शो मस्ट गो ऑन, यू नो!

00:52:00

कविता. युद्ध. शृंगार. लालभडक मत्सर. रक्तपात-दंगली-खून. चळवळी-क्रांत्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणारी कविता. एकाच चिरंतन तत्त्वाचं अव्याहत चक्र जणू...

आपल्या सगळ्यांमधलं हे जे स्पिरिट असतं ना, त्याला संस्कारांनी खूप आकार-उकार देतो आपण. वेळोवेळी काबूत ठेवतो स्वत:चेच सगळे अनावर विकार. तो संयम महत्त्वाचा खराच. पण निरोगी जिवाचं हे तडफडणारं स्पिरिट असतं ना, ते असं शांत नाही बसत. 'माझ्यात काय कमी आहे, म्हणून मी जाऊ देईन ही जगण्याची संधी' असं ज्या त्वेषानं म्हणत असेल एखादा निरोगी, चपळ, सुदृढ, नीती-अनीती न जाणणारा एखादा चित्ता भक्ष्यावर तुटून पडताना; त्याच त्वेषानं जागी होते मनातली ईर्ष्या. नीती-अनीती न जाणताच.

"मला तू हवा आहेस आणि तुलाही मी, मग का मानायचे हे संयमांचे बांध? हा कसला निसर्गाचा अपमान?"

असा रोखठोक प्रश्न यमी यमाला विचारते. ते रक्ताने भाऊ-बहीण असल्यामुळे त्यांना शरीर संबंध शास्त्रानं निषिद्ध सांगितलेला.
हाच प्रश्न विचारते निर्भयपणे लोपामुद्रा अगस्तीला. त्याला संयमानं शरीराची वासना जिंकायची आहे, म्हणून तो तिला शरीरसुख देऊ इच्छित नाही, तो तिचा पती असूनही.
हाच प्रश्न विचारते इंद्राणी इंद्राला. त्याला आता तिच्यात रस नाही उरलेला. एकेकाळी त्यांनी धुंद प्रणय अनुभवलेला असूनही. त्याचं सारं लक्ष जिंकलेलं जग वसवण्यात लागलेलं.
हाच प्रश्न विचारते अंबा भीष्माला. ती स्वत:चं क्रुद्ध तारुण्य घेउन उभी आणि तो मात्र कुरुकुलासाठी सगळ्या कोवळ्या भावना होमून मोकळा झालेला.

पुरुष आणि प्रकृती यांच्यातला हा सनातन वाद. पार वेदकाळापासून चालत आलेला.

आपल्यातला हा वाट्टेल त्या परिस्थितीत जगू पाहणारा लसलसता, फोफावणारा, संस्कृतीला जणू जन्म देणारा कोंब खरा? की संयमाचा-संस्काराचा, संस्कृतीला घडवणारा-आकार देणारा बांध खरा?

कदाचित दोन्हीही. कुणास ठाऊक...

तुला फार आवडणारा कर्ण. त्याचंही तसंच नव्हे का?
तसा कर्ण कुणालाही आवडतोच. कुठल्याही न्यायी, स्वाभिमानी माणसाला आवडावा असाच आहे तो. वाट्याला आलेलं सगळं मुकाट पचवून नशिबालाच मान खाली घालायला लावणारा. अबोलपणे सगळे सगळे मान-अपमान हसत जगून जाणारा.

पण मला कृष्ण जास्त जवळचा वाटत आला आहे नेहमीच.
त्याचं ते सगळं उधळून कुठल्याही गोष्टीत स्वत:ला अर्पून घेणं मोहवतं मला. उतू जाणार्‌य़ा दुधासारखं त्याचं व्यक्तिमत्त्व... अस्सल कलावंतासारखं स्वत:ला जगण्याच्या उल्हासात होमू पाहणारं.. उतू जाणार्‍या दुधासारखं... होमून टाकणारं... किती अर्थपूर्ण शब्द वापरले आहेत दुर्गाबाईंनी... तसाच आहे तो. गोकुळात यशोदेचा आणि राधेचा. मग रुक्मिणी-सत्यभामेचा. मग भीमार्जुनांचा. मग यादवांचा. एकातून दुसरं व्यक्तिमत्त्व जणू उमलत जातं त्याचं. बासरी, रथाचे बंध, तत्त्वज्ञान आणि धनुष्यही. सगळंच कसं उत्कट-संपूर्ण-भरभरून केलेलं. संयम विसरून.

