काहीबाही

नाटक

18:22:00

सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची असल्याचा. साधे मोबाइल्स सायलेण्ट मोडवर टाकण्याचं सौजन्य नाही. मग 'नाटकानंतर भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे', 'मंडळाचे सदस्य श्री. अमुक अमुक यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं' आणि 'आपल्यासोबत राहुल द्रविडचे आई-वडीलही नाटकाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत...' हे सगळं नाटकाच्या अनाउन्समेण्टसोबत हातासरशी उरकून घेणं आलंच.

अशा ठिकाणी हे इतपत चालायचंच, असं हजार वेळा स्वतःशी घोकूनही माझा चरफडाट थांबत नव्हता. त्यात पडदा उघडला, तरी चार-दोन चालूच राहिलेल्या दिव्यांची आणि नि:संकोच उघडमीट करणार्‍या दाराची भर.

पडदा उघडल्यावरही ही चिडचिड निवळावी असं काही घडेना. बोट ठेवायला तशी जागा नव्हती. चोख पल्लेदार आवाजातले संवाद. सहज वावर. विषयाला साजेसं नीटनेटकं नेपथ्य. आता प्रेक्षागृहात तशी शांतताही. पण कशात काही जीव म्हणून नव्हता. सगळं लक्ष एकवटून त्यात जीव रमवण्याचा प्रयत्न करूनही काही साधेना. हे सगळं कमी झालं म्हणून मधेच एकदा लाइट गेले. एकदा नटाची मिशी सुटली आणि सरळ माफी मागून तो ती लावायला आत निघून गेला.

मी आशा जवळपास सोडून दिलेली.

त्या प्रयोगाबद्दल खरं तर पुष्कळ वाचलं-ऐकलं होतं. त्याच्या विषयाचा वेगळेपणा. आशयाची ताकद. सापेक्षतावाद आणि जागतिक शांततेसारखे ऑलमोस्ट किचकट आणि गंभीर विषय असूनही एकाच पात्रानं ते पेलण्यातला करिष्मा.

पण सगळं समोर मांडलेलं असूनही कलेवरासारखं निष्प्राण. सोन्यासारखी रविवार सकाळ, ट्रॅफिकमध्ये तपःसाधना करून काढलेला दीड तास, न केलेला नाश्ता आणि काहीही कारणाविना डोळ्यांदेखत खचत गेलेल्या अपेक्षा. पाट मांडून रडावं की कसं, असं वाटायला लागलेलं. इतकी निराशाजनक परिस्थिती बदलू शकते असं मला कुणी म्हणालं असतं, तर मी त्याला सरळ आनंद नाडकर्णींकडे शुभार्थी म्हणून काम करायला रवाना केलं असतं.

नेमकं काय बदललं विचाराल, तर ते नाही सांगता येणार. डोक्यात जाणार्‍या मागच्या बाईच्या कुजबुजीपासून पंख्याच्या कुईकुईपर्यंत सगळं तसंच होतं. पण एकदम हवेनं कात टाकली जणू. नटाचा आवाज नेम धरून मारलेल्या एखाद्या भाल्यासारखा आपला वेध घेणारा. त्याची तगमग त्याच्या बोटांच्या अस्वस्थ हालचालींमधून, त्याच्या ओठांच्या सूक्ष्म कंपामधून, त्याच्या डोळ्यांत तरळलेल्या पाण्यातून एखाद्या एक्स्ट्रीम क्लोज् अपसारखी अंगावर येणारी. त्याच्यावर खिळलेले डोळे इकडेतिकडे जाईनात. त्याच्या स्वरातल्या चढ-उतारासोबत श्वास खालीवर व्हायला लागलेला आपलाही.

आसमंत जणू कसल्याश्या अनामिक ताकदीनं भारलेला. नटाचं शरीर-त्याचा चेहरा-त्याचा आवाज. बस. इतकंच उरलेलं सगळ्या जिवंत जगात. सगळ्या नजरा त्या बिंदूशी कसल्याश्या गूढ ताकदीनं खेचलेल्या. ताणलेल्या. त्याच्या एका इशार्‍यावर जणू हे बांधलेले-ताणलेले नाजूक बंध तुटतील, अशा आवेगानं विस्फारलेल्या.

