बाकी सारे तसे आलबेलच...

01:02:00

तसा दुष्काळ नाही

आणि वादळ-बिदळही.
सूर्य उगवतो, चंद्र मावळतो,
दुपारींमागून संध्याकाळी,
संध्याकाळींमागून रात्री,
एका लयीत उलगडत जातात.
पाऊस-बिऊसही पडतो सालाबादप्रमाणे नियमित.
सारे तसे आलबेलच.


काही झाडे मात्र अबोलपणे सुकत जातात.
पानांचा जगण्यातला रस संपून
त्यांनी झाडाची बोटे अलगद सोडून द्यावीत,
ऊन-पाऊस सोसत मुकाट उभे राहण्याखेरीज
खोडालाही काही सुचूच नये,
फुला-फळांनीही आतल्या आत घट्ट मिटून घ्यावे स्वत:ला
एखाद्या गरिबाघरच्या अपंग वेडसर मुलासारखे
निमूट समंजसपणे,
तसेच.
तसेच घडत जाते सगळे
काही झाडांच्या बाबतीत.


तसा दुष्काळ नाही आणि वादळ-बिदळही..
सूर्य-चंद्र, दिवस-रात्र, उन्हाळे-पावसाळे...
पाऊसही पडतो नितिमत्तेचे सारे संकेत पाळत सालाबादप्रमाणे नियमित.


काही झाडे मात्र या सगळ्यातून निर्विकारपणे उठून गेलेली.
बाकी सारे तसे आलबेलच.

***


उद्मेखून तुला टाळत कामा-बिमाचे कृत्रिमपणे उभे करत नेलेले ढीग। तुझ्यातून आरपार पाहत लोकांशी मारलेल्या गप्पा. महत्प्रयासानं का होईना, पण चेहरा पुरता कोरा करून निभावलेल्या काही सोशल वेळा. कडेकोट बंद करून घेणं निर्दयपणे.


तेव्हा तुला प्रथम इतकं निर्लज्जपणे हताश झालेलं, त्यातून मला खवचटपणे टोमणे मारताना पाहिलं। तेव्हा चुकचुकली होती पहिली शंकेची पाल. वाटलं, मित्रा, तू नसणार आहेस. लेट मे गेट यूज्ड टु इट... का दोन दगडांवर पाय ठेवायला पाहतो आहेस?


पण इतकं सोपं थोडंच असतं? अजून बर्‌याच वाटा काटायच्या शिल्लक...


***


मीटिंग्ज्‌, रिपोर्ट्‌स, टारगेट्स आणि अचीव्हमेंट्स। आयुष्य कसं यथासांग यशस्वीपणे आणि बिनबोभाट चाललंय असं स्वत:लाच समजावत राहण्याचे रस्ते आपल्याला मिळाल्यासारखे. शक्यतोवर एकमेकांना टाळणं, गोष्टी ऐकून न ऐकल्यासारख्या करणं, समोरसमोर यायची वेळ आलीच तर दात काढून ती साजरी करणं या सगळ्या आयुधांचा वापर करण्यात आपण एकदम तरबेजच झाल्यासारखे.


अशात कधीतरी एकदा भंकस करत असताना कुणीतरी तुझ्या मनगटावरच्या ओरखड्यावरून तुझी यथेच्छ चेष्टा करायला घेतली। ’मी इथे असणं बरोबर नाही’ असं म्हणून धडाम्‌दिशी तिथून उठून जाण्याचं स्वातंत्र्य घेतल्यास गैरसमज होण्याची शक्यता असल्यामुळे मी चुपचाप पुतळा होऊन जागच्या जागीच गप. ’लाज तर वाटतेय, पण एरवी माझ्या अनुपस्थितीत हसत बेदरकारपणे उडवून लावली असती अशी गोष्ट आता नको इतकी अवघड होऊन बसलीय...’ अशातली तुझी गत. खोटं कशाला बोलू, उठून जाता येत नाही म्हटल्यावर, आय स्टार्टेड एन्जॉइंग इट. शेवटी तुझा गोरामोरा चेहरा न पाहवून, मीपण मस्करीत भाग घेतल्यासारखं केलं आणि हसत हसत उठून चालती झाले.


तेव्हा तुला हायसं वाटल्याची नोंद घेतली होती, पण मी हसत उठून गेल्यावर तुझा झालेला, कळे-न कळेसा अपेक्षाभंग? असूयेचा धागाही नाही उरलेला... अशी हताशा? प्रामाणिक खरं-खुरं दु:ख? कुणास ठाऊक। तेव्हा हे सगळं नोंदायचं राहूनच गेलं....


