Saturday, 13 October 2007

तीच तर गंमत...

पुन्हा एकदा मी का लिहितेय त्याचं समर्थन करणार होते॥ पण नको। डझण्ट मेक एनी सेन्स. :)

आत्ता आपण खरोखरच एकमेकांच्या समोर नसतो तर फार बरं झालं असतं। माझा जीव खरोखरच इतका अडकला आहे का तुझ्यात, की हे नुसतेच आकर्षणांचे मोह... हट्टीपणाने घर-दार व्यापून बसलेले... ते पडताळून पाहता आलं असतं. समोर माणूस नसताना, तो तसाच्या तसा जागता राहिला मनात... कुठलंच प्रतीक वा मृत आठवण बनून न राहता... जिवंत संवाद घडला त्याच्याशी तो समोर नसूनही... तर म्हणावं... की होय, माझा जीव गुंतला आहे तुझ्यात.

पण आत्ता?

आत्ता तू रोज दिसतोस. एकमेकांच्या अवस्थांचे अंदाज न लावण्यातच सगळी असेल नसेल तेवढी शक्ती खर्च होऊन जाते. रात्रीला आपण पार कंगाल. विखुरलेल्या स्वत:ला कसंबसं गोळा करून निवार्‌याला जाऊन पडणे एवढं एकच माफक ध्येय जपू शकणारे. कसली स्वप्नं आणि कसली ध्येयं...

म्हणून जमेल तितक्या लवकर तुझ्या डोळ्यांसमोरून उठून जायचंय. तू खरंच मजेत आहेस का..... हा विकृत प्रश्न नको आणि जीवघेणे अंदाज नकोत. स्वत:ची रोज उठून परीक्षा पाहणं नको आणि तुझी घेऊन तुला नापास होताना पाहणं नको. माझी गोची किती अवर्णनीय सुरेख... तू पास झालास तरी मलाच दुखणार आणि नापास झालास तरी स्वत:वर संतापून मीच कळवळणार! आहे की नाही मजा?

काय अर्थ?

कुणास ठाऊक...
आत्ता उद्धृत करायला सौमित्रची एक भीषण सुंदर कविता आठवतेय... पण नको.... कविता नकोत.

असेच वार्‌यावरचे निरुत्तर करणारे अनेक प्रश्न...

आणि आपण नुसते पाहत बसलेले... अगतिकपणे.

तो विचारतो मग स्वत:लाच... ’काय अर्थ?’

तर अर्थ काहीसुद्धा नाही...

जगातल्या सगळ्या कविता साल्या कुठेतरी खोल पुरून टाकल्या पाहिजेत.
कदाचित मी नीट नॉर्मल वागीन.
कुणास ठाऊक. कदाचित नाहीnaahiihii..
मग कदाचित मी स्वत:च लिहीन एखादी कविता नाईलाजानं. काय अर्थ?तर अर्थ काहीसुद्धा नाही!मरो.......
सालं स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे. म्हणजे जगदीशचंद्र बोसांना कशी झाडं सापडली, किंवा व्हॅन गॉगला रंग-रेषा किंवा सौमित्रला शब्द.... स्वत:मधली असेल नसेल तेवढी सगळी मस्ती, सगळी ऊर्जा... आत उसळणारं हे सगळं सगळं... तिथे उधळून टाकायचं...
कधी सापडेल? शोधत राहायला पाहिजे. स्वत:पासून सुटण्याचा तेवढाच एक मार्ग. शोधला पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी शोधला पाहिजे..... मरायच्या क्षणापर्यंत शोधत राहायला पाहिजे.....त्यात हे असे दुखण्या-खुपण्याचे रस्ते अनिवार्यच. त्याची भीती नाही. दुखण्याच्या भीतीनं पाय मागे घेतला असता, तर इथवर आलेच नसते...मला दु:ख हवं, सुख हवं, अपेक्षा हव्यात, अपेक्षापूर्तीच्या अपेक्षा हव्यात आणि अपरिहार्य असतील तर अपेक्षाभंगही... सगळं सगळं हवं. दोन्ही हातांनी भरभरून हवं.. कितीही रक्ताळला जीव तरीही..
’जगातलं एकपण सुख नाही सोडणार...’ असं म्हणाला होतास तू, अगदी फिल्मी उत्कटपणे, दूर क्षितिजापार वगैरे नजर रोखून... आठवतंय? किती शर्थीनं निभावलंस ते! आणि मीही. फक्त आपल्या संदर्भबिंदूंची पाऽऽर उलटापालट झालेली. तीच तर गंमत...