नट?

तो या खेळातलं बाहुलं असेल निव्वळ?

एखाद्या मांत्रिकानं प्रचंड ताकदीनं विश्वातलं अनामिक काही एखाद्या वर्तुळात बांधावं आणि त्या ताकदीचा ताण त्याच्या रंध्रारंध्रात जाणवावा - समोरची ताकद कधीही स्वैर उधळेल आणि उद्ध्वस्त होईल सगळं. कधीही काहीही होऊ शकतं आहे - हा ताण त्याच्या नसानसांतला. आणि तरीही त्याचा तिच्यावरचा ताबा सुटत नाही. तिच्यावर जणू स्वार झालेला तो. तिला हवी तशी नाचवतो आहे आपल्या तालावर. आपल्या शरीरातल्या कणान् कणाच्या ताकदीवर.

भारलं आहे या झटापटीनं आसमंतातल्या सगळ्या चेतन-अचेतनाला...

तो या अनामिक ताकदीला लीलया खेळवतो.

हसवतो. रडवतो. जीव मुठीत धरायला लावतो. सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो...

मंतरलेले आपण जागे होतो, तेव्हा पडदा पडणारा. नि:शब्द शांतता. आणि रक्तातली प्रचंड दमणूक.

प्रेक्षागृहातली ही जादू ओसरून लोक भानावर आलेले. 'हे काय घडून गेलं' या आश्चर्यानं बावचळलेले. खुळचट हसणारे. हळूहळू हालचाल करून आपल्याच हातापायांतली ताकद आजमावणारे. पांगणारे.

नट?

चुपचाप मिशी उतरवत होता. रंग पुसत होता. फुललेला श्वास आवरत होता.

म्हटलं नव्हतं? सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

खो

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

20:04:00

डोक्याच्या तळाशी खळबळणारे काही प्रश्न आणि नुकतीच घडलेली काही निमित्तं. म्हणून हे इथं मांडते आहे. ब्लॉग लिहिण्याचा - खरं तर लिहिण्याचाच - खटाटोप करणार्‍या सगळ्यांनाच उद्देशून आहेत हे प्रश्न. काही अंदाज. काही बिचकते निष्कर्ष. काही निरं कुतुहल.

सहमत व्हा, विरोध नोंदवा, वेगळी मतं मांडा.... हे फक्त विरजणापुरतं -

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं हा प्रश्न कधी पडलाय तुम्हांला? लिहिणं आणि आपण यांच्यातले हे विचित्र संबंध नक्की काय आहेत, याचा छडा लावण्याचा फॅसिनेटिंग खेळ कधी खेळावासा वाटलाय?

सहसा असं दिसतं, की प्रचंड उंची गाठणार्‍या कलाकारांना निदान सुरुवातीच्या काळात तरी त्यांच्या माध्यमाखेरीज कशातच फारशी गती नसते. म्हणजे, जर कुठे 'अहं' गोंजारला जात असेल, तर तो तिथे. बाकी सगळीकडे नुसतंच हाड्-तुड् करून घेणं. हरणं. माती खाणं. मग आपोआपच माणूस आपल्या माध्यमाचा आसरा घेतो. तिथे अधिकाधिक रमत जातो. अभिव्यक्तीसाठी चॅनेल सापडत नाही, म्हणून ते माध्यमाकडे ओढले जात असतील, की माध्यमावर इतकी पकड आल्यावर काहीतरी ओकून टाकावं असं वाटत असेल? की दोन्हीही? की अजून काहीतरी निराळंच?

आणि इतक्या सरावाचं, सवयीचं, जवळ जवळ गुलामाइतकं पाळीव-इमानदार माध्यमही जेव्हा चॅनेल म्हणून अपयशी-अपुरं ठरत असेल तेव्हा?