***


असाच कधीतरी धीर करून माझ्या डेस्काशी गप्पा मारायला आला होतास तू. मीपण निर्ढावून निवांत गप्पा मारल्या काफ्फा आणि मिलेनाच्या पत्रांवर. मराठी नाटकांवर. शाहरुखच्या इण्टेन्सिटीवर. इंग्रजी वृत्तपत्रांवर.


बोलता बोलता सहज बोलल्यासारखं करत म्हणालास - आमच्या घरी इंग्रजी पेपर फक्त मीच वाचतो. नाटकं-बिटकं काय आम्हांला आवडत नाहीत। आणि पुस्तक वगैरे तर माफीच....


तेव्हा कुणीतरी कानफटीत मारावी तसा माझा चेहरा झाल्याचा माझा मलाच नीट आठवतो। म्हणजे एखादी गोष्ट मोडून बाहेर पडण्याचे गट्स नाहीत आपल्यात, तर त्याचा दोष बरोबरच्या माणसाच्या सो-कॉल्ड सामान्यपणाला देणार तू? आणि अशा तुला मी इतकं माझं म्हणावं? आत्ताच्या आत्ता इथून उठून चालतं व्हावं, वणवणावं उन्हातान्हातून, किंवा निवांतपणे झोपावं घरी जाऊन... कुठेही असावं, पण इथे असू नये असा लालभडक संताप आल्याचा आठवतो स्वत:चाच.


मग अशा अनेक वेळा येत गेल्या आणि मी बोलणंही टाळायला लागले नकळत...


***


तरीही तुझ्या वाढदिवसाला तुला चार जणांसारखं ’हॅपी बर्थडे’ म्हणणं नाहीच जमलं मला। ’काय देऊ’ असं विचारलंच मी. पुरेसे आढेवेढे घेऊन माझ्यावरच उपकार करत असल्यासारखा ’पुस्तक दे, पण नाव नको घालू, म्हणजे मी निवांतपणे वाचीन...’ असं म्हणालास, तेव्हा वाटलं, आता कसं, अगदी शेवटची वीट रचून कुणीतरी पुरं चिणून टाकावं तसं सगळं नीट पुरं झालं!


***


नीती-अनीतीच्या सर्वमान्य संकेतांमधले आणि असल्या कुंपणावरच्या बेईमानीमधले वाद तर पहिल्या दिवसापासून घालत आलो आपण.


आता प्रात्यक्षिकांतून तावून-सुलाखून बाहेर पडण्याचे दिवस।


हे सगळं इतकं अवघड असणारेय हेही ठाऊक होतंच. पण तरीही वाटा काटून संपवण्याचे दिवस.


तुझा आणि तुझ्यापेक्षाही स्वत:चा इतका कडकडून राग राग करतानाही एक मात्र येतं मनाशी अजूनही। वाटतं, या सगळ्या भ्याड तडजोडींच्या पलीकडे एक दिवस असा येईल, जेव्हा तुला स्वत:ला जाब द्यावा लागेल... तेव्हा काय होईल तुझं? तेव्हाच्या तुझ्या भीषण एकटेपणाच्या जाणिवेनं पोटात अक्षरश: खड्डा पडतो...


सालं हे तुझ्या काळजीनं पोटात खड्डा पडणं थांबेल ना, तर बर्‌याच गोष्टी सोप्या होतील...


अर्थात बर्‌याच गोष्टी बिनबोभाट मरूनही जातील...


चालायचंच. इतक्या सगळ्या पसार्‌यात काही झाडं जगली काय अन्‌ मेली काय...


बाकी सगळं आलबेल असल्याशी कारण... ते तसं आहेक

You Might Also Like

11 comments

 1. खतरनाक लिहीलंयेस. असल्या इण्टेन्सिटीने लिहीणं तुझ्या मनावरचा भार हलका करुन गेलं असणार नक्कीच. जीवनातला रस संपलेल्या पानांनी झाडाचं बोट हलकेच सोडून देण्याची उपमा अगदी स्पर्शकातर झालीयं..

  पण तिला त्याच्या एकटेपणी काय होईल या काळजीने पोटात खड्डा पडण्यात काही अर्थ नाही. कारण त्याच्यासारखी माणसं पीटर कीटिंग सारखी जमेल तिथे लोंबकळून स्वत:चं खोटं समाधान करून घेत ओंगळ आनंद शोधून जगत रहातात.

