गणपती बाप्पा मोरया!

21:49:00

गणपती आणि इन जनरलच देव-धर्म-संस्कृती-सण-समारंभ-सोहळे यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यामुळे कुणाच्या भावना दुखावणार वगैरे असतील तर पुढे वाचू नका. हा मजकूर तुमच्यासाठी नाही.

मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पाहिलाय, की आपल्यालाही चार लोकांसारखं गणपती आल्यानंतर उत्साही वगैरे वाटावं. पण तसं होत नाही. आधीच पावसाची नवलाई संपून ’पुरे आता, टळा’ या प्रकारचा मूड झालेला असतो. रिपरिपणारा पाऊस, खड्डे, चिखल, रस्त्यावरून तुंबलेलं पाणी आणि त्यात तरंगणारा कचरा... आणि मग शिवाय गणपती.

गणपती, त्याचा लडिवाळ आकार, त्याचं बुद्धीची देवता वगैरे असणं आणि संस्कृती-बिंस्कृती सगळं ठीक आहे, पण आता मला नाही त्यात फारशी मजा वाटत, तर कुणाची काही हरकत आहे का? पण नाही. एकदा गणपती हा शब्द उच्चारला की तुमच्या भावना कश्या उचंबळून इत्यादी आल्याच पाहिजेत. नाहीतर तुम्ही उद्धट. बरं, तेवढ्यावर भागत नाही. आपण ज्यांना वर्षाकाठी फक्त एकदाच पाहतो अशा नातेवाईक कम परिचितांकडे जा, त्यांच्या थर्माकोलच्या भीषण सजावटी पहा, तळलेल्या पोह्यांचा (किंवा मक्याचा) भयानक गोड चिवडा आणि ते पिठूळ लागणारे, त्रिकोणी खोक्यातून येणारे (यात काय मस्णी गोम आहे कुणास ठाऊक), ’काजू मोदक’ नावाचा अपमान करणारे गोळे खा आणि कोरे कपडे चिखलापासून सांभाळायची कसरत करत दिवसाकाठी साधारण तेरा-साडेतेरा घरं घ्या. काय डोंबलाची गंमत?

हां, आता कुणाला बोंबलायची हौस फिटवून घ्यायची असेल, तरी मी समजू शकते. पण मला तीही हौस नाही. मॅडसारखं देवाच्या पुढ्यात उभं राहून ’येई हो विठ्ठले...’ किंवा ’गरुडावर बैसोऽऽऽऽऽऽऽऽनी’ ओरडण्यात नाही बुवा मज्जा वाटत. ते नाही तर नाही, ब्राह्मणी पद्धतीत शांतपणे अथर्वशीर्षाची आवर्तनंही करून पाहिलियेत मी. पण ह्यॅ:! पार मूर्खासारखं वाटतं. एकच एक स्तोत्र आपलं परत परत परत परत म्हणायचं. काय अर्थ?

मोदक या कम्पल्सरी लोकप्रिय पक्वान्नाचंही मला प्रेम नाही. एखादा बरा लागतो गरम असेल (उकड लुसलुशीत शिजली असेल, सारण खमंग असेल आणि तूप रवाळ-ताजं असेल) तर. पण तेवढ्यासाठी तो गणपती आणि आरत्या नावाचा तासंतास ताटकळवणारा प्रकार आणि बेक्कार ध्वनिप्रदूषण सोसायचं? एवढे काही छान नाही लागत मोदक.

भरीत भर म्हणून तो टिळकांनी माथी मारून ठेवलेला सार्वजनिक गणपती नावाचा प्रकार. कसली जागृती आणि आणि कसलं काय! ’ओ’ येईस्तोवर केलेल्या त्या फिरत्या लाइटिंगमधे सौंदर्य असतं, की त्या निर्बुद्ध हलत्या पुतळ्यांच्यात? की तिथे केलेल्या दारूबंदी इत्यादी देखाव्यात?

