Friday 31 August 2007

देणार्‌याने देत जावे...


"...आपल्या संवेदना व भावना तीव्र आहेत, आपल्याला अनुभवाच्या अर्थाचा विचार बर्‌यापैकी करता येतो, कल्पनाशक्तीची व भाषेची देणगीही अगदीच वाईट नाही, मूल्यभाव सूक्ष्म आहे, वगैरे गोष्टींचे भान मला फार लवकर आले. पण त्याच वेळी असेही कळले की निसर्गाने आपल्याला या सर्व शक्तींना सामावून घेणारी व त्यांच्यापलीकडचा अज्ञात प्रदेश उजळवून टाकणारी नवनिर्मितिक्षम शक्ती दिलेली नाही. त्या प्रदेशातल्या अंधूक आकृती क्वचित भासमान होतात; क्वचित त्यांच्या निगूढ गीतांचे सूर ऐकू आल्यासारखे वाटतात. पण तितकेच वाटते, त्या सार्वभौम शक्तीपासून असे वंचित राहण्याचा शाप जर द्यायचा होता, तर आधीचे सर्व दान कशाला दिले? मग ध्यानात आले की त्या दानाच्या बळावर आपल्याला दुसर्‌याच्या निर्मितीत सावलीसारखी सोबत करता येईल; कदाचित ’झाडू संतांचे मार्ग’ म्हणतात तशा रीतीने कलावंतांच्या वाटा साफ व स्पष्ट करता येतील. तेच आपले श्रेय असेल आणि ते कमी मोलाचे नाही. आपण जीव ओतू तितके ते वाढेल. संपादन-प्रकाशनाच्या कामात मी ते शोधले आहे, अगदी जिवानिशी शोधले आहे आणि त्यातला आनंद घेतला आहे..."


खरे पाहता तुमचे जाणे जाणवावे असा आपला थेट संबंध कधी आलाच नाही. तो येण्याची शक्यताही नव्हती.


तुमचे क्षेत्र साहित्याचे. वाचणारी माणसे कुठल्याही युगात वाचतातच आणि न वाचणारी कधीच वाचत नाहीत हे जरी खरे असले तरी, आमचे युग वाचण्या-बिचण्यासारख्या ’निरुपयोगी’ आणि ’अनुत्पादक’ गोष्टीकडे सहजसाध्य तुच्छतेने पाहणारे. औचित्य सांभाळणे हा तुमचा वृत्तिविशेष. आणि गरज पडली तर नेसूंचे सोडून डोक्याला गुंडाळण्यातही काही वावगे नाही असे मानणारी आमची पिढी. केल्या कामाचेही श्रेय घेण्याचे तुमच्या जिवावर येई. आणि ’नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी’ हे तर आमचे ब्रीदवाक्य. अशा दिवसांत तुम्ही सार्वजनिक आयुष्यातून जवळ जवळ निवृत्तच झाला होता यातही नवल करण्यासारखे काही नाहीच.


तरी तुमचे जाणे इतके जाणवत राहावे, असे आणि इतके तुम्ही माझ्या मनात कसे रुजून राहिलात, असे कोडे पडले आहे.


वाचण्याच्या आवडीचे सवयीत आणि पुढे गरजेत रूपांतर होत गेले तसतशी पुस्तके जमा होत गेली माझ्याजवळ. कुण्या वडीलधार्‌या माणसाने माझी पुस्तके पाहताना सहज म्हटले, ’अरे, ’मौजे’ची पुस्तके बरीच दिसतात की.’ तेव्हा त्या अडनिड्या वयात मी ’मौजे’च्या देखणेपणाची प्रथमच जाणतेपणी दखल घेतली आठवते. नीटस देखणी, नजरेला सुखावणारी मांडणी. पानांचा तो विशिष्ट पिवळसर रंग. (कुणीतरी अडाण्यासारखे ’ही पुस्तके पिवळी पडलेली आहेत’ असे म्हटले तेव्हा त्याची कीव तर वाटली होतीच. पण नकळत ’का बरे आवडतो हा रंग’ असा चाळाही सुरू झाला मनाशी. काही पुस्तकांच्या भगभगीत पांढर्‌या पानांच्या तुलनेत त्या लोभस पिवळसर पानांत एक अनाक्रमण, आकर्षक साधेपणा असतो. सेपिया टोनसारखा? कुणास ठाऊक...) राजमुद्रेसारखा ’मौजे’चा तो शिक्का. म्हटले तर प्रथमदर्शनी जुनाट वाटेलसा. पण त्या जुनेपणातच खानदान आणि भारदस्त आकर्षण घेऊन असणारा. अर्थपूर्ण आणि सुरेख मुखपृष्ठे. शुद्धलेखनाचा आणि मुद्रणाचा विलक्षण अचूकपणा. (एकदा कधीतरी एका अक्षराला द्यायचा राहून गेलेला काना सापडला होता, तेव्हा मी आधी आश्चर्यानं शब्दकोश पाहून आपल्याला ठाऊक असलेला शब्दच बरोबर आहे ना, अशी खात्री करून घेतलेली आठवते! हो, ’मौजे’च्या पुस्तकातला शब्द कसा चुकीचा असेल?!) आणि या सर्वांवर ताण म्हणजे एकाहून एक सरस दर्जा असलेल्या, चाकोरीबाहेरच्या वाटांवरच्या साहित्यकृती. मराठीच्या साहित्यविश्वात मैलाचे दगड ठरतील अशा तर कित्येक...
तसेच ’मौजे’चे दिवाळी अंक. वर्षानुवर्षे जपावेत असले चिरेबंदी साहित्य असलेले ते अंक. कधी कुणाच्या कविता आवडीनं वाचण्याचा मला कंटाळा. पण ’मौजे’तल्या कविता आवर्जून वाचाव्याशा वाटत गेल्या आणि मग नकळत कविता वाचण्यातला आनंद रुजत गेला मनात...


