गोष्ट

एक फिल्म फेस्टिवल उर्फ कथेसारखं काहीतरी

04:03:00

हा कितवा बरं फेस्टिवल तिचा? मारे "आय नीड अ फेस्टिवल. गॉड नोज्‌ आय नीड वन..." असं घोकत होती खरी ती गेला महिनाभर. पण तरी येणारेय का मजा खरोखर, की नुसतीच ’मज्जा येतेय नाही’ची स्वत:शीच केलेली नौटंकी हा बारीकसा किडा तिला बर्‌याचदा चावून गेला होताच. तरी त्याला तस्सं मागे सारत, मारे सुट्टी-बिट्टी घेऊन, घरी फिल्डिंग लावून तिनं आठ दिवस सिनेमे बघायचा घाट घातला होता. "जावं का आजपासून... की आजचा दिवस निवांत झोपावं घरी जाऊन..." हे डोक्यातलं निरुत्साही चक्र बंद करून टाकत ती शुक्रवारी संध्याकाळी परस्पर ऑफिसातूनच थेटरात पोचली, तेव्हा मात्र फेस्टिवलच्या उत्साहाचा वारा नाही म्हणता म्हणता तिला लागलाच.

तसं सगळं काही सालाबादप्रमाणेच तर होतं.

फुकट पासावर हक्कानं आलेले पत्रकार. स्पॉन्सरर्सच्या पासांतून आलेला हाय-प्रोफाईल्‌ एथनिक लवाजमा. घरातल्या कर्त्या बायांनी सगळ्या धबडग्यातून सवड काढून वर्षाकाठी एकदाच एखाद्या लग्नकार्यात भेटावं आणि वर्षाची बेगमी करून घ्यावी तश्श्या नियमितपणे आणि घरगुतीपणे फेस्टिवलमधे भेटणारे साधेसुधे इंटुक रसिक. कॉलेज बंक करून आलेली उसळत्या उत्साहातली कारटी. कुणाचं लक्ष आपल्याकडे जातंय का याकडे एक डोळा ठेवून असलेली आणि मग कुणी ओळखीचं स्मित केलंच तर जेमतेम हसल्यासारखं करणारी सेलिब्रिटी स्टेटसच्या काठावरची काही व्यक्तिमत्त्वं. अभ्यासूपणे सिनेमे पाहणारे तंत्रज्ञ. तावातावानं चर्चा-बिर्चा करणारे समीक्षक. लगबगीत असणारे छापपाडू आयोजक. आणि आश्चर्यकारक सहनशीलता नि कार्यक्षमता दाखवत या सगळ्या ’अशक्य’ जमावाला हाकणारे कार्यकर्ते.

सगळं तसंच.

तरी त्यातल्या तोचतोचपणावर तिचा सध्याचा खास ट्रेडमार्क असलेली चिडचिड न करता हवेतल्या उल्हासाला प्रतिसाद देत ती जरा मनाविरुद्धच खुशाललीय, हे तिचं तिला जाणवलं, तोवर ओपनिंग फिल्म सुरूही झाली होती. मग फेस्टिवलनं ताबा घेतला तिचा...

***
हा फेस्टिवलचा माहौल आणि त्यातली ’ती’. मीच आहे की ही... मला प्रचंड आश्चर्य वाटतं. शिवाय कथेसारखं काहीतरी लिहितेय की काय मी, असंही एक अंगावर पाल पडल्यासारखं पोट-आश्चर्य वाटून जातं. ही बया आली कुठून? आणि माझ्या घरचं थोडं झालेलं असताना, मी हे व्याह्यांचं घोडं का नाचवायचं? घरी जा... मला काहीही पडलेली नाहीय असं तिरसट उत्तर तोंडावर येतं. पण मग एकदम वाटतं, हे जर कथेसारखं काहीतरी असेल, तर ’ती’ माझ्यापेक्षा वेगळी असणार. तिचे प्रश्नही वेगळे आणि कदाचित उत्तरंही. शिवाय तिच्या आयुष्यात काहीतरी घडतंय, हे काय कमी महत्त्वाचं आहे? कथा आहे, तर सुरुवात-मध्य-शेवट असं काहीतरी असेल आणि कदाचित निष्कर्षवजा उत्तरंही असतील. "माझी" नव्हेत, पण माझ्यासारखीच. तिच्या उत्तरांबद्दलची उत्सुकता मला एकाच वेळी एकदम उतावीळ आणि सहनशील करून टाकते...