यात विरुद्ध बाजूनं बोलण्यासारखेही बरेच मुद्दे आहेत. सार्वजनिक उन्मादाला वाट काढून देण्याची गरज, सांस्कृतिक भूक भागवण्याची सोय, विचार न करता माथा झुकवण्यामधली सोईस्कर मानसिक शांती, ’साजरं’ करण्यासाठी निमित्त इत्यादी इत्यादी. थोडीफार फिरवाफिरवी केली तर ते गोकुळाष्टमी, नवरात्र, दिवाळी या सगळ्या सणांनाही लागू पडतात. पण अर्थपूर्णता संपून गेलेली प्रतीकं निव्वळ कर्मकाडातल्या गंमतीसाठी जपणं मला करायचं नसेल, किंवा मुळात मला त्यात फारशी गंमत येत नसेल, तर ती न करण्याचं, तिच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य मला असणार आहे की नाही हा मुद्दा आहे. की तिथेही भावना दुखावल्या अशी सोईस्कर बोंब आपण मारणार आहोत?

You Might Also Like

12 comments

 1. हाहाहा....वाक्यावाक्याला मी जोरजोरात हसलो...
  "मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पाहिलाय, की आपल्यालाही चार लोकांसारखं गणपती आल्यानंतर उत्साही वगैरे वाटावं."...हाहाहा!

  काजू मोदक वगैरे वर्णन अप्रतिम!

  "बोंबलायची हौस"...ही फिटवायला लय जागा आहेत...पण आरत्या विशेष आहेत...त्या गाताना नेमकं कोणाच्या नावानी बोंबलतोय ते ठाऊक असतं...एरवी अज्ञानातच सुख...म्हणून हे आरतीमधलं ओरडणं आवडत असावं...एक मत.

  "ब्राह्मणी पद्धतीत शांतपणे अथर्वशीर्षाची...."...म्हणतात त्यांनाही येतच असणार कंटाळा...उगाच नाही लोकांनी सहस्रावर्तन पन्नास लोकांना बोलवून वीस वेळा म्हणायचे सोयीस्कर मार्ग शोधलेत...त्यामुळे ही तुझी भावना सार्वत्रिक असणार..मला खात्री आहे.

  "एवढे काही छान नाही लागत मोदक."....शंभर टक्के असहमत...माझ्या हातचे एकदा खाऊन पहा...:D

  तुला पूर्ण हक्क आहे...भावनांचं काय...दुखावल्या तर दुखावल्या...माथेफिरू धर्मांध संघटनांच्या चाळ्यांना पाहून माझ्याही धर्मनिरपेक्ष भावना दुखावतात...पण आम्ही जणू मुर्दाड मनाचेच निपजलोय असं या माथेफिरूंना वाटत आलंय...आमच्याही भावना दुखावतात त्याचं कोणालाच काही नाही...त्यामुळे तुला काही फिकीर करायची जरूर नाही.

  आजकाल मला लय उत्साह येतो...मी घरी मोदक वगैरे करतो...दिवाळीला गोड वगैरे...नि सगळ्यांना बोलवून जेवण वगैरे...पण तेवढाच...बीफ असलेला बर्गर खाऊन सहस्रावर्तन करण्याएवढं, आधीच्या रात्री अतिप्राशनाने ओकून दुसर्‍या दिवशी तीर्थ पिण्याएवढं पुरोगामित्व अजून माझ्यात आलं नाहिये...:)

  ReplyDelete
 2. सही लिहिलंयस!
  मी युजुअली कुठल्याही सणावारांची - विधी आणि स्तोम या दोन गोष्टींत विभागणी करतो. विधी सिरीयसली करायचे (जर इंटरेस्ट असेल तर) आणि स्तोम जमतंय तेवढं एन्जॉय करायचं.
  मग दिवाळी वगैरे मध्ये फराळ वगैरे गोष्टी स्तोम असुनही एन्जॉय करता येतात आणि व्हॅलेन्टाईन डे ’विधीवत’ पार पडतो! :)

  सशक्त लेखाबद्दल अभिनंदन!