तेव्हा स्वतःवरचा विश्वास उडावा इतकी टोकाची निराशा-चीड-हतबलता येत असेल? की त्याही परिस्थितीत कुठे तगून राहता येईल तर ते तिथेच, असं वाटून माध्यमाच्या कोशात दडी मारून राहावंसं वाटत असेल? अजून निराशा.. अजून चीड... अजून तगमग. आणि तरीही काय होतं आहे स्वतःला ते नाहीच धड गवसत. आत काय तडफडतं आहे, ते नाहीच बाहेर येत.

तेव्हा?

माध्यम आणि त्या माध्यमावर इतक्या अपरिहार्यपणे - एखाद्या अपंग मुलासारखे - अवलंबून असणारे आपण या दोघांचाही तीव्र स्फोटक संताप येत असेल? आणि या ठसठसणार्‍या दुखर्‍या ठणक्यातून उसळून येत असेल काही?

की दर वेळी हे इतकं इण्टेन्स, इतकं झांजावणारं काही नसतंच?कधी नुसताच इगो सुखावणं? माध्यमावरची स्वतःची हुकूमत अनुभवणं? 'सराईतपणा' एन्जॉय करणं?

नक्की काय? की सगळंच?

लिहिणं म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय?

माझा खो संवेदला.

***


हा खेळ खेळायला चढत्या क्रमानं मजा येतच गेली, येते आहे. खरं तर खेळ अजून संपला नाही. पण आता साखळी लांबत चाललीय. अजून बरीच मंडळी लिहितील. तोवर साखळी एका ठिकाणी सापडावी, म्हणून थोडा खटाटोप -
"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?" - संवेद
ठिपक्यांची न बनलेली रेषा... - ट्युलिप
मैंने गीतों को रच कर के भी देख लिया... - राज
I think, therefore... - सेन मॅन
फिर वही रात है... - मॉन्स्यूर के
माझिया मना जरा सांग ना... - विद्या
खो-खो, चिमणी, मंत्रा! - जास्वंदी
मी आणि पिंपळपान - संवादिनी
मी का लिहिते? - यशोधरा
जेव्हां माझ्या ego च्या हातून माझ्या id चं मानगूट सुटतं तेव्हां. - सर्किट

काहीबाही

ऋतू

18:32:00

इथे सध्या कुठला ऋतू आहे कुणास ठाऊक. पण हवा अगदी नितळ सुरेख आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घरी परततानाही त्या स्वच्छ सोनेरी हवेची आभा सगळीभर पसरून असते. रस्त्यावर डेरेदार झाडांची कमतरता नाहीच. पण त्यांच्या हिरवेपणात तजेला तरी किती! उन्हानं नुसती झगमगत असतात. त्यांच्या हिरवेपणात ऊन मिसळतं आणि सगळ्याला एक झळझळता अनोखा रंग येतो. अशा कित्तीतरी रेखीव दुपारी काचबंद करून ठेवून द्याव्यात असं वेड्यासारखं वाटून जातं मग. हातातलं पुस्तक, डोक्यातले विचार, बाजूचे लोक... असं सगळं बयाजवार असूनही ती उष्ण सुखद दुपार चढत जाते मला...

दुपारी झाडं मोठी देखणी दिसतात खरी. पण फुलं? ती मात्र उतरत्या दुपारीच भेटावीत. ऐन दुपारी फुलांनी बहरलेल्या एखाद्या वेड्या झाडाला पाहिलं, की त्याच्या सौंदर्याला दाद जाण्याऐवजी त्याची वेड्यासारखी काळजीच वाटते. त्या नाजूक नखर्‍याला सोसवेल का हे लखलखीत धारदार ऊन, असं वाटून डोळे भरून येतात...