***
तशी मजा-बिजा यायला एकदम आदर्श परिस्थिती. सकाळी उठून बाहेर पडायचं तेच मुळी ’आज कुणाचे बरं सिनेमे पाहू या’ असा गोड प्रश्न मनाशी घेऊन. अर्थात सगळेच क्लासिक्स पाहायला मिळतील हा गैरसमज नव्हता उरला तिच्याजवळ इतक्या फेस्टिवल्सच्या अनुभवानंतर. हेही तसं नव्या मैत्र्या सुरू करण्यासारखंच, हे जाणून होती ती. सुरुवात करताना पुरेश्या उत्साहात आणि शक्य तेवढ्या निर्मळ मनानं करायची. मग आपण किती दुखावतो, किती सुखावतो, काय कमावतो आणि काय गमावतो हे सगळं आपण स्वत: सोडून इतर बर्‌याचशा अनकण्ट्रोलेबल घटकांवर अवलंबून. त्यातल्या त्यात तपासून पाहता येण्यासारखं तेवढं पाहायचं - उदाहरणार्थ शक्यतोवर नवा इंडियन सिनेमा नको. तो हमखास क्रॉसओव्हर विषयावरचा तथाकथित विनोदी वगैरे तरी असणार, नाहीतर मग ’विश्वीकरणाच्या झंझावातात भारतीय मूल्यं जपायला हवीत’ असा गळे काढणारा तरी असणार. अपवाद असतातच म्हणा. पण ठोकताळे केव्हाही सुरक्षित.

’पडेल ती किंमत मोजून बेहोश निरोगी मजा की धोपटमार्गानं जाऊन सुरक्षितता-स्थैर्य’ या वादात कायम मित्राशी भांडणार्‌या आपणही जगता जगता बदललो की काय, या विचारानं ती कळवळली आणि मग इतके दिवस न दिसलेली नवीच मजबूरी समजून आल्यासारखी झाली तिला. मित्राची असं नव्हे, एकंदरीतच माणसाची. नेहमी मित्र आठवल्यावर स्वत:चाच राग येऊन होणारा तिचा चरफडाट या वेळी झाला नाही, तेव्हा ती चक्क गडबडलीच. आनंदाचा वा सुखाचा आधार होतो माणसाला असं नाही, कधी कधी माणसं स्वत:च्या सतत चरफडण्याच्या-चिडचिडण्याच्या सवयीचाही आधार करून घेतात. तसंच झालंय बहुधा आपल्याला हा एक नवाच साक्षात्कार झाला तिला.

त्या आश्चर्या-आनंदात मग ती चक्क एक कानडी सिनेमा पाहायला थेटरात शिरली. अपेक्षेप्रमाणे तो पुरेसा बटबटीत आणि साचेबंद निघत गेलाही! शिवाय त्यातली नर्स अगदी आदर्श अनाथ बाईनं असायला हवं, तश्शी सोज्ज्वळ-सडी-सुसंस्कृत-सेवाभावी-सुस्वरूप आणि शिवाय कलकत्ता साड्या नेसून वर कुंकूही लावणारी होती. तिला आणि तिची सेवा घेऊन तिला मुलीसारखं वगैरे मानणार्‌या त्या बाबाला पाहताना परत एक सूक्ष्म राग साचत गेला तिच्याआत. त्या बाबासाठी स्वार्थत्याग करून, वर त्याच्या पाया-बिया पडून ती क्षितिजाकडे निघून गेली तेव्हा तर उपरोधिक तोंडं करून तिनं मैत्रिणीला पार वैताग आणला.

"कुणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा निर्णय नाही का? तिच्या सोज्ज्वळ चाकोरीबद्ध वागण्याबद्दल तू चिडचिड करून काय होणारेय कुणास ठाऊक..." या मैत्रिणीच्या शेर्‌यावर मात्र परत एकदा थांबून विचार करणं भाग पडलं तिला. आणि मग ’आजच दिवस साक्षात्काराचाच’ हे मनोमन मान्य करत तिनं थेटरासमोरच्या टपरीकडे मोर्चा वळवला...

***
एवढी चिडचिड का करत असेल ’ती’, मला मनापासून प्रश्न पडतो. आपल्यासारखाच तिचाही सो-कॉल्ड प्रेमभंग वगैरे झाला असेल? पण अशी चिडचिड करून काय होणार? जी आदर्श संभाव्य उत्तरं आहेत ती शोधलीच आहेत की नाही बाई आपण? मग आता किती टाचा घासून रडलं म्हणून काय बरं होणार? नुसतंच स्वत:चं आयुष्य थांबवून धरल्याचं पाप की नाही? असे अनेक प्रश्न एकदम घाईघाईत मला पडून जातात. या कथेत तिला हे प्रश्न स्वत:लाच पडल्याचं दाखवून तिची चांगली पंचाईत करण्याचा एक माफक दुष्ट विचारही येऊन जातो मनात.