  ReplyDelete
 3. अग बाप्पा जाऊन सुध्दा णहिना झाला. जरा उशीरानंच जाग आलीय तुला । अन नाही आवडत तर न करावं आपण ।

  ReplyDelete
 4. अगदी नवे, वेगळे, विचार करण्यास प्रवृत्त करणारे पोस्ट केल्याबद्दल अभिनंदन.

  तुमच्या पोस्टमधील मतांशी सुसंगत अशी दुसरी बाजूही मला चांगली माहिती आहे. "दुसरी बाजू" म्हणजे विरुद्ध नव्हे. तुम्ही गणपती-दर्शन करणाऱ्या, करायला लागण्याचे सामाजिक संकेत पाळायला लागणाऱ्या व्यक्तिंच्या दृष्टिकोनातून लिहिलेत. पण गणपतीचे (एखाद्या जराजर्जर व्यक्तिचे "करावे" लागावे या अर्थानेसुद्धा) "करावे" लागणाऱा एक वर्ग आहे. आणि तो आहे घराघरातील स्त्रियांचा, गृहिणींचा. आताआताशा कदाचित् कर्मकांडांचा पगडा शहरी भागांतून कमी होत चालला असेलही ; पण एखाद्या दशकापूर्वीही "साग्रसंगीत" पूजाअर्चा, आरत्या-नैवेद्य , पाव्हणे-रावळे, आला-गेला, पुरोहित-भटजी या सर्वांचा अजेंडा सांभाळणारे घरगुती गणेशोत्सव मी जवळून पाहिले आहेत. सणासुदीच्या नावाने त्या घरातल्या बायकांना अंगावर काटा येत असेल! त्यांचा तळतळाटाची जातकुळी तुमच्या-आमच्या ब्लॉगस् वरच्या तक्रारीपेक्षा जास्त करुण होती/आहे. ज्यांनी असले भोग भोगले आणि भोगणाऱ्यांचे दुःख ज्यांना जाणवले त्यांना ना त्याच्या "धार्मिक" बाजूचे काही मोल असेल; ना त्यांना उत्सवाचा म्हणून काही आनंद मिळत असेल.

  आणि एवढे सांगूनही तुमच्या टिपणाच्या पार विरुद्ध मताचा मी स्वतःला समजतो. कदाचित "दुरुन डोंगर साजरे" या म्हणीचा हा पडताळा असेल. पण मला नेहमीच असे वाटत आहे की, या सणासुदींमधील "शोषणा"चा भाग , प्रदूषणाचा भाग वगळला तर जे राहते त्यामधे आम्हासारख्या बहुजनांना हवेहवेसे वाटणारे बरेच काही आहे. प्रियजनांच्या (ज्यांचा उल्लेख तुम्ही "आपण ज्यांना वर्षाकाठी फक्त एकदाच पाहतो असे नातेवाईक कम परिचित" असा , तिरकसपणे करता ) भेटीगाठी , आरत्या-मोदक यांच्याबद्दलची तुमची नावड वाचून करमणूक झाली. मला खरेच असे वाटते की, या सर्व गोष्टींचे बंधन असलेच आणि मानलेच तर स्नेहाचेच असते की ! स्वतःला त्यातून वजा करणे सोपे आहे आणि अशी सोपी गोष्ट केल्यानंतर मग तक्रार कसली आणि असल्या तक्रारवजा ब्लॉगचे प्रयोजन ते काय?

  मतभिन्नतेबद्दल तुम्ही नाराज होणार नाही असे समजतो.

