Tuesday 6 November 2007

रायटर्स ब्लॉक


बिनओळींच्या कागदावर लिहिण्यातली गंमत काही औरच.


कोरा करकरीत कागद आणि आपण. अधेमधे साधा ओळींचाही आसरा नाही. आपण संपूर्ण निराधार. समोर काहीतरी अफाट सुंदर अंतहीन पसरलेलं असावं अशी मन दडपून टाकणारी, पाऽऽर एकटं वाटायला लावणारी भावना. ’सर्वांगानं भिडावं - काय होईल ते होईल’ अशी उद्धट ओढ आणि ’आपण नेहमीसारखी माती खाणार...’ अशी नर्व्हस करून टाकणारी बर्फगार भीतीही...


कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद.


ती गंमत रेखीव कागदात नाही. आई-बापांनी आखून दिलेल्या रस्त्यावर निमूटपणे चालून नीट शहाण्यासारखं यशस्वी-बिशस्वीही व्हावं तसं वाटतं ओळी आखलेल्या कागदावर लिहिताना...


कधी कधी एखाद्या भाग्यवान क्षणी मनासारखं पांढर्‌यावर काळं होतंही. अशा वेळी मला हटकून ’रंगीला’मधल्या त्या वल्ली दिग्दर्शकाची आठवण येते. "अपनी कॉम्पिटिशन यहाँके डिरेक्टर्ससे हैंही नही..." असं म्हणणारा, पैसे वाचवण्यासाठी निर्मात्यानं बसच्या ऐवजी रिक्षा देऊ केल्यावर भन्नाट उखडणारा तो दिग्दर्शक खरा तर त्या कथानकात कुठेच महत्त्वाचा नव्हे. पण त्याचं ते मनस्वी आर्टिस्टपण दोन-चार फटकार्‌यातूनही नीट लक्षात राहून जातं. सिनेमातला सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांनी केलेला पसंतीचा जल्लोष म्हणजे आपल्या हक्काची दाद आहे, अशा थाटात स्वत:वरच खूश झालेली त्याची ती मुद्रा... ’मोहम्मद बिन तुघलक’ हेच एक नाव त्याला शोभेल! वाटेवरल्या धोक्यांची आणि त्यात पणाला लागलेल्या सर्स्वस्वाची लख्ख जाणीव, ते सारं पार करून येताना आलेला आत्मविश्वास आणि कलाकाराच्याच मुद्रेवर उमटू शकेल अशी लोभस धन्यता...


एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी तो दिग्दर्शक होऊन जाण्याइतके नशीबवान ठरतोही आपण. नाही असं नाही. पण असे क्षण दुर्मीळच... एरवी संवेद म्हणतो तशी " आणि शब्द सापडलेच नाही तर? अर्थांचे कोलाज परत मागाल मला सारे?" अशी अवस्था.


आत्ममग्न समाधानाचे क्षण विलक्षण दुर्लभ आणि तसेच क्षणभंगुरही. तेवढ्या औटघटकेच्या श्रीमंत सोनेरी स्पॉटलाईटमधून बाहेर पडल्यावर सगळेच सामान्य ब्लॅकाउट्स. सगळी आभासी जादू हिरावून घेणारे. "शी:, हे लिहिलं आपण?" असा स्वत:चाच अविश्वासयुक्त राग आणि प्रामाणिक शरम. "बास झाला आचरटपणा" असा घोर, प्रामाणिक निश्चय ही अशा वेळा साधून येणारी नियमित बाब.


तरीही बेशरमपणे परत एकदा पांढर्‌य़ावर काळे करण्याची वेळ येतेच. तेव्हा आपल्याच बेशरमपणाचा, लोचटपणाचा, नाईलाजाचा जो बेक्क्कार तिटकारा वाटतो, त्याची तुलना कशाशीच होणार नाही.


आतलं सगळं बेगुमानपणे बाहेर उधळून टाकण्याची तीव्र गरज आणि "पुरे झाला फजिता..." असा ठाम कठोर आवाज स्वत:चाच. दोन्ही एकाच वेळी.


यालाही ’रायटर्स ब्लॉक’ म्हणतात? कुणास ठाउक...

6 comments:

  1. आतलं सगळं बेगुमानपणे बाहेर उधळून टाकण्याची तीव्र गरज आणि "पुरे झाला फजिता..." असा ठाम कठोर आवाज स्वत:चाच. दोन्ही एकाच वेळी -- writer's block nahi vaaTat ha. je dokyat chalalay te ekada 'get it out of you' karun kagadavar mandalas tar tyacha anand hoto. pure zala fajita... baddal mhanasheel, tar aaj fajita vaaTaNaara likhaN kadachit udya nahi tasa vaaTaNaar. kinva tyachya ulat hi mhaNata yeil.

    Anyway, ajit chya blog varacha ha lekh aathavla ya post varun -
    http://ugaach-uwaach.blogspot.com/2006/01/blog-post.html

    ReplyDelete
  2. सहीये!! पोस्टची सुरुवात तर रायटर्स ब्लॉककडे बोट करणऱ्या वाक्यांनी केली होतीस पण मध्येच रंगीलातल्या गुलशनची आठवण करून देवून धमाल आणलीस.

    प्रामाणिक शरम, बेशरमपणा, लोचटपणा, नाईलाजाचा बेक्क्कार तिटकारा, या सगळ्या कन्सेप्टसनाही मोट्ठा अनुमोदक! ;)

    ReplyDelete
  3. kora kagad ni reghancha kagad....vishay aawadala...changla lihilays...

    mala nahi vatat ha kahi writer's block aahe...ni aajkal mala asa vattay ki writer's block ya navakhali ugich gonajarat basNyat swatahla kahi artha nasto...jyancha poT likhaNavar aahe tyana Thik aahe to block ni tyachi dukhkha....bharalya poTi writer's block vagaire jara fajeelpaNa aahe...aso...

    nice one!

    ReplyDelete
  4. Tulahi Diwalichya khoop khoop shubhechchha

    ReplyDelete
  5. मेघना दिवाळी अंकांवर लिहिण्यासंदर्भातली तुझी आणि अनामिका जोशींची माझ्या blog वरची कमेन्ट वाचली. दिवाळी अंकांवर लिहायला हवं होतं लगेच आणि ते खूप आवडलंही असतं पण आशियाई चित्रपट महोत्सवामधे बराचसा वेळ गेल्याने मला काही पोस्ट टाकायलाच जमले नाही. आता दिवाळी संपल्यावरच वेळ मिळेल असे दिसतेय. असो.
    तुम्हां सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा.

    ReplyDelete