पण मग एकदम वाटतं, ’ती’ माझ्यासारखीच असं मीच म्हटलं होतं... पण म्हणजे मीही नुसतंच आयुष्य थांबवून धरलंय....? तिला निदान त्याचा साक्षात्कार तरी झालाय... माझं काय?

समाधानकारक स्पष्टीकरणं आणि समर्थनं देता येत नाहीत तेव्हा मात्र माझा नाईलाज होतो. माझीच कथा आणि वर मलाच कोंडीत पकडणार? हॅट! कथेसारखं काहीतरी लिहिण्याचं पाप करतेच आहे मी, तर मग मला थोडा तरी फायदा मिळायला नको का?! मग मी सरळ फेस्टिवलमधल्या इतर काही इंटरेस्टिंग गोष्टींकडे लक्ष वेधून घेतल्यासारखं करून पळ काढायचं ठरवते...

***
काही अर्थपूर्ण-एक्सायटिंग आणि काही कंटाळवाणेही सिनेमे, त्यावरच्या निरर्थक चर्चा आणि क्वचित प्रसंगी होणारे असले साक्षात्कार सोडले तर इतरही बर्‌याच गोष्टी फेस्टिवलमधे असतात. सिनेमा बुडवून बाहेर कट्ट्यावर बसून करायची भंकस ही त्यातली एक प्रमुख आकर्षक गोष्ट. सगळं काही आतल्या आत कोंडून टाकून वर निर्विकार राहण्याच्या तिच्या सध्याच्या प्रयत्नांना तर विशेष सूट होणारी. दिवसाच्या - वा रात्रीच्याही - कुठल्याही प्रहरी कटिंग मागवून, गॉसिप्स करून, क्वचित एखाद्याच समजूतदार वाक्यातून सगळ्या फ्रस्टेशन्सवर फुंकर घालून दोस्ती देऊ करणारी ही भंकस. यंदाच्या फेस्टिवलमधी तिनं ती मनापासून एन्जॉय केली.

झालंच तर एकमेकांना टाळू पाहणार्‌या दोन माणसांना एकमेकांवर सोडून, आपण समोर दात काढत उभं राहण्यातली गंमत. आपल्याला फारसं सोईचं नसलेलं कुणी आपल्याला भेटलंच, तर आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून वेळ निभावून नेणं... महारटाळ पत्रकार परिषदांमधे काईच्या काईच अचाट आचरट प्रश्न विचारून मग सरळ गायब होणं... ओपनिंग आणि क्लोजिंग सेरिमनीत व्यासपीठावर चालणारा अभूतपूर्व विनोदी गोंधळ...

आणि खेरीज काही अंतर्मुख वगैरे करणारे सिनेमेही.

नाही म्हणता म्हणता खरंच मजा येत गेली की तिला. इतकी, की निव्वळ स्वत:ची कीव करून एक सिनेमा घळघळा रडत पाहणारी ती, बाहेर पडल्यावर स्वत:लाच चक्रम आणि हट्टी म्हणण्याइतकी निवळली. एका डेन्जरस पकाऊ समीक्षिकेला टाळण्यासाठी चार पत्रकारांनी जिवाच्या आकांतानं केलेली पळापळ पाहून खुदकन हसा-बिसायलाही आलं तिला.

जुन्या मित्र-मैत्रिणींच्या कोंडाळ्यात ५-६ दिवस असे खतरनाक वेगात संपले आणि दुसर्‌या दिवशी ऑफिसला जायचंय, हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती एकदम गळपटलीच. सगळे साक्षात्कार आणि लाईफ-बिईफबद्दलचे समंजस फण्डे जमेस धरूनही तिला धैर्य काही गोळा करता येईना. परत एकदा तेच सगळं. तेच चेहरे, तीच टाळाटाळ, तोच रोज उठून नव्यानं होणारा मनस्ताप. काय करावं काही सुचेचना. त्याच तिरीमिरीत "मला भूक लागलीय, चल काहीतरी खाऊ या" असा वैताग निर्वाणीचा सूर लावत तिनं मैत्रिणीला कटकट केली, तेव्हा तिला परत एकदा मित्राचे ठाम शब्द आठवले - काही भूक-बिक लागली नाहीय तुला. डोकं फिरलं की भूक लागलीय हे एक सोप्पं उत्तर फेकून मोकळी होतेस तू, हे तुझ्या लक्षात आलंय का?