  ReplyDelete
 5. मी नुकतीच इथे नवरात्र आणि बिजोया अशी दोन ’सेलेब्रेशन्स’ पार पाडून आले. एका वेगळ्याच निगेटीव अर्थानी ’इंटरेस्टींग’ असे हे दोन्ही अनुभव होते. खरंतर ह्यावर मी एक सविस्तर पोस्ट टाकायचाही विचार करत असताना तुझं हे पोस्ट वाचलं.
  इकडे आल्यावर धार्मिक/सांस्कृतिक अशा प्रकारांशी इतक्या जवळून आलेला हा माझा पहिलाच संबंध. गेल्या पाच वर्षांच्या काळात ह्या उत्सवांच झालेलं फ़िल्मी माकड मी आत्ता पाहून आले आणि खरंच घृणा हा एकच शब्द मनात आला. नवरात्र तर कायमच लाऊड होती पण हे बंगाली दुर्गापूजा प्रकरण असं थेट भन्सालीच्या सेटवरुन उचलून आणल्यासारखं झगमगीत आणि अंगावर येणारं असेल हे माहीतच नव्हतं. देव-देवतांच्या सोज्वळ स्वरुपाचा खेळखंडोबा करुन टाकतात हे लोकं. अरे मिरवायच, नाचायचं तर स्वत:च्या लग्नांत घाला ना खुशाल काय तो धिंगाणा. पण हे काय?

  हे वर्षं सोडलं तर मात्र प्रत्येक वेळी इथे एका घरगुती गणपतीला आवर्जुन गेले आणि तिथलं शांत स्वरुपातलं पुजा आरती हे मनापासून आवडलं होतं.

  >>> तर ती न करण्याचं, तिच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य मला असणार आहे की नाही हा मुद्दा आहे.

  मुंबईला असतानाही कधी सणांच्या तु म्हणतेस तशा प्रकारांशी माझा जवळून संबंध आला नाही म्हणजे नातेवाईकांकडे जबरदस्ती जाणं, आरत्यांच्या गोंधळात सामिल होणं ..कारण माझी आई ह्या कोणत्याच प्रकारांना न मानणारी आणि नातेवाईक किंवा इतरांच्या ह्याबाबतीतल्या कोणत्याच दबावाला न जुमानणारी. गेल्या पिढीत जर तिने हे मला ही शोबाजी आवडत नाही तेव्हा माझ्या घरात मी करणार नाही असं सांगण्याचं आणि त्याप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य मिळवलं तर तु हे सहज मिळवू शकतेस. मिळवायला हवंच. आणि तुम्ही ठाम राहीलात तर मला नाही वाटत कोणी तुमच्याकडून अशा काही अपेक्षा करत रहातं.

  सार्वजनिक उत्सवांवर तर कायद्याने बंदी आणली पाहीजे. मग तो इद रमादान असो की गणपती नवरात्री. कित्येक सामाजिक/पर्यावरणीय समस्या कायमच्या सुटतील. भारतात लोकांमधे अशावेळी सामुदायीक उन्माद का संचारतो माहीत नाही. (actually ह्या मास हिस्टेरिया बद्दलच बोलायचं तर मला रिसेंटली तो एअरपोर्ट टु मरिनड्राईव उघड्या बसमधून धोणी आणि कंपनीची जी मिरवणूक काढली त्यावेळचा लोकांच्या दिवसभरात सगळे उद्योग सोडून त्यांच्या मागे धावत सुटण्याचा प्रकारही धर्मिक मिरवणुकांमधल्या उन्मादासारखाच बिनडोक आणि निषेधात्मक वाटला).
  असो. जितकं बोलावं तितकं कमीच.

  ReplyDelete
 6. @ए सेन मॅन
  तुझ्या हातचे मोदक खाल्लेच पाहिजेत मग! :)

  @अभिजीत बाठे
  मनापासून धन्यवाद! :))))))))

  @आशा जोगळेकर
  या पोस्टचं टायमिंग कायच्या काईच गंडलंय हे खरंच! पण नवरात्रातल्या उबवलेल्या, तथाकथित संस्कृतीची तथाकथित जपणूक करणार्‌या भोंडला आणि गरबा यांचं निमित्त झालं आणि तिडीक जाऊन मी लिहिलंच.

