बरेच काही उगवून आलेले...

14:51:00

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूंच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...


***

अगदी सुरुवातीच्या काळातली कधीतरीची ही गोष्ट. ’नऊ तासांपलीकडे मी तुमचं काहीही देणं लागत नाही’ अशा बाणेदार आणि शुगर कोटेड्‌ तुसडेपणातून जमतील तेवढ्याच गप्पा मारणं सोडून मी जरा जरा माणसांत यायला लागले होते तेव्हाची. घरी परत जाताना गाडीत कुठल्याश्या देव-आनंद-कालीन गाण्यावर खूश होऊन मी मारे आवाज वगैरे वाढवला. त्यावर स्पष्ट नाराजी नोंदवणारं तुझं ’च्‌च्‌’ ऐकून, मागे वळून भिवया उंचावल्या असाव्यात मी. तेव्हा म्हणाला होतास, "हे बरंय... नाही आवडत एखादी गोष्ट असं म्हणायचीपण चोरी! थेट माझ्या अभिरुचीवरच उठणार म्हण की..."

तुझी मळल्या वाटेबद्दलची बेफिकिरी तेव्हाच नोंदली मी.

मग कधीतरी संदीपच्या 'पाडू' कवितांबद्दल त्याला शिव्या घालत होते मी, तेव्हा बोलता बोलता सहज बोलल्यासारखा, "'पाडू' तर 'पाडू', पण आपल्यात आहे का कवितांचा जाहीर कार्यक्रम करण्याची हिंमत? आपण फक्त पगाराचे आकडे फुगवण्यात काय ती खर्डेघाशी दाखवणार. कविता करायला आणि त्यावर जगायला जिगर लागते...बसून शिव्या देणं सोपं असतं," असा शांतपणे टाकलेला बॉम्ब.

मी भिवया उंचावायलाही विसरून गेले असणार...

***

हे नेमकं कधीचं ते मला आठवत नाही. ’बोलायला नको होतं ते बोलून तर बसलो आहोत, आता या टोपीतून कोणकोणते ससे बाहेर येतात ते पाहायचं’ असा हताश मूड सोडून आपण जरा गप्पा-टप्पा करायला परत सुरुवात केली होती त्या काळात असावं. मी ते सगळं ’सिगारेट’ प्रकरण तुझ्या पुढ्यात आणून टाकलं होतं, म्हटलं तर निरागसपणे, म्हटलं तर थोडा अंदाज घेण्याच्या पवित्र्यात. काय तरी प्रेक्षणीय गोची होती खरंच! एकीकडून तू हा सगळ्या आचरट प्रकारातली गंमत समंजस मित्रासारखी समजून पोटात घालावीस ही अपेक्षा आणि दुसरीकडून तुला भडकवण्याच्या माझ्या क्षमतेचा झालेला मनस्वी विकृत आनंद... तुझंही तेच! माझं हे असले आचरट प्रकार करून पाहणं आवडतं आहे, समजतं आहे कुठेतरी आणि तरी पोटातून वाटलेली काळजी दडवता येत नाहीय...
खरं तर निघायची वेळ ऑलमोस्ट उलटून गेलेली, पण जाणार कशी मी? मी विचारलेल्या एका बिनतोड सवालाचं उत्तर दिलं नव्हतंस तू! ’लिही ना उत्तर, थांबलेय मी’ असं म्हणून मी तुझ्या मागे उभी राहिले, तेव्हा अजूनच कोंडीत पकडल्यासारखी अवस्था तुझी. ’तू जा इकडून, मी लिहितो’ असं म्हणून मला हाकललंस आणि ते वाक्य उच्चारलंस स्वत:शीच हताश होऊन पुटपुटल्यासारखं -

"कधीतरी विचार करावा माणसानं थोडा..."

पुढच्या सार्‌या पडझडीची स्वच्छ जाणीव व्हावी अशा सुरात, स्वत:च्या वाहवत जाण्याला आणि त्यातल्या अपरिहार्यतेला उद्देशून उच्चारलेलं ते वाक्य. कुणी पाहू-ऐकून विटाळू नये असं आणि इतकं खाजगी.

ते ऐकलं आणि डोक्यातली सगळी अटीतटी, राग, तडफड संपून फक्त एक उदास आनंद तेवढा उरला मनात...