यावर मात्र न भूतो न भविष्यति असा तिळपापड झाला तिच्या अंगाचा आणि ती ऑलमोस्ट हिस्टेरिकली ओरडली मैत्रिणीवर - "दुसरं-तिसरं काही नाही, मला भूकच लागलीय." "पण मी कुठे काय म्हणतेय, जाऊ या ना..." असं डिफेन्सिव्हली पुटपुटणार्‌या मैत्रिणीला कळलंच नाही तिच्या उद्रेकाचं कारण.

या टोटल फिल्मी अनावर आठवणी-बिठवणींतून कसं बाहेर पडायचं ते न कळून ती पार हताश झाली...

***
असं काही आपण तर नाही बुवा केलेलं... मी नीट आठवून म्हणते स्वत:शीच. ’काय तरी एकेक चमत्कारिक माणसं.. नाही जमली एखादी गोष्ट मनासारखी. ठीकाय.. इतका मनस्ताप कशाला करून घ्यावा..’ असली भोचक प्रतिक्रिया माझ्याही डोक्यात सहजच जाते उमटून.

पण खरा वाईट भाग हा, की हे सगळं तिथेच थांबत नाही. आपण असं काही केलेलं नाही हे खरंच. पण असं काही करू शकलो असतो नक्कीच, हे विसरता येत नाही. "मनस्तापाच्या आणि समजूतदारपणाच्या गोष्टी कुणाला सांगता? माझ्यातला असला-नसलेला सगळा जीव उधळून केलाय मी हा जिवावरचा उत्कट मूर्खपणा. इतक्या सहज सोडून द्यायला काय लिपस्टिकची शेड आहे ती चार दुकानांत न मिळणारी? व्हाय डोण्ट यू पीपल अंडरस्टॅण्ड, इट्स नॉट अबाउट एनीबडी एल्स बट माय ओन इण्टेन्सिटी...." हा माझाच व्याकुळ संताप परत एकदा जिवंत होऊन उभा राहतो माझ्यासमोर.

मग मात्र मी थोबाडात मारल्यागत गप होऊन जाते... ’तिची’ गोष्ट शेवटापर्यंत न्यायला हवी.. त्यातूनच मिळतील कदाचित काही उत्तरं.. काही नवे रस्ते, याही खात्री पटायला लागलेली मला हळूहळू...

***
हजार समजावणीच्या क्षणांनी आणि निर्धारी, स्वाभिनामी संकल्पांनी न दिलेला तो क्षण प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात आला तो अगदी अनपेक्षित साधेपणानं.

कुठलीही परिपूर्ण कलाकृती एक उदास संपूर्ण आनंद देऊ करते अनुभवणार्‌याला. सगळं काही उमगलेलं, त्यामागची अपरिहार्यता कळून चुकलेली, तरीही ’गमते उदास’ हे आहेच आणि विचारशक्तीला-संवेदनेला मात्र एखाद्या दुधारी शस्त्रासारखी लखलखती धार चढलेली.

एका औटघटकेच्या पण उत्कट नात्यावरचा सिनेमा होता तो. जेमतेम काही तासांचं आयुष्य लाभलेल्या, पण त्या दोघांच्या मनात चिरंतन होऊन राहिलेल्या नात्याची ती गोष्ट. ती पाहून कितीतरी वेळ उलटून गेला तरी तिनं दिलेलं ताजेपण तस्सं शिल्लक होतं तिच्याआत. तिचा मित्रही तर तस्सा ताजा शिल्लक होता तिच्याआत. तिच्या संतापालाही न पुसता आलेले त्याचे ठसे तस्से उमटून होते तिच्या मातीत...

आता त्या नात्याला जिवंत भविष्य नाही, हे मान्य करता करताच त्या नात्यानं दिलेली श्रीमंतीही लख्ख दिसून आली तिला. ऐन प्रेमाच्या दिवसांत केलेल्या एका रोमॅण्टिक कवितेचे शब्द नव्यानंच आठवले -

तुला पत्र लिहिलं होतं,
तेव्हाही चंद्र असाच खिडकीबाहेर थांबून राहिलेला.
आजही तसाच.
चंद्रसाहेब दिसत राहणार,
चंद्रसाहेब असत राहणार.
पण इथल्या दगडी फरसबंदीवर उमटलेले तुझ्या पावलांचे ठसे,
अवेळच्या पावसाचं त्यांत साठून राहिलेलं हे पाणी,
आणि त्यात सांडलेले हे चंद्राचे काही लखलखते तुकडे.
दर पावसात,
दर पौर्णिमेला...
चंद्रसाहेब दिसत राहणार,
चंद्रसाहेब असत राहणार.
जगातल्या सगळ्या तुटल्या- न तुटलेल्या, अनेकार्थांनी श्रीमंत करून जाणार्‌या नात्यांचे चंद्र असेच असत असणार आहेत... हे मनोमन स्वीकारून टाकलं तिनं.
तिचा यंदाचा फेस्टिवल ’सुफळ संपूर्ण’ झाला...