  @मुक्त सुनीत
  ’करावे’ लागणार्‌या बायकांच्या उल्लेखानं एकदम जी. एं. च्या पत्रामधला जुन्या पिढीच्या बायकांचा उल्लेख आठवला. ’दुष्ट’न म्हणता ’द्रुष्ट’ म्हणणार्‌या, वर्षाकाठी दोन लुगडी घेणार्‌या आणि त्या मोठमोठ्या वाड्यांच्या जणू आधारस्तंभच असणार्‌या... असे काहीसे वर्णन त्यांनी केले आहे..

  स्वत:ला या सगळ्यातून वजा करणे तसे सोपे असते, हे खरेच आहे. पण मलाच एकेकदा आश्चर्य वाटत असते की चार जणांना इतकी मजा येते या सार्‌यात आणि मलाच का वैताग येतो? नक्की काहीतरी असले पाहिजे जे मला दिसलेले नाही.
  या आश्चर्यापोटीच यातून स्वत:ला सरळ वजा न करता त्यातला आनंद समजून घेण्याचा प्रयत्न. आणि तो समजत नाहीच, हे उमगल्यावर ’नाही येत गंमत’ अशी कबुली. त्याबद्दल तशी जबरदस्ती कुणी कधी करू शकणार नसतेच आपल्यावर. पण या सगळ्या बटबटीत सोहळ्यांची एक मूक जबरदस्ती होत असतेच. चार-चौघांत वावरताना ते नाही टाळता येत. त्याबद्दलची नापसंती बोलून दाखवतानाही ’आपण कुणाच्या भावना दुखावत नाही ना, आपण तथाकथित उद्धट-कंठाळी-दिखाऊ पुरोगामीपणे तर वागत नाही ना’ अशी सावधगिरी बाळगावी लागते सतत. त्या स्वातंत्र्याबद्दल म्हणत होते मी.

  "मतभिन्नतेबद्दल तुम्ही नाराज होणार नाही असे समजतो."
  अर्थातच! :))

  @ट्युलिप
  मुक्त सुनीत यांना म्हटलं तसं, तसं वैयक्तिक स्वातंत्र्य तर आपण सगळे मिळवू शकतो, मिळवतोच. मला म्हणायचं आहे ते वेगळंच.
  या सगळ्या सणांच्या आधी काही दिवसांपासून टी. व्ही. आणि पेपरांतून त्याचे अक्षरश: ढोल वाजत असतात. म.टा.त सांगितल्याप्रमाणे ’आजचा रंग निळा’ म्हणून डोकी फिरल्यासारख्या शहाण्या-सुरत्या बायका एकदम निळ्या साड्या नेसतात. सगळ्या टी.व्ही. सिरियल्समधे कथानकाशी संबंध असो-नसो, एकदम तो तो सण साजरा करण्याची आणि ’भारतीय संस्कृती’चे गोडवे गाण्याची अहमहमिका लागते.
  तू म्हणालीस तसं सगळंच एकदम ’भन्साळी’ पद्धतीत अंगावर आदळत असतं. किती नाकारायचं म्हटलं तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांशी अमुक इतके तर बांधले गेलेलो असतोच ना आपण? ’विरासत’मधल्या अनिल कपूरची अगतिकता आठवून पटते एकेकदा.
  त्यापासून स्वातंत्र्य कसं मिळणार?! समृद्ध संस्कृतीच्या वारश्यासारखाच हा सगळं काही हिस्टेरिकली साजरं करण्याचा वारसाही आपलाच! :(
  बाकी क्रिकेटबद्दल मात्र स्वतंत्र पोस्टच!