  तेव्हा त्याच्या पायी झाड वठून जाण्यापूर्वी तिने तिचा जीव ओवाळण्या ’लायक’ असलेला हॉवर्ड शोधणं उत्तम!

  ReplyDelete
 2. chaan...avaadala swagat....thodasa patalasuddha...

  ReplyDelete
 3. जी ए कुलकर्णी यांनी आपल्या एका पत्रात एक गोष्ट सांगितली आहे : एका शेतकऱ्याकडे अनेक वर्षे एक बैल असतो. बैल म्हातारा झाल्यावर त्याला विकायला दर आठवड्याला शेतकरी बैलाला घेऊन बाजारात जातो. मनाजोगता सौदा न झाल्यामुळे परत आणून गोठ्यात बांधत रहातो. त्या दोघांचा तो परतीचा प्रवास.... मुक्या प्राण्यांना जी जाणीव असते त्यानुसार बैलालासुद्धा आपल्याला विकायला काढण्याची - आपण नको असल्याची - जाणीव होणे.... आणि तरीसुद्धा, एकमेकांच्या संगतीत काढलेला एक आठवडा... जेव्हा एकमेकांबद्दलचे सगळे नातेसंबंध जळून गेलेले असतात आणि केवळ परिस्थितीवशात् एकमेकांबरोबर रहावे लागणे...

  तुझे पोस्ट वाचले आणि हे सगळे आठवून गेले. आपण बेटावरच्यांनी एकमेकांना हात हलवून धीर दिल्यासारखे करायचे झाले.

  ReplyDelete
 4. "एखादी गोष्ट मोडून बाहेर पडण्याचे गट्स नाहीत आपल्यात, तर त्याचा दोष बरोबरच्या माणसाच्या सो-कॉल्ड सामान्यपणाला देणार तू?" सर्वात जास्त आवडलेलं वाक्य, एकदम खरं.
  आणि सर्वच प्रसंग अगदी डोळ्यासमोर अभे राहण्याइतपत पर्फेक्ट शद्बात मांडलेले. कविताही छान(तुझी लिहिलेली?).
  बाकी........सारे तसे आलबेलच. :-))
  -विद्या.

  ReplyDelete
 5. mast jamla ahe. I really liked it!

  ReplyDelete
 6. "kharay" hee ugach khochak pratikriya hoti..."बाकी सारे तसे आलबेलच... " he jara "hehi kharech aahe.." dhangacha vaTla aadhi...ni tyavarachya pratikriya :P..

  tevdha soDala...tar baki lekh utkrushta...nehmipramaNech natyanmadhala avaghaDalepaNa achook TipaNara...mast!

  ReplyDelete
 7. अभि, कोहम्‌, धनंजय, आनंद,

  प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार. :)

  ए सेन मॅन,

  "हेही खरेच आहे..." ढंगाची म्हणजे? त्याचा तुझ्या कवितेचा संदर्भ कळला, पण तरी त्यातून तुला नेमकं काय म्हणायचंय ते नाही कळलं.
  बाकी मी काय म्हणायचं होतं ते म्हटलंय, आता त्यातून कुणाला काय अर्थ दिसतात ते तसं सापेक्षच. आणि आता ’त्यातून मला खरं तर असं म्हणायचं होतं..’ वगैरे काय स्पष्टीकरणं देणार! कुणीसं म्हटलंय तसं ’कट दी क्रॅप ऍण्ड शो मी दी ब्लडी हॉर्स..’ तशातला प्रकार व्हायचा, नाही का?!

  विद्या,
  येस, आय प्लीड गिल्टी. माझीच आहे कविता! :)
  मनापासून आभार तुझ्या प्रतिक्रियेबद्दल.

  ReplyDelete
 8. "हेही खरेच आहे..." ढंगाची म्हणजे? त्याचा तुझ्या कवितेचा संदर्भ कळला, पण तरी त्यातून तुला नेमकं काय म्हणायचंय ते नाही कळलं.

  "हेही खरेच आहे..." cha mood nahi aawaDala asa sur lavla hotas ni mag he vachla.."baki sara tasa aalbelach"...aaNi....aayla maza mood nahi aavaDala mhaNat hine paN taslach sur lavlay ki asa zala aadhi...mhaNun ugach khochakpaNe kharay asa lihila....paN tee agadeech Tukar ni varvarchi comment hoti mhaNun parat lihili...parat vachun...so tula kahi spashTikaraNa dyayla nakoyat...:)

  ReplyDelete
 9. अपघाताने आलो आणि आता इथे बराच वेळ आहे.

  ReplyDelete