खरं तर तुमचा माझ्याशी आलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध काय तो इतकाच. ’सत्यकथा’ ही गोष्ट मला तरी ’स्वातंत्र्यलढा’ किंवा ’आणीबाणी’ या गोष्टींसारखी आणि या गोष्टींइतकीच अपरिचित. फार दंतकथा असणारी, फार दूरची आणि त्यामुळे ’माफक रोमांचक’ या विशेषणापलीकडे न जाणारी.


मराठी साहित्यानं कात टाकण्याच्या त्या दिवसांत म्हणे ’सत्यकथे’नं सार्‌या चाकोरीबाहेरच्या लेखकांना हक्काचं व्यासपीठ दिलं. सगळ्या वादांत, विरोधाच्या गदारोळात, टिंगलटवाळीतही खंबीर आणि सक्रिय पाठिंबा दिला. प्रसंगी ’प्रस्थापितांचा संकुचित संप्रदाय’ अशी हेटाळणी ऐकूनही अभिजात प्रयोगशील साहित्याचा आग्रह सोडला नाही, तसाच विरोधी मतप्रवाहांची दखल घेण्याचा सर्वसमावेशक सुसंस्कृतपणाही सोडला नाही. म्हणे...


या सार्‌या ऐकल्या-वाचलेल्या, सांगोवांगीच्या गोष्टी. मला प्रत्यक्ष दिसत राहिला तो ’मौजे’बद्दलचा पुस्तक जगातला सकारण आदर आणि दबदबा. मनोहर जोशी-विजय तेंडुलकर वादातही ’घडला तो प्रकार दुर्दैवी होता. पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यावा हे मी संस्थेला सांगणं उचित नाही’ इतक्याच मोजक्या शब्दांत तुम्ही सुसंस्कृतपणे व्यक्त केलेली प्रतिक्रिया. निरनिरळ्या कुळांच्या, वयांच्या आणि प्रवृत्तीच्या लेखक-कलावंतांनी तुमच्याविषयी वेळोवेळी प्रकट केलेली आदराची आणि आपुलकीची वादातीत भावना. लेखनासारख्या व्यक्तिनिष्ठ सर्जनप्रक्रियेतही तुमचा मोलाचा हातभार लागल्याबद्दल व्यक्त केलेली सुंदर कृतज्ञता. प्रत्यक्ष साहित्यनिर्मिती न करताही तुमच्या अक्षरश: अजोड कामासाठी तुम्हाला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळावे हा कुणीकुणी कृतज्ञभावाने केलेला आग्रह. तुमच्या नावे लिहिल्या गेलेल्या कित्येक अर्पणपत्रिका...


या सार्‌याबद्दल आभार मानणेही काहीसे अपुरे, औपचारिक आणि उथळ वाटेल.