  ReplyDelete
 7. नेहेमीपेक्षा वेगळे पोस्ट आहे. यातले बरेच मुद्दे पटतात.
  लहानपणी अर्थातच या सर्व प्रकारांबद्दल तीव्र आकर्षण असायचे. मोठेपणी कमी झाले, तरीही संपले नव्हते. नंतर सलग चार वर्षे भारताबाहेर. (आणि कर्मधर्मसंयोगाने अशा ठिकाणी जिथे भारतीय फार कमी होते) पहिल्यांदा तारखा लक्षात ठेवून सणासुदीला घरी फोन करणे वगैरे चालायचे. नंतर तेही बंद झाले. आत्ता तर अशी परिस्थिती आहे की मला दिवाळी सुरू आहे का संपली याचाही पत्ता नसतो. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला हे मिस झाल्यासारखेही वाटत नाही. नंतर मानसशास्त्र, तत्वज्ञान यांच्याशी ओळख झाली आणि देवाबद्दलच्या संकल्पनाही बदलत गेल्या.
  मंत्रोच्चारांबद्दल बोलायचे तर मला गंभीर आवाजात म्हटलेले मंत्रोच्चार ऐकायला खूप आवडतात. अशा वेळी प्राचीन काळी सृष्टीचा शोध घेताना वेद लिहीणारे आपले ऋषी आठवतात. म्हणूनच मला भारत एक खोज मालिकेच्या सुरूवातीचे आणि शेवटचे निवेदन फार आवडते.

  ReplyDelete
 8. Needless to say...I agree! I have started disliking all celebrations on the road..simply due to fact that all is controlled by some gundas using public money and very much brings out the animal within

  ReplyDelete
 9. I liked this post and most of previous ones.

  Unlike you, I like most of the experiences that I may like to associate with this named set called "Ganeshotsav".
  However experiences and likes/dislikes are not objective realities on the basis of which you can convince others or get your feelings hurt. (applies to all non objective realities like music, poetry, art, itchy sensations, God, ...)

  btw. how do you and all others write in Devnagri script ?

  ReplyDelete
 10. तू छान भावना व्यक्त केल्या आहेस.

  लास्ट वीक मध्ये नवरात्रीच्या मीरवणुकींमुळे अशक्या हाल ज़आले. हे सार्वजनिक उत्सव हे पोलिटिकल stunts zale आहे. एक पार्टी गणपती करते म्हणौन दुसरी पार्टी स्वतचे अस्तित्व दाखवण्यासाठी
  नवरात्रा करते. त्यात काळसा म्हणजे किती दिवस हे लोक रस्ते अडवतात.

  या मध्ये देवाची भक्ति सोडून सगळ्या गोष्टी येतात. सगळ्याच उस्टवाची पूर्वीची मजा आता फारशी येत नाही.

  http://mianimazatv.blogspot.com/

  ReplyDelete
 11. पूर्णपणे सहमत. मला देखिल अगदी अस्संच वाटत राहतं पूर्ण उत्सव भर! आणि वर कुणीतरी म्हटलंय तसं....सणासुदीच्या नावाने अंगावर काटा येणार्‍या अनेक गृहिणी आजही आहेत....नाईलाजास्तव करीत राहणार्‍या...वाद नकोत म्हणून!
  भावभक्ती पेक्षा, कर्म कांडं, बडेजाव यालाच फार महत्व दिलं जातं! नवरात्री तल्या आरत्यांमध्ये तर काडीचाही भाव नसतो..असतं ते फक्त फक्त कंठ्शोष करून केलेलं भक्तीचं बटबटीत प्रदर्शन.

  एक 'मनातला' विषय माडल्याबद्दल अभिनंदन!

  ReplyDelete
 12. मस्त!

  आता तर भोंडला आणि कोजागिरी सारखे 'सण'ही लाऊडस्पीकरांच्या ठणठणाटाशिवाय साजरे करता येऊ शकत नाहीत.

  ReplyDelete