10 comments:

 1. "आत्ता तू रोज दिसतोस. एकमेकांच्या अवस्थांचे अंदाज न लावण्यातच सगळी असेल नसेल तेवढी शक्ती खर्च होऊन जाते. रात्रीला आपण पार कंगाल."
  chhan!

  "सालं स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे."
  nakkich...tu mhantes tasa shodhat rahaylach hava...

  ekdam sahi....

  btw aadhiche post aaNi he post...shaileene kat Taklya...nice :)

  ReplyDelete
 2. मेघना,

  मराठी ब्लॉग चाळताना "तीच तर गंमत...' समोर आले. सहज क्‍लिक केले आणि वाचतच गेलो. त्यानंतर पुढच्याही पोस्ट वाचत राहिलो. तू छान लिहितेच. कदाचित आतून आल्यामुळे ते जास्त भिडत असेल. "हे सारे घडताना मी ही तिथे कुठेतरी आहे,' अशी भावना निर्माण होते, तुझे लिखाण वाचताना. खरोखर उत्तम!

  ReplyDelete
 3. सर्वांच्या कॉमेण्ट्सशी सहमत! सध्या मनापासून लिहीत असल्याने आणखी ताकदीने उतरत असावं! अभिजित म्हणतो तसं "तिथेच असल्यासारखं" वाटतं खरं; पण त्याही पुढे जाउन म्हणेन की तिथे असू नये असंही प्रकर्षाने वाटतं. तिचं त्याच्यावर इतकं प्रेम असताना आणि त्याला त्याबद्दल थांगपत्ताही नसताना (बरोबर अर्थ लावलाये ना मी?), तिथे असणं म्हणजे लय घुसमटून टाकणारं होतं!

  ReplyDelete
 4. Aadhi vatla ki ek ek avadaleli line ithe devun sangava ki ti avadali mhanun. Pan mag ek ek karat sagalyach avadalya aani comments suddha.....tinhini, patalya ek dam. Chaan... lihit raha. "स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे.....स्वत:मधली असेल नसेल तेवढी सगळी मस्ती, सगळी ऊर्जा... आत उसळणारं हे सगळं सगळं... तिथे उधळून टाकायचं..."

  "फक्त आपल्या संदर्भबिंदूंची पाऽऽर उलटापालट झालेली. तीच तर गंमत..." :-)
  -Vidya

  ReplyDelete
 5. Stumbled over to your blog from Ranjeet's blog (chendufali) and kept on reading.

  '.. Fakta aplya sandarbha-bindunchi paar ulta-palat jhaleli' - Perfect finish. Irony is the name of the game. As long as you realise the irony of the situation you're trapped in and can have a laugh at yourself, it's gonna get better from thereon.

  ReplyDelete
 6. Surekh! kaLjala bhidel asa lihites!

  ReplyDelete
 7. हं..आता दोन्ही ब्लॉगवर एकच कॉमेन्ट टाकतोय कारण मला त्यात विलक्षण ओघ दिसतोय. बाकीच्यांनी आधीच लिहीलय, त्यामुळे परत तेच इन्टेन्स वगैरे नाही लिहीणार पण एक सांगु का? उद्या जर कुणी गुलजार आणि तब्बुला घेऊन मराठी सिनेमा काढला, अस्तित्व सारखा, तर मी तुझे हे शेवटचे दोन्ही लेख तब्बु साठी अप्रतिम स्वगत म्हणून देऊ शकतो..
  याहून वेगळं काय लिहू? I can visualize this blog delivered by Tabbu on screen...

  ReplyDelete
 8. Hi ani ya adhichi post vachun mala asa agadi atun atun "Tila" potashi dharawas vatala.kiti kholvaracha ghav kiti agatikata.akekada asa hota ki ata radunahi fayada nahie he nitch kalata ani Pani pan yet nahu dolyat.koradach kanhana.

  ReplyDelete