अंतर कधी पडत गेलं ते आता नीटसं आठवत नाही. खरे तर त्या काळातले रानाचे तपशीलच फारसे आठवत नाहीत. तेव्हा माणसं असायला लागली होती आजूबाजूला.

माझं लक्ष नसतानाच कधीतरी पाऊस ओसरत गेला... रानाचा रंग बदलत गेला. तिथली गंभीर हिरवाई वितळून उन्हाळत गेलं रान हळूहळू. त्याचा तो ओला-पोपटी वास एक दिवस नसलेलाच. त्याचं माणूसघाणेपण संपल्यासारखं. कुणी कुणी चक्क चार-दोन गुरं चारायला आणलेली रानात. पातळ मखमली पंखांची सोनपिवळी फुलपाखरंही चक्क. टायर पिटाळत त्याच्यामागे धावणारी चार कारटी आणि त्यांना उंडारायला एका पायवाटेपुरती जागा करून देणारं रान. हसर्‍या तोंडावळ्याचं. गुरं-पाखरं-पोरं-फुलपाखरं खेळवणारं. माणसाळलेलं.

त्याच्या त्या बदललेल्या चेहर्‍याची दखल जेमतेमच घेण्याइतपत फुरसत होती असावी मला. काम, माणसं आणि मैत्र्याही रुजत गेलेल्या. त्या काळात रानाशी केलेली बेईमानी आणि महारस्त्याकाठचा सज्जाच आठवतो. वाहत्या रस्त्यावरचे फर्र फर्र आवाज - त्या आवाजांना पचवून उरणारी निखालस शांतता - भणाण वारा आणि उडणारी ओढणी - गप्पांच्या साथीनं रिचवलेले असंख्य बेचव चहाचे कप. मोकाट गप्पांचे दिवस.

मानवी नेपथ्यानं जिवंत नटासाठी काही काळ निर्जीव होऊन उरावं तसं उरलं होतं तेव्हा रान. समंजस मित्रासारखं. काही न मागता अबोल साथ पुरवणारं. पण बिनबोलता नकळत बदलत जाणारं.

***

त्याच्या बदलण्याची खरी चरा उमटवणारी दखल घेतली ती तिथल्या मोकाट गवताला एके दिवशी आग लागल्यावर. रान चुपचाप बिनविरोध माघार घेत गेलेलं. आणि मोकळं होत जाणारं माळरान.

धस्स झालं होतं. आणि आपणच आपल्याशी केलेल्या बेईमानीची कडू जाळती जाणीवही.

तोवर वेळ निघून गेली होती पण. हळूहळू रान मागेच सरलं निमूट.

मग काही माणसांचे जथ्थे. काही पालं. काही फरफरणारर्‍या चुली. काही झोळ्यांचे पाळणे. अजून काही माणसं. काही ट्रक. काही घमेली आणि फावडी.

मग थेट वीटभट्ट्याच.

***

आता उरल्यासुरल्या रानावर पाऊस कोसळत असेल. रान पुन्हा एकदा असेल गप्प-गंभीर-उदास. इथेही पाऊसच...

मला आठवताहेत त्यानं दिलेले काजवे. काही चुकार फुलपाखरं. एक लखलखतं दुहेरी गोफाचं इंद्रधनुष्य.
आणि दु:खासारखी सखोल घनगंभीर साथ.

एक आवर्तन पुरं झालेलं आता. माझंही...

रानाला काय आठवत असेल? आता खिडकीत उभं राहून रानाला साथ कोण पुरवत असेल?

Wednesday 16 April 2008

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत...

आजच्या संध्याकाळीला भेसूर चेहरा नाही.

नाही. कसलाच तात्पुरता मुखवटाही नाही.
वेळ भरत राहण्याचा, स्वतःपासून पळत राहण्याचा शाप नाही.
दिवस पुरता अर्धमेला झाल्यावरच घराकडे परतण्याचा धाक नाही.

नाही. ही सवयही नाही.

अजुनी संध्याकाळ जिवंत असण्याची संपली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीचं अप्रूप.

सवय? माणसाला कसलीही सवय होते.
घेट्टोमध्ये मरण उद्यावर ढकलत राहण्याची.
मृत नात्यांमध्ये पेंढा भरत राहण्याची.
मरेपर्यंत जगत राहण्याची.

ती सवय. ही सवय नव्हे.

अजून तरी संध्याकाळ म्हणजे अनामिकानं भयभीत होऊन देवाच्या दगडापाशी शरण जाण्याची वेळ झाली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीच अप्रूप.