***

’मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा...’ अशातली गत असतानाही हट्टानं दिवसचे दिवस भिजून लुटलेला पाऊस. यशराज फिल्म्सची हिरॉईन असल्याच्या थाटात चंद्राकडे दिमाखानं पाहत रचलेल्या कविता. सिनेमे पाहण्यात बुडवून टाकलेल्या संध्याकाळी. पुस्तकं, नाटकं, मित्रमंडळी...

आणि तरीही ग्रेस म्हणतो तसा ’बुबुळांच्या शुभ्रतेत रुतलेला चंद्र’ आपला अभंगच...

***

’पळून जायचं नाही’ या तुझ्या वेडगळ आव्हानासमोर मूर्खासारखी मान तुकवून आपण आयुष्य परत चालू केलेलं. ’जमतंय की आपल्याला’ अशा आश्चर्यात मी दंग असताना तू चक्क म्हणावंस, "मी जातो दुसरीकडे कुठेतरी..."? ठिकाय, आपली त्यालाही ना नाही! पण ’मला इथे काहीच मिळत नाहीय माझ्या मनासारखं, मी जातो...’ या तुझ्या कांगावखोर प्रस्तावावर बॉसनं तुला काय म्हणावं?

’प्रूव्ह युअरसेल्फ ऍण्ड देन गो. पळून जाण्यात काय गंमत आहे?’

हा हा हा!!!

तू अर्थातच थोबाडीत मारल्यासारखा गप्प! तुझा चुपचाप थांबण्याचा निर्णय ऐकून त्या बॉसला बिचार्‌याला वाटलं असेल, काय भन्नाट तत्त्वज्ञान ऐकवलं आपण...त्याला काय ठाऊक ही कहाणीमागची कहाणी?
हे रामायण ऐकून हसावं की रडावं ते मला कळेना. स्वत:शी नसती युद्धं खेळण्यातून सुटका होता होता राहिली म्हणून नाराज व्हावं की तुझी पुरती जिरवणार्‌या या काव्यात्म न्यायावर खूश व्हावं असला भन्नाट प्रश्न माझ्यासमोर.

पण तुझा "सही जिरली ना माझी?" असा प्रश्न घेऊन असलेला गंमतीदार चेहरा बघून मग जे हसायला यायला लागलं, ते आवरेचना...

***

अलीकडे तसे आपण एकमेकांना आणि एकमेकांपासून जपून असतो. तशी भंकस, मस्करी, गप्पा-टप्पा, मस्ती आणि हमरीतुमरीवर येऊन केलेली भांडणं अजूनही चालतात आपली. समोरच्या माणसाला नेमका कसला राग येईल हे उमजून मुद्दामहून त्याचा अदमास घेत काडी टाकणं, तो अपेक्षेप्रमाणे भडकला की मनमुराद हसणं, चिडणं, चिडवणं...

पण एक आवर्तन पुरं झालं आहे आता.

आता प्रदेश पावलांना पूर्वीइतके अपरिचित नाही राहिलेले.

बरेच ऊष्ण गतिमान प्रवाह आता वरच्या संथ-शांत प्रवाहाखाली.

पोटातून अपार माया. भावी विध्वंसाची बीजं पाहताना दाटून येणारी काळजी. एकमेकांचं पोरपण जपण्यासाठी केलेली धडपड. न दिसणार्‌या शेवटाची भीती आणि अनामिक आकर्षणही...

’मी दोन ओळींच्या मधे कधीच काहीच पेरत नाही’ असं कितीही ठामपणे म्हणालास तू, तरी -

मधल्या काळात बरेच काही उगवून आलेले...

You Might Also Like

21 comments

 1. ’बरेच काही उगवून आलेले...’ - द. भा. धामणस्कर

  ReplyDelete
 2. I have read this current post and few of your earlier posts. They are definitely good ones and I must congratulate you on them. But let me also share few things which I fear you may not take in the right spirit. First thing you are suffering from a terrible 'Meghana Pethe Mania'. esp. this recent post. Your writing style is clearly dominated by Meghana's style. Please try to come out of it as soon as possible then only you can get yourself evolved into a good original writer. Second thing is there's tremendous monotony in all your post's subjects and they all sound simillar. Third and last thing is you are also getting yourself influenced by other popular marathi bloggers.When you yourself is a good writer why should you imitate other's style and use similar lines(poems) and phrases they have already used while writing their posts? I hope you will parden me for writing this comment.