तुमच्या सर्जनाच्या अभिव्यक्तीसाठी इतका वेगळा, विधायक रस्ता शोधलात तुम्ही. आणि किती देऊन गेलात... तुम्हीच तुमच्या एका पत्रात म्हटले आहे तसे चंद्रबिंबाची कळा वाढवून गेलात... तुमचेच शब्द परत एकद उद्धृत करून थांबणे औचित्याला धरून होईल...
"...काल संध्याकाळी चांदणे सुंदर पडले होते. गच्चीवर त्यात बसावे असे फार मनात आले, पण गेलो नाही. अशा नीरव चांदण्यात एकटेपणा सोसत नाही... वाटते, चांदण्याचे दूध मिसळून मऊ झालेल्या शांततेत सर्वांगी न्हाऊन निघावे व विरघळून जावे, किंवा तळ्यातल्या कुमुदाप्रमाणे शरीर-मनाच्या पाकळी-पाकळीने उमलत जावे आणि त्या चांदण्याला किंवा चंद्रबिंबाला अभिमुख होऊन भरून यावे आणि अंतर्बाह्य निवून गात्रागात्रांत ती सुगंधी चापेगौर शीतलता भिनवून घ्यावी, किंवा दुरून एखाद्या मधुर घंटेचा मंद वलयांकित निनाद ऐकावा, किंवा सनईसारख्या गोड व आर्त स्वराचे कण रंध्रारंध्राचे कान करून ऐकावे... आणि हे जडकठोर शरीर त्या सुखात न कळता विरून जावे... आत्म्याची क्षीण ज्योत चंद्रबिंबात विलीन होऊन त्याची कळा वाढली तर वाढावी... आपण उरूच नये..."

Saturday 11 August 2007

बरेच काही उगवून आलेले...

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूंच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...


***

अगदी सुरुवातीच्या काळातली कधीतरीची ही गोष्ट. ’नऊ तासांपलीकडे मी तुमचं काहीही देणं लागत नाही’ अशा बाणेदार आणि शुगर कोटेड्‌ तुसडेपणातून जमतील तेवढ्याच गप्पा मारणं सोडून मी जरा जरा माणसांत यायला लागले होते तेव्हाची. घरी परत जाताना गाडीत कुठल्याश्या देव-आनंद-कालीन गाण्यावर खूश होऊन मी मारे आवाज वगैरे वाढवला. त्यावर स्पष्ट नाराजी नोंदवणारं तुझं ’च्‌च्‌’ ऐकून, मागे वळून भिवया उंचावल्या असाव्यात मी. तेव्हा म्हणाला होतास, "हे बरंय... नाही आवडत एखादी गोष्ट असं म्हणायचीपण चोरी! थेट माझ्या अभिरुचीवरच उठणार म्हण की..."

तुझी मळल्या वाटेबद्दलची बेफिकिरी तेव्हाच नोंदली मी.

मग कधीतरी संदीपच्या 'पाडू' कवितांबद्दल त्याला शिव्या घालत होते मी, तेव्हा बोलता बोलता सहज बोलल्यासारखा, "'पाडू' तर 'पाडू', पण आपल्यात आहे का कवितांचा जाहीर कार्यक्रम करण्याची हिंमत? आपण फक्त पगाराचे आकडे फुगवण्यात काय ती खर्डेघाशी दाखवणार. कविता करायला आणि त्यावर जगायला जिगर लागते...बसून शिव्या देणं सोपं असतं," असा शांतपणे टाकलेला बॉम्ब.

मी भिवया उंचावायलाही विसरून गेले असणार...

***

हे नेमकं कधीचं ते मला आठवत नाही. ’बोलायला नको होतं ते बोलून तर बसलो आहोत, आता या टोपीतून कोणकोणते ससे बाहेर येतात ते पाहायचं’ असा हताश मूड सोडून आपण जरा गप्पा-टप्पा करायला परत सुरुवात केली होती त्या काळात असावं. मी ते सगळं ’सिगारेट’ प्रकरण तुझ्या पुढ्यात आणून टाकलं होतं, म्हटलं तर निरागसपणे, म्हटलं तर थोडा अंदाज घेण्याच्या पवित्र्यात. काय तरी प्रेक्षणीय गोची होती खरंच! एकीकडून तू हा सगळ्या आचरट प्रकारातली गंमत समंजस मित्रासारखी समजून पोटात घालावीस ही अपेक्षा आणि दुसरीकडून तुला भडकवण्याच्या माझ्या क्षमतेचा झालेला मनस्वी विकृत आनंद... तुझंही तेच! माझं हे असले आचरट प्रकार करून पाहणं आवडतं आहे, समजतं आहे कुठेतरी आणि तरी पोटातून वाटलेली काळजी दडवता येत नाहीय...
खरं तर निघायची वेळ ऑलमोस्ट उलटून गेलेली, पण जाणार कशी मी? मी विचारलेल्या एका बिनतोड सवालाचं उत्तर दिलं नव्हतंस तू! ’लिही ना उत्तर, थांबलेय मी’ असं म्हणून मी तुझ्या मागे उभी राहिले, तेव्हा अजूनच कोंडीत पकडल्यासारखी अवस्था तुझी. ’तू जा इकडून, मी लिहितो’ असं म्हणून मला हाकललंस आणि ते वाक्य उच्चारलंस स्वत:शीच हताश होऊन पुटपुटल्यासारखं -

"कधीतरी विचार करावा माणसानं थोडा..."