तश्या संध्याकाळी होत्याच जिवंत माझ्याआत. असल्या-नसल्या सगळ्यासकट अंधारात उडी मारताना. रसरसून पेटून जगताना. वैराण उद्ध्वस्त होत जाताना. गुलाबी फुलांच्या नसतील. धगधगत्या केशरी जाळाच्या असतील. पण जिवंत होत्या. म्हणून तर दर दिवशी त्यांना तोंड देताना थकून जायला होई. वाटे, यातून कधी सुटका होणार की नाही? किती काळ हे असं केसर-जाळाचं आयुष्य? कधीतरी ताकद संपेल. कधीतरी थकून, भिऊन आपण कासवासारखे मिटून घेऊ स्वतःला. एखाद्या संसारी स्त्रीसारखी संध्याकाळीच्या थडग्यावर दिवेलागणीचा दिवा लावून स्वतःची सुटका करून घ्यायला शिकू. कातरवेळ मरून जाईल... निबर होऊ आपण...

तशी आजची संध्याकाळही संपूर्ण जिवंत. पण तिचा चेहरा भेसूर नाही.

माझ्यातली सगळी दमणूक शोषून घेत,
कलत्या उन्हाची जादू पुन्हा बहाल करत,
त्या मऊ प्रकाशाला कोवळे उत्कट सूर पुरवत.
जिवंत पावलांनी, उष्ण-सुखद श्वासांनी,
अंगणात उतरलेली संध्याकाळ.

अपुरेपणाचं भय न दाखवता त्यातल्या जिवंतपणाचं आश्वासन देणारी संध्याकाळ.

अशा निरामय वेळेसाठी कृतज्ञ तरी कुणाचं असायचं असतं?

कदाचित अशा वेळेसाठीच शब्द खोदून गेलेल्या त्या कवीचं.

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही,
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे,
तोवर आम्हांला एकमेकांशी अबोला धरण्याचा अधिकार नाही...

...या आयुष्यात खोल बुडी मारून आलेला एखादा,
सर्वांना पोटाशी धरणारा कुणीतरी,
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे...

Thursday 10 April 2008

क्यूँ नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे...

क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला 'एरोबिक्स' म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले.
ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता.
भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते.
जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, 'बाय' म्हणताना दीड सेंटीमीटर पुरे.
येताजाता लोकांना 'हाय' न करता 'ब्लिंक' केलं तरी चालतं.
आपण बरं, आपलं काम बरं.
एन्जॉय माडी...

असलं स्वतःचंच कौतुक करत करत परवा 'जेन फोंडा'गिरी पार पाडली.

आणि आपलं नाक दीड फूट उंचावर ठेवून अलिप्तपणे माणसांतून वाट काढत चालायला शिकलो आपण, अशी शाबासकी स्वतःला देण्याच्या बेसावध क्षणीच एरोबिक्स-बाईनं चांगलं साडेपाच सेंटीमीटरचं हास्य माझ्या दिशेनं फेकलं.

काही कळायच्या आत मी माझ्याच खांद्यावरून मागे पाहिलं.

तिथे कुणीसुद्धा नाही, हे कळल्यावर मात्र मी दचकले.

म्हणजे... मला?
का बाई?
मी काय केलंय?
माफ कर...

असे विचार डोक्यात येतात न येतात तोच तिनं मोर्चा माझ्याकडे वळवला. मी कोण-कुठची, मी कित्ती मनापासून व्यायाम करते (हो? असेल बाई..), माझं स्माईल किती गोड आहे (...) वगैरे वगैरे पायर्‍या यथासांग पार पडल्या आणि मग जवळ जवळ रोज बाईंसोबत कॉफी घेणं आलंच.

कॉफी. थोड्या कोरड्या गप्पा. थोडं हसणं. ओळख. मैत्री...?

शिट्...

नाही नाही म्हणताना किती लोकांशी ओळखी झाल्या अशा.

'ठाणे. प्रमोद महाजन का भाई रहता था वहॉं. पता है?' या माझ्या प्रश्नाला 'मुंबई-ठाने. भारत की पहली लोकल ट्रेन. सन अठ्ठारासो तिरपन,' असं उत्तर देऊन माझी विकेट घेणारा एक बिहारी.