  ReplyDelete
 3. wa...mast. prexaNeey gochee, sugar coated tusaDepaNaa :). tulana mhaNoon navhe, tar as a compliment mhaNoon mhaNato -- meghana bhuskutechya aivaji meghana pethenni lihile aahe kee kaay asa kShaNbhar vaaToon gela.

  ReplyDelete
 4. ॒सिया
  मेघना पेठेच्या प्रभावाबद्दल-
  तुमच्या सूचनांबद्दल मनापासून आभार.
  पण माझ्यावरच्या प्रभावाबद्दल मला लाज वा अपराधीपणा कधीच नव्हता. प्रभावांना घाबरून लिहिणं बंद केलं तर कुणी कधी लिहायलाच नको, असं मला वाटतं. किंबहुना असल्या आकर्षण-आदरातून आलेल्या प्रभावांतून आणि ते दूर करण्याच्या दडपणातून स्वतंत्र शैली घडत जाते यावर माझा विश्वास आहे.
  पोस्टच्या विषयांबद्दल-
  होय, मोनॉटोनी असेलही. पण निव्वळ वैविध्य आणायचं या ध्येयानं लिहिणं मला कधीच जमलं नाही. त्या त्या वेळी ते ते विषय आयुष्य व्यापून असतात. त्यावर लिहिलं जातं. इतकंच.
  इतर कवितांच्या वापराबद्दल-
  हे बाकी खरंय! मी अंमळ जास्तच कविता उद्धृत करायला लागलेय!
  ॒नंदन
  खरंच मेघना पेठे ’जास्त’ झालेली दिसते मला! :)

  ReplyDelete
 5. wow...nice...vachtana kuNacha tari prabhav aahe ya shaillevar asa sarakha vaTat hota paN...mi meghana pethe vachalelya nahit tyamuLe, kuNacha prabhav aahe he mala samajaN ashakyach hota...paN asa ugach vaTat hota...paN yavarachi tuzi pratikriya vachun paTala tuza...so keep it up...swatantra shailee t aadhi lihilayes posts...pudhehi lihishilach :)...aawadala...

  ReplyDelete
 6. WOW!!! Asla abstract writing vachayla mast vatata. Keep it up :)

  ReplyDelete
 7. I have never read Meghana Pethe either, so I dont know if you have been influenced or not.
  But yes, what you write is something which I cant manage to understand in the first reading itself - its is like wine - it gets better with time!

  Keep writing.
  And as "siya" says - it will be interesting to see when you write on different topics, or if possible, in a different style.

  ReplyDelete
 8. पोस्ट खूप आवडलें. एका उत्तम कथेची बीजे त्यामधे मला दिसलीं.

  धामणस्करांच्या कवितेचा फारच सुरेख वापर. (मी त्यांच्याबद्दल अगदी जुजबी असे ऐकले होते. डोंबिवलीमधे राहणारी , पस्तीसेक वर्षें मुंबईच्या लोकलमधे दिवसामाजी ३ तास या न्यायाने अक्षरश: पिचत आयुष्य काढलेली एक व्यक्ति असे काहीतरी सुंदर कसे लिहत राहू शकत असेल बरे? असो.)

  पोस्टमधील सगळ्यांत आकर्षक भाग म्हणजे घडून गेलेल्या एका फेज् कडें एक प्रकारच्या डिस्-पॅशनेटली पहाण्याचा प्रयत्न. एकाच प्रकारच्या अनुभवांचा पॅटर्न; पण तो तसा जगून झाल्यानंतर जेव्हा पुन्हा कधीतरी समोर येतो तेव्हा त्याच्याकडें कसे पहातो ? निवेदिकेच्या भाषेत या "अपरिचित न राहिलेल्या प्रदेशां"चा प्रवास नक्की कसा करतो आपण? निर्विकारपणे ? एक प्रकारच्या जुगुप्सेने ? की एक प्रकारे आयुष्य देत असलेला सेकंड चान्स म्हणून पहातो आपण त्याकडे? निवेदिका सांगत नाही; पण त्याचा विचार करण्यात काहीतरी अर्थ दडलाय् असे वाटते खरे.