काहीबाही

रायटर्स ब्लॉक

09:53:00


बिनओळींच्या कागदावर लिहिण्यातली गंमत काही औरच.


कोरा करकरीत कागद आणि आपण. अधेमधे साधा ओळींचाही आसरा नाही. आपण संपूर्ण निराधार. समोर काहीतरी अफाट सुंदर अंतहीन पसरलेलं असावं अशी मन दडपून टाकणारी, पाऽऽर एकटं वाटायला लावणारी भावना. ’सर्वांगानं भिडावं - काय होईल ते होईल’ अशी उद्धट ओढ आणि ’आपण नेहमीसारखी माती खाणार...’ अशी नर्व्हस करून टाकणारी बर्फगार भीतीही...


कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद.


ती गंमत रेखीव कागदात नाही. आई-बापांनी आखून दिलेल्या रस्त्यावर निमूटपणे चालून नीट शहाण्यासारखं यशस्वी-बिशस्वीही व्हावं तसं वाटतं ओळी आखलेल्या कागदावर लिहिताना...


कधी कधी एखाद्या भाग्यवान क्षणी मनासारखं पांढर्‌यावर काळं होतंही. अशा वेळी मला हटकून ’रंगीला’मधल्या त्या वल्ली दिग्दर्शकाची आठवण येते. "अपनी कॉम्पिटिशन यहाँके डिरेक्टर्ससे हैंही नही..." असं म्हणणारा, पैसे वाचवण्यासाठी निर्मात्यानं बसच्या ऐवजी रिक्षा देऊ केल्यावर भन्नाट उखडणारा तो दिग्दर्शक खरा तर त्या कथानकात कुठेच महत्त्वाचा नव्हे. पण त्याचं ते मनस्वी आर्टिस्टपण दोन-चार फटकार्‌यातूनही नीट लक्षात राहून जातं. सिनेमातला सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांनी केलेला पसंतीचा जल्लोष म्हणजे आपल्या हक्काची दाद आहे, अशा थाटात स्वत:वरच खूश झालेली त्याची ती मुद्रा... ’मोहम्मद बिन तुघलक’ हेच एक नाव त्याला शोभेल! वाटेवरल्या धोक्यांची आणि त्यात पणाला लागलेल्या सर्स्वस्वाची लख्ख जाणीव, ते सारं पार करून येताना आलेला आत्मविश्वास आणि कलाकाराच्याच मुद्रेवर उमटू शकेल अशी लोभस धन्यता...


एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी तो दिग्दर्शक होऊन जाण्याइतके नशीबवान ठरतोही आपण. नाही असं नाही. पण असे क्षण दुर्मीळच... एरवी संवेद म्हणतो तशी " आणि शब्द सापडलेच नाही तर? अर्थांचे कोलाज परत मागाल मला सारे?" अशी अवस्था.


आत्ममग्न समाधानाचे क्षण विलक्षण दुर्लभ आणि तसेच क्षणभंगुरही. तेवढ्या औटघटकेच्या श्रीमंत सोनेरी स्पॉटलाईटमधून बाहेर पडल्यावर सगळेच सामान्य ब्लॅकाउट्स. सगळी आभासी जादू हिरावून घेणारे. "शी:, हे लिहिलं आपण?" असा स्वत:चाच अविश्वासयुक्त राग आणि प्रामाणिक शरम. "बास झाला आचरटपणा" असा घोर, प्रामाणिक निश्चय ही अशा वेळा साधून येणारी नियमित बाब.


तरीही बेशरमपणे परत एकदा पांढर्‌य़ावर काळे करण्याची वेळ येतेच. तेव्हा आपल्याच बेशरमपणाचा, लोचटपणाचा, नाईलाजाचा जो बेक्क्कार तिटकारा वाटतो, त्याची तुलना कशाशीच होणार नाही.


आतलं सगळं बेगुमानपणे बाहेर उधळून टाकण्याची तीव्र गरज आणि "पुरे झाला फजिता..." असा ठाम कठोर आवाज स्वत:चाच. दोन्ही एकाच वेळी.


यालाही ’रायटर्स ब्लॉक’ म्हणतात? कुणास ठाउक...