'भुस्कुटे म्हणजे....' असं विचारत हेतुपूर्वक थांबून, मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर नाईलाजानं कावरंबावरं हसून, पुढे ओळख करून घेणारी एक मराठी मुलगी. अर्थात - महाराष्ट्राचा कोस्टल एलिमेण्ट!

'क्या? अस्सी हजार? तेरे पापा देंगे इतना डिपॉझिट? चल, मैं बात करवाती हूं सस्तेमें...' असं झापणारी एक दिल्लीकर पोरगी.

दुसर्‍याच रात्री कॅबमधून परतताना अंमळ जास्तच वेळ खिडकीतून चंद्र पाहिला, तर 'होमसिक झालीयेस?' असं मराठीतून विचारून मला दचकवणारा एक मराठी कलीग.

या सगळ्यांना निकरानं टाळता टाळता माझ्या जुन्या ऑफीसमधल्या मित्रांशी किती गप्पा मारल्या मी मनातल्या मनात.

माझे सगळे नखरे- सगळी नौटंकी किती सहज चालवून घ्यायचात तुम्ही.
इथे जेवता जेवता तेव्हा खास माझ्यासाठी आणलेल्या खरड्याची चव आठवते आणि जेवण कडू होतं.
आता इथल्या रिकाम्या संध्याकाळच्या गर्भार वेळी बांग ऐकताना त्या सगळ्या जिवंत संध्याकाळींची तलवार टेकलेली राहते गळ्यापाशी.
संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?
आठवणींना काय प्रहर असतात?

दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत मला सूर्यनमस्कार घालून दाखवणारा आणि 'बघू नका फक्त. करा. करा,' हे वर ऐकवणारा माझा बॉस.

प्रेझेण्टेशनच्या वेळी माझ्या चेहर्‍यावरचं टेन्शन वाचून एका मित्रानं केलेला मेसेज - 'टेक अ डीप ब्रेथ ऍण्ड से लाउडली - भोसड्यात गेली कंपनी...'

एका आत्यंतिक किचकट प्रॉब्लेमवर काम करावं लागू नये म्हणून माझ्याशी लपाछपी कम् पकडापकडी खेळणारे दोन वेडसर मित्र.

'का कंटाळलीयेस इतकी? चल, आइसक्रीम खाऊया?' असं विचारून मला ऑलमोस्ट रडायला लावणारा एक मित्र.

मला साडी नेसलेली पाहिल्यावर हसून गडबडा लोळण्याची ऍक्टिंग करणारा एक मित्र.

शेवटच्या दिवशी मला एकटीला जराही वेळ न देता अखंड बडबड करणारा, जाताना मला घट्ट मिठी मारणारा एक मित्र.

माझं क्युबिकल.
माझा पीसी.
माझी खिडकी.
खाडीचा खारा वारा.
लांबवरचं जिवंत-निवांत शहर.
तिथवर नेणारे ते फिलॉसॉफिकल रूळ...

उफ्फ्...

आता मात्र नाही.
मी मुद्दामहून तुलना करीन दुष्टपणानं यांची त्यांच्याशी.
मुद्दामहून कुचकटपणानं वागीन.
तुसडेपणा करीन.

पण आता नाही. परत नाही.

कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार.

मग कितीही सेंटीमीटर हसा.
पण लांब असा. सुरक्षित अंतर राखून असा...

Friday 4 April 2008

वेळ

शब्द म्हणजे निव्वळ चिखल असं वाटण्याची वेळ येतेच,
आजची वेळ त्यातली.

जगातले यच्चयावत हिंदी सिनेमे,
सगळीच्या सगळी आयन रॅण्ड,
पाऊस, संध्याकाळ, भण्ण दुपार.
ही सारी आपल्या रक्तातली निव्वळ बेअक्कल,
असंही वाटण्याची वेळ येतेच.
शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.

ही विषकन्येसारखी आकर्षक जीवघेणी वेळ.
तिला स्पर्श करण्यासाठीही शब्दांचंच शरीर?
एखाद्या वखवखलेल्या ब्रह्मचारी बैराग्याचं प्राक्तन...
हे देहाला शरण जाण्यातलं वैफल्य?
की शरीराच्या सगळ्या सामर्थ्यांचे उत्सव?

उत्तरं फेकून मारता येतात,
तरी प्रश्न मरत नाहीत.
रस्ते चुकवता येतात,
देणी मात्र चुकत नाहीत...
ही समजूत रक्तात रुजून येण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकावर येतेच.
आजची वेळ त्यातली.

शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.
आजची वेळ त्यातली.