  पेठे यांचा प्रभाव ऑबव्हियस आहे. या प्रभावाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास केवळ शैलीपुरता तो मर्यादित नसून अनुभव घेण्याच्या प्रक्रियेशी त्याचे नाते असेल असा एक माझा कयास आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही तो अमान्य करीत नाही. मुद्दाम कॉपी करण्यांत ज्याप्रमणें हशील नाही, त्याप्रमणें एखाद्या तुकड्यामधे मानगुटीवर बसलेल्या कुणाला नाकारण्यांत सुद्धा नाहीच. असो.

  ReplyDelete
 9. कुठून सुरुवात करावी बरं? प्रत्येक अनुभवासाठी एक वेगळी reaction द्यावी का?
  लिखाणातल्या प्रभावाविषयी मी परत नव्यानं काय लिहीणार? as far as this blog goes, मला या वेळी नाही वाटलं की तू मेघना पेठेसारखं लिहीलस..

  हा blog वाचताना मला iterative life cycle development ची आठवण येतेय! का आणि कसं ते विचारु नकोस. एक टोक तुटता तुटता त्याचा धागा नव्या टोकाला जोडून घेतो तसं काही तरी झालय या लिखाणाचं. एकाचवेळी पराकोटीचं आपलेपण आणि परकेपण यांच्यात फसलेल्या माणसाचं नक्की काय होतं? तर हे असं होतं! मला सांगायचं तर आहे पण तुला ते कळता कामा नये...कसले हे अट्टहास!! का? ते विचारणार नाही. माझ्यापुरतं मी उत्तर शोधलेलं आहे आणि I am sure, you do have your answers.

  जाता जाता; तू जर खरेंच्या संदीप विषयी बोलत असशील तर तो कवितांवर जगत नाही. He works in an ad agency and has some very original-good designs in his accounts! sorry, कवीचे कूळ काढू नये म्हणतात पण मलाही बदला घेतल्याचं तितकंच सुख!! आपण जर एकाच संदीप बद्द्ल बोलत असू तर माझं मत फारसं बर नव्हे. तो बडबड गीते लिहीतो असं माझं स्पष्ट मत आहे. एखाद्या कवितेवरुन मी त्याची जय म्हणणार नाही पण मला त्याच्या कविता फार बालीश, टाळ्याखाऊ आणि college crowd साठीच्या वाटतात..and yes, मला त्या्च्या "मौनाची भाषांतरे" या अत्यंत सुंदर नावासाठी तितकीच अत्यंत जळजळ वाटते.

  ReplyDelete
 10. खूपच सही! ही पोस्ट आवडली मला. कुणाचा प्रभाव, कशाचा अभाव याबद्द्ल मी काहीच लिहू शकत नाही, पण प्रत्येक तुकडा-न-तुकडा आवडला.
  ’प्रूव्ह युअरसेल्फ ऍण्ड देन गो. पळून जाण्यात काय गंमत आहे?’
  हे वाचताना वाटलं की हेच तर जगतेय सध्या मी. पळून जाण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न.
  तू कमेंटमध्ये लिहिलेलं हे ही पटलं,
  " त्या त्या वेळी ते ते विषय आयुष्य व्यापून असतात. त्यावर लिहिलं जातं. इतकंच."
  असो, तू जरा लवकर लिहीत जा, मध्ये खूप वेळ घेतेस. :-))
  -विद्या.

  ReplyDelete
 11. baapre!! ekde lokani barach khal kelela distoy tuzya postwar...pan mi MuktaSunit shi sahamat ahe... shaili peksha wicharancha prabhav adhik janavto tyat ani te ahe hi kharach....
  good one...jari madhlya kalat ugawun alela mala disat asla tarihi...

  ReplyDelete
 12. मेघना, तू छान लिहीतेस यात वादच नाही. पण मी सियाशी सहमत आहे. शैली मधे हरवून गाभा हाताशी येत नाही असं पहिल्या वाचनात वाटलं की मी जरा निराश होते... कदाचित माझी झेप नसावी तेव्हढी!