याउलट कलत्या दुपारी घराजवळच्या वळणावर ही वेडी फुललेली झाडं नेहमी भेटतात. आणि दर वेळी त्यांना बघून तितकंच मनापासून खूश व्हायला होतं. पानं म्हणशील, तर नाहीतच. नुसतेच गुलाबी पाकळयांचे घोसच्या घोस. रंगही जर्रा म्हणून भडकपणाकडे झुकणारा नव्हे. फिका मऊशार राजस गुलाबी. तुझ्या लाडक्या गावठी गुलाबाची आठवण करून देणारा. ते असं फुलांनी मातलेलं झाड पाहताना आपल्यालाही अगदी वेडं व्हायला होतं.
मनात आपला खुळा गुलमोहोर उभा राहतोच... पण वाटतं, गुलमोहोर एखाद्या भटक्या कलंदर कवीसारखा. त्याच्या केशरी उधळणीत जे बंडखोर उधाण आहे, त्याची सर कशालाच यायची नाही. त्याचे ते लालबुंद तुरे कसे आपल्या नजरेलाही क्षणमात्र का होईना - बंडखोरीची वेडसर स्वप्नं दाखवून जातात. त्या उधाणाला पाहूनच संदीपनं लिहिलं असेल का, 'अस्वस्थ फुलांचे घोस...' असं वाटून जातं...
तसं या गुलाबी नखर्‍याचं नाही. विलक्षण शालीन, शांत-मर्यादशील सौंदर्य नजरही वर न उचलता एखाद्या रेशमी अवगुंठनात उभं असावं तसं याचं रूप. खाली गुलाबी पाकळ्यांचा अक्षरश: सडा. कुणी आपल्याच नादात त्या पाकळ्या तुडवत जातं, तेव्हा त्यातल्या गर्भित श्रीमंतीच्या जाणिवेनं खुळावून जायला होतं...

तसेच ते पिवळ्या फुलांचे घोस.
तशी सोनमोहोराची झाडं आपल्याकडेही असतातच. त्यांच्या हळदी पिवळ्या फुलांचा दिमाख वेगळाच. आधीच उताटल्यासारखी फुलतात ती, आणि त्यात त्यांचा मंद उत्तेजक गंध... पिवळाच असून कॅशिया त्या मानानं किती शालीन. त्याचा सौम्य पिवळसर रंग आणि वार्‍यावर झुलणारे आत्ममग्न घोस.. किती अनाग्रही स्वभाव त्या रंगाचा.
इथल्या पिवळ्या फुलांची जातकुळी या दोघांच्या बरोबर मधली. पातळ नाजूक पाकळ्या आणि तजेलदार सोनपिवळा रंग. अंगातली असेल नसेल तेवढी सगळी ताकद खर्चून मस्ती करणार्‍या वांड पोरासारखी फुललेली फुलंच फुलं. कित्ती बेगुमान स्वभावाची झाली, तरी दिवसभर उन्हाच्या नजरेला बेदरकारपणे नजर देऊन रात्रीला दमत असतील का ही, असं वाटून जातंच.

विलायती शिरिषाचं तसं अप्रूप नव्हेच. एरवी रस्ता पंखाखाली घेतो खरा तो. पण संध्याकाळी त्याच्या मिटलेल्या पानांखालून जाताना उगीच रडायला येईलसं वाटत राहतं. कागदीची गुलबाक्षी रंगाची भरजरी फुलंही आपल्याला तशी सवयीचीच.

माझ्या मुंबईकर नजरेला राहून राहून कौतुकाची वाटतात ती जांभळी किनखापी फुलं. उंचच उंच झाड. फांद्या अगदी संन्यस्त पर्णहीन. आणि त्यावर नाजूक व्हायोलेट रंगाच्या फुलांची पखरण. खाली पाकळ्यांची जांभुळलेली धूळ... त्या निळ्या-जांभळ्या रंगावर विश्वासच बसत नाही एकेकदा. व्यासांच्या त्या निळ्या कमळांचा रंगही असला तर असाच असेल, असं उगाच वाटून जातं...

ऋतू बदलल्यावर काय होईल या सगळ्याचं? बदलत्या ऋतूत निराळी फुलं असतील?

कदाचित फुलं नसतीलही...

खरंच, ऋतू पालटतो, तेव्हा काय होतं?

या उत्सुकतेपोटी तरी जीव रुजावा इथे. कोणास ठाऊक, ऋतू परतेलही...