Wednesday, 12 March 2008

ऋतू

इथे सध्या कुठला ऋतू आहे कुणास ठाऊक. पण हवा अगदी नितळ सुरेख आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घरी परततानाही त्या स्वच्छ सोनेरी हवेची आभा सगळीभर पसरून असते. रस्त्यावर डेरेदार झाडांची कमतरता नाहीच. पण त्यांच्या हिरवेपणात तजेला तरी किती! उन्हानं नुसती झगमगत असतात. त्यांच्या हिरवेपणात ऊन मिसळतं आणि सगळ्याला एक झळझळता अनोखा रंग येतो. अशा कित्तीतरी रेखीव दुपारी काचबंद करून ठेवून द्याव्यात असं वेड्यासारखं वाटून जातं मग. हातातलं पुस्तक, डोक्यातले विचार, बाजूचे लोक... असं सगळं बयाजवार असूनही ती उष्ण सुखद दुपार चढत जाते मला...

दुपारी झाडं मोठी देखणी दिसतात खरी. पण फुलं? ती मात्र उतरत्या दुपारीच भेटावीत. ऐन दुपारी फुलांनी बहरलेल्या एखाद्या वेड्या झाडाला पाहिलं, की त्याच्या सौंदर्याला दाद जाण्याऐवजी त्याची वेड्यासारखी काळजीच वाटते. त्या नाजूक नखर्‍याला सोसवेल का हे लखलखीत धारदार ऊन, असं वाटून डोळे भरून येतात...

याउलट कलत्या दुपारी घराजवळच्या वळणावर ही वेडी फुललेली झाडं नेहमी भेटतात. आणि दर वेळी त्यांना बघून तितकंच मनापासून खूश व्हायला होतं. पानं म्हणशील, तर नाहीतच. नुसतेच गुलाबी पाकळयांचे घोसच्या घोस. रंगही जर्रा म्हणून भडकपणाकडे झुकणारा नव्हे. फिका मऊशार राजस गुलाबी. तुझ्या लाडक्या गावठी गुलाबाची आठवण करून देणारा. ते असं फुलांनी मातलेलं झाड पाहताना आपल्यालाही अगदी वेडं व्हायला होतं.
मनात आपला खुळा गुलमोहोर उभा राहतोच... पण वाटतं, गुलमोहोर एखाद्या भटक्या कलंदर कवीसारखा. त्याच्या केशरी उधळणीत जे बंडखोर उधाण आहे, त्याची सर कशालाच यायची नाही. त्याचे ते लालबुंद तुरे कसे आपल्या नजरेलाही क्षणमात्र का होईना - बंडखोरीची वेडसर स्वप्नं दाखवून जातात. त्या उधाणाला पाहूनच संदीपनं लिहिलं असेल का, 'अस्वस्थ फुलांचे घोस...' असं वाटून जातं...
तसं या गुलाबी नखर्‍याचं नाही. विलक्षण शालीन, शांत-मर्यादशील सौंदर्य नजरही वर न उचलता एखाद्या रेशमी अवगुंठनात उभं असावं तसं याचं रूप. खाली गुलाबी पाकळ्यांचा अक्षरश: सडा. कुणी आपल्याच नादात त्या पाकळ्या तुडवत जातं, तेव्हा त्यातल्या गर्भित श्रीमंतीच्या जाणिवेनं खुळावून जायला होतं...

तसेच ते पिवळ्या फुलांचे घोस.
तशी सोनमोहोराची झाडं आपल्याकडेही असतातच. त्यांच्या हळदी पिवळ्या फुलांचा दिमाख वेगळाच. आधीच उताटल्यासारखी फुलतात ती, आणि त्यात त्यांचा मंद उत्तेजक गंध... पिवळाच असून कॅशिया त्या मानानं किती शालीन. त्याचा सौम्य पिवळसर रंग आणि वार्‍यावर झुलणारे आत्ममग्न घोस.. किती अनाग्रही स्वभाव त्या रंगाचा.
इथल्या पिवळ्या फुलांची जातकुळी या दोघांच्या बरोबर मधली. पातळ नाजूक पाकळ्या आणि तजेलदार सोनपिवळा रंग. अंगातली असेल नसेल तेवढी सगळी ताकद खर्चून मस्ती करणार्‍या वांड पोरासारखी फुललेली फुलंच फुलं. कित्ती बेगुमान स्वभावाची झाली, तरी दिवसभर उन्हाच्या नजरेला बेदरकारपणे नजर देऊन रात्रीला दमत असतील का ही, असं वाटून जातंच.