पुढच्या सार्‌या पडझडीची स्वच्छ जाणीव व्हावी अशा सुरात, स्वत:च्या वाहवत जाण्याला आणि त्यातल्या अपरिहार्यतेला उद्देशून उच्चारलेलं ते वाक्य. कुणी पाहू-ऐकून विटाळू नये असं आणि इतकं खाजगी.

ते ऐकलं आणि डोक्यातली सगळी अटीतटी, राग, तडफड संपून फक्त एक उदास आनंद तेवढा उरला मनात...

***

’मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा...’ अशातली गत असतानाही हट्टानं दिवसचे दिवस भिजून लुटलेला पाऊस. यशराज फिल्म्सची हिरॉईन असल्याच्या थाटात चंद्राकडे दिमाखानं पाहत रचलेल्या कविता. सिनेमे पाहण्यात बुडवून टाकलेल्या संध्याकाळी. पुस्तकं, नाटकं, मित्रमंडळी...

आणि तरीही ग्रेस म्हणतो तसा ’बुबुळांच्या शुभ्रतेत रुतलेला चंद्र’ आपला अभंगच...

***

’पळून जायचं नाही’ या तुझ्या वेडगळ आव्हानासमोर मूर्खासारखी मान तुकवून आपण आयुष्य परत चालू केलेलं. ’जमतंय की आपल्याला’ अशा आश्चर्यात मी दंग असताना तू चक्क म्हणावंस, "मी जातो दुसरीकडे कुठेतरी..."? ठिकाय, आपली त्यालाही ना नाही! पण ’मला इथे काहीच मिळत नाहीय माझ्या मनासारखं, मी जातो...’ या तुझ्या कांगावखोर प्रस्तावावर बॉसनं तुला काय म्हणावं?

’प्रूव्ह युअरसेल्फ ऍण्ड देन गो. पळून जाण्यात काय गंमत आहे?’

हा हा हा!!!

तू अर्थातच थोबाडीत मारल्यासारखा गप्प! तुझा चुपचाप थांबण्याचा निर्णय ऐकून त्या बॉसला बिचार्‌याला वाटलं असेल, काय भन्नाट तत्त्वज्ञान ऐकवलं आपण...त्याला काय ठाऊक ही कहाणीमागची कहाणी?
हे रामायण ऐकून हसावं की रडावं ते मला कळेना. स्वत:शी नसती युद्धं खेळण्यातून सुटका होता होता राहिली म्हणून नाराज व्हावं की तुझी पुरती जिरवणार्‌या या काव्यात्म न्यायावर खूश व्हावं असला भन्नाट प्रश्न माझ्यासमोर.

पण तुझा "सही जिरली ना माझी?" असा प्रश्न घेऊन असलेला गंमतीदार चेहरा बघून मग जे हसायला यायला लागलं, ते आवरेचना...

***

अलीकडे तसे आपण एकमेकांना आणि एकमेकांपासून जपून असतो. तशी भंकस, मस्करी, गप्पा-टप्पा, मस्ती आणि हमरीतुमरीवर येऊन केलेली भांडणं अजूनही चालतात आपली. समोरच्या माणसाला नेमका कसला राग येईल हे उमजून मुद्दामहून त्याचा अदमास घेत काडी टाकणं, तो अपेक्षेप्रमाणे भडकला की मनमुराद हसणं, चिडणं, चिडवणं...

पण एक आवर्तन पुरं झालं आहे आता.

आता प्रदेश पावलांना पूर्वीइतके अपरिचित नाही राहिलेले.

बरेच ऊष्ण गतिमान प्रवाह आता वरच्या संथ-शांत प्रवाहाखाली.

पोटातून अपार माया. भावी विध्वंसाची बीजं पाहताना दाटून येणारी काळजी. एकमेकांचं पोरपण जपण्यासाठी केलेली धडपड. न दिसणार्‌या शेवटाची भीती आणि अनामिक आकर्षणही...

’मी दोन ओळींच्या मधे कधीच काहीच पेरत नाही’ असं कितीही ठामपणे म्हणालास तू, तरी -

मधल्या काळात बरेच काही उगवून आलेले...