याउलट कर्ण. परिस्थितीनं त्याला धगधगणारा संयमच शिकवला फक्त. सतत स्वत:मधल्या तेजाला आवर घालत जगण्याची मुलखावेगळी सक्ती. जणू सगळा ज्वालामुखी कोंडून धरलेला असावा छातीत असा कोंडून धरलेला अनावर आवेग.

दोन्ही जणू एकाच शक्तीची रूपं. एक उसळणारं. एक बांधलेलं.

हाच का तो बेसिक फरक? द्रविड आणि तेंडुलकरमधला? नसीर आणि अमिताभमधला?

तुझ्या आणि माझ्यामधला?

कोण महत्त्वाचं? कोण बरोबर? कोण खरं?

कदाचित दोन्हीही खरेच. कुणास ठाऊक...

आपण आपापले हट्ट हट्टानं लावून धरायला हवेत मात्र! शो मस्ट गो ऑन, यू नो!

You Might Also Like

14 comments

 1. मेघना,

  सकाळी सकाळी तुझा हा पोस्ट वाचला, म्हणून असेल कदाचित, असंगत वाटला. कदाचित मला पार्श्वभूमी माहीत नसल्यानेही असेल.

  पण तरीसुद्धा आवडला. थोडक्यात सांगायचं तर उतू गेलेल्या दुधासारखा वाटला, मनातल्या ऊर्जेने उतू गेलेल्या....कृष्णासारखा...... संयत, सहनशील नाही.

  ReplyDelete
 2. आपण आपापले हट्ट हट्टानं लावून धरायला हवेत मात्र! - agadee. swadharme nidhanM shreya:, paradharme bhayaavah: cha arth hi haach. (dharm = aapali prakRuti/pinD/swabhaav)

  ReplyDelete
 3. post aavaDale. nandanashi sahamat aahe.

  ReplyDelete
 4. मेघना - सही लिहिलंयस.
  मलातरी वाचताना कुठल्याही संदर्भांची गरज अथवा उणीव भासली नाही, तसंच लिखाण कुठेही असंबद्ध वाटलं नाही.
  तसं द्वंद्व - कुठल्या ना कुठल्यातरी प्रकारचं, प्रत्येकाचं आणि सतत चालूच असतं म्हणा. उसाचा रस उकळून गुळाच्या ढेपा पाडण्याच्या अव्याहत प्रक्रियेत चुकुन कधी भट्टीतली आग दिसते इतकंच.

  ReplyDelete
 5. >>> दोन्ही जणू एकाच शक्तीची रूपं. एक उसळणारं. एक बांधलेलं.
  ...
  कोण महत्त्वाचं? कोण बरोबर? कोण खरं?
  कदाचित दोन्हीही खरेच. कुणास ठाऊक..

  liked the way u juxtaposed two different personalities.
  how do u define a personality? i agree that a personality is based on individual traits - what nandan refers to as "dharm = aapali prakRuti/pinD/swabhaav".

  at the same time, doesnt a person/character/personality evolve with the circumstances that he/she undergoes? and the consequences that he/she faces because of the actions they take?

  as u say, it is difficult to decide who's wrong or who's right; rather who's better...

  the show must indeed go on..

  well written, as always :)

  p.s. am wondering why only men have responded to this post so far :D
  that can be an idea for another post from u.

  ReplyDelete
 6. ushira taktey comment.... apratim zalay he.... to good....

  ReplyDelete
 7. निती-अनिती, खरं-खोटं...कश्यालाच अर्थ नसतो अगं. आपण कुठे उभे आहोत यावर आपलं perspective ठरतं. आणि कोण म्हणतं एका वेळी एकच गोष्ट आवडावी?

  ReplyDelete
 8. एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)

  http://sty-mar1.blogspot.com/

  ReplyDelete
 9. द्वंद... आणी आयुश्य कधी कधी समान अर्थी शब्द वाटतात नाही? but still show must go on....योगायोगाने आजच orkut वर हे caption टाकल आणी तुझा ब्लोग नंतर वाचला....:)

  ReplyDelete
 10. "show must go on" asa mhanun swatahach thand ka basliyes?

  ReplyDelete
 11. मला आता उपदेशाचा नैतिक अधिकार प्राप्त झालेला आहे आणि तो वापरुन मी तुला काळं-पांढरं करायचा "आदेश" देतो आहे...ताबडतोब

  ReplyDelete
 12. अतिशय सुरेख पोस्ट, खूपच आवडल.

  ReplyDelete