विलायती शिरिषाचं तसं अप्रूप नव्हेच. एरवी रस्ता पंखाखाली घेतो खरा तो. पण संध्याकाळी त्याच्या मिटलेल्या पानांखालून जाताना उगीच रडायला येईलसं वाटत राहतं. कागदीची गुलबाक्षी रंगाची भरजरी फुलंही आपल्याला तशी सवयीचीच.

माझ्या मुंबईकर नजरेला राहून राहून कौतुकाची वाटतात ती जांभळी किनखापी फुलं. उंचच उंच झाड. फांद्या अगदी संन्यस्त पर्णहीन. आणि त्यावर नाजूक व्हायोलेट रंगाच्या फुलांची पखरण. खाली पाकळ्यांची जांभुळलेली धूळ... त्या निळ्या-जांभळ्या रंगावर विश्वासच बसत नाही एकेकदा. व्यासांच्या त्या निळ्या कमळांचा रंगही असला तर असाच असेल, असं उगाच वाटून जातं...

ऋतू बदलल्यावर काय होईल या सगळ्याचं? बदलत्या ऋतूत निराळी फुलं असतील?

कदाचित फुलं नसतीलही...

खरंच, ऋतू पालटतो, तेव्हा काय होतं?

या उत्सुकतेपोटी तरी जीव रुजावा इथे. कोणास ठाऊक, ऋतू परतेलही...

9 comments:

 1. ती दुपार, तो रस्ता डोळ्यांसमोर उभा राहिला. इतकं छान वर्णन करायला patience हवा आणि ती बारीक नजरही. शेवट एकदमच मस्त. आता मलाही उत्सुकता लागलीय की पुढच्या ऋतूमधे या फुलांचं, झाडांचं काय होणार. त्यासाठी का होईना थांबच तिथे. :-)
  -विद्या.

  ReplyDelete
 2. waah, mastch!
  mi suddha ekhadya rastyavarun jatye ani aajubaajula hi zada baghatye asa watla!
  khupch chhan!

  ReplyDelete
 3. अहा काय प्रसन्न देखणी भाषा! खूप आवडलं. काही वेळा तुझ्या पोस्टवर खूप डार्क शॅडो येते. ह्यात कशी छान खुलल्यासारखी वाटतेस.
  दिवसभराच्या कटकटींनी त्रासलेला माझा मूड कसा छान बनलाय.. ही पाडगांवकरांची कविता माझ्यातर्फ़े तुला बक्षिस..

  फ़ुलं तर मी
  जन्मापासून बघत आलो!

  त्यांचे रंग,
  त्यांचे गंध,
  वार्यावर झुलणारे
  त्यांचे छंद...

  अशीच एकदा अचानक
  तु फ़ुलं घेऊन आलीस:
  न बोलता, नुसतीच हसून
  मला फ़ुलं देऊन गेलीस!

  तेव्हापासून फ़ुलं मला
  नव्याने दिसू लागली,
  सगळी फ़ुलं माझी होऊन
  माझ्याशी हसू लागली!

  फ़ुलं कधी अशीसुद्धा
  कळू लागतात!
  आतल्या आतल्या जिवाशी
  जुळू लागतात!

  राहूदेत आता हाच फ़ुलांचा ऋतू तुझ्या मनात:D.

  ReplyDelete
 4. सुरेख...तुला आत्ताच धमकी दिल्याप्रमाणे मी ही परत याच विषयावर कदाचित याच ऋतुत आणि याच वर्षी परत लिहीन..
  पण एकुणात सुरेख आणि प्रसन्न..

  ReplyDelete
 5. सध्या वसंत ऋतु सुरु आहे त्याचा हा परीणाम

  ReplyDelete
 6. सुंदर लेख. वाचताना डोळ्यासमोर पिवळ्या फुलांनी डवरलेले झाड आले.

  ReplyDelete
 7. अहाहा!...कसली गोंडस भाषा आहे...म्हणजे तरल वर्णन, विचार वगैरे तर सुंदरच पण अफाट नाजूक भाषेसाठी विशेष दाद!..."सोनेरी हवेची आभा, जांभुळलेली धूळ, सगळीभर, केशरी उधळणीत जे बंडखोर उधाण आहे..." वाह!
  जीव रुजू देत...ऋतू परतेल...नक्की

  ReplyDelete