  ReplyDelete
 13. @ए सेन मॅन, आनंद सरोळकर, मॉन्स्यूर के, मुक्त सुनीत, विद्या भुतकर
  एकुणात या परस्परविरोधी आणि प्रामाणिक प्रतिक्रियांनी मला शैली आणि प्रभाव या गोष्टींचा मुळापासून विचार करायला भाग पाडलं. त्याबद्दल मनापासून आभार.
  @संवेद,
  फक्त प्रभावच नव्हेत, लिखाणातले संदर्भ, ते लोकांपर्यंत नि:संदिग्धपणे पोचवावेत की त्यांच्या कल्पनेवर विश्वासावं, त्यात नेमक्या कुठल्या रेषेपासून अस्फुटपणा संपून धुसरपणा सुरू होतो, व्यक्तिगत अनुभव आणि त्याचं लिटररी प्रेझेंटेशन यांतली नेमकी कुंपणरेषा कुठे असते.... असले अनेक प्रश्न पडले तुझी प्रतिक्रिया वाचून. आभार.
  @स्नेहल
  :)))))))
  @सुमेधा
  झेप वगैरे काय अग?!!! किती ’खेचावी’ एखाद्याची?!!! :)

  ReplyDelete
 14. hmmm ... एक वेळ मला कळेच ना! की झाले काय काकूना! एकदम हे असले काय? ;-)

  कथा म्हणली की डोळे आपोआपच फुलतात ...

  सही आहे ... लिहीत रहा ... कोणाच्या हाताने का होईना ...

  btw ... who is Meghana Pethe?

  ReplyDelete
 15. farach chhan lihita tumhi. katha tar itakya tanmayatene lihita ki ti katha na vaTata tumhi swat:baddal lihilel^ posT vatata blog varacha. :-)

  ajun lihit raha.

  ReplyDelete
 16. still alive n kicking!!!
  All of sudden we all became Bajaj Scotter...dhakka start

  ReplyDelete
 17. Devanagari lipitun kase lihitat>
  Malaa comment lihaayadhi aahe.

  ReplyDelete
 18. @किशोर
  'बरहा' नावाचं सॉफ्टवेअर आहे ते इथून (http://www.baraha.com/) उतरवून घ्या. किंवा मायबोली (http://www.maayboli.com/), मिसळपाव (http://www.misalpav.com), उपक्रम (http://mr.upakram.org/) यांसारख्या फोरम्सवर जाऊन लिहा, उतरवा आणि डकवा! ब्यापच आहे खरा.

  ReplyDelete
 19. जीवन म्हणजे योगा - योगांची शृंखला असं मी नेहेमीच म्हणत असतो. आत्ताच मी ऑफिसच्या अगदी जवळ, ' ऑक्सफर्ड ' बुक स्टोर मध्ये जाऊन आलो. मला मेघना पेठेंच ' नातीचरामि ' किंवा ' हंस अकेला ' हवं होत. पण नाही, तिथे मराठी पुस्तकच नाहीत, आतां बोला ! अर्थात मी व्यक्तिगत रित्या चार शब्द सुनावून आलो. जे इतरांनी ही ऐकले नक्कीच. मी त्यांच एक ही पुस्तक वाचलेलं नाही. पण माझा मित्र संजय भास्कर जोशी ( लेखक, अभ्यासक, ' नचिकेताचे आख्यान' , ' आहे कॉर्पोरेट तरी ' ) ह्याने अनुभवच्या ताज्या अंकात त्यांच्या बद्दल लेख लिहिला आहे तो वाचल्यावर म्हटल आतां वाचायलाच हवं.
  थोड तुझ्या लेखन शैली बद्दल. काळजी करू नकोस, लेखकामध्ये प्रारंभीच्या काळात कुणाचा ना कुणाचा प्रभाव असण म्हणजे गुन्हा नाही. लेखकच कशाला ? गायक किंवा चित्रकार सुद्धा. मी जी ए कुळकर्णी ह्यांचा चाहता आहे आणि त्याचा प्रत्यय माझ्या पहिल्या कथेत अनेक वाचकाना आला. आतां मात्र माझ्या लेखनात तशा प्रकारचे शब्द प्रयोग, शैली इत्यादी बदल घडत आहे.
  तू लिहित राहण मला अधिक महत्वाचं वाटत.

